खडकवासला धरणाच्या पाणी पातळीतही झपाट्यानं वाढ होत आहे. पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळं आज दुपारी 12 दरम्यान खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये साधारण 3 हजार 424 क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. मुठा नदी पात्रामध्ये दुपारी 12 वाजता साधारण 1712 क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार होता. मात्र, तो वाढवून 3 हजार 424 क्युसेक करण्यात आला, असं यो. स. भंडलकर, सहाय्यक अभियंता, श्रेणी 1 खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्प यांनी सांगितलं आहे.
अमरावती : गेल्या चार दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळं अमरावती जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. यादरम्यान पूर्णा प्रकल्पाचे ९ दरवाजे उघडण्यात आल्याने पूर्णा नदीला महापूर आला आहे. यामुळं नदी नाले देखील तुडुंब भरले आहेत. भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर गाव जलमय झालं आहे. नागरिकांच्या घरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं आहे. शेत जमिनी देखील पाण्याखाली आल्या आहेत. त्यामुळं नागरिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे.
गोंडपिंपरी (जि. चंद्रपूर) : प्रसूतीची तारीख आली आणि कुटुंबीयांची चिंता वाढली. तीन दिवसांपासून सतत पूर व मार्ग बंद असल्याने आता काय करावे हा प्रश्न आला. शेवटी जीव संकटात टाकीत गर्भवतीला सोबत घेत आशा वर्करने डोंग्याचा प्रवास केला. संततधार पावसाने सामान्यांना मोठ्या संकटात टाकलं. आता त्यांना जीवघेण्या परिस्थितीशी सामना करावा लागत आहे. तालुक्यातील वेडगाव ते सकमूर या मार्गावरून पावसाच्या यातना दाखविणारा हा प्रकार समोर आला.
कर्नाटकातील अलमट्टी धरणातून 2 लाख क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात राहिली आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील महापुरास कारणीभूत ठरणार्या कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. सोमवारी ५० हजार असणारा विसर्ग मंगळवारी १ लाख करण्यात आला होता. बुधवारी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून या धरणात एक लाख क्यूसेकपेक्षा जादा पाणी जात होते. त्यामुळं सकाळी विसर्ग (जावक) दीड लाख तर सायंकाळी एक लाख ७५ हजार आणि रात्री विसर्ग दोन लाखांपर्यंत करण्यात आला असल्याचे पाटबंधारे विभागातून सांगण्यात आलं. यामुळे सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात आहे.
कोल्हापूर : गेले चार दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळं कसबा बावडा-शिये रोडवर पाणी आलं आहे. असं असताना देखील सध्या या मार्गावरून वाहतूक सुरु आहे. त्यामुळं प्रशासनाचं याकडं दुर्लक्ष असल्याचं दिसून येतं. आज दुपारी १२ वाजता राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ४१ फूट ७" इंच इतकी झाली आहे. पंचगंगा नदीची पाण्याची वाटचाल इशारा पातळी पार करून धोका पातळीकडं सुरु आहे. राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. आज सकाळी कसबा बावडा -शिये रोडवर जवळपास दोन फूटा पेक्षा जास्त पाणी आलं आहे. त्यामुळं हा मार्ग वाहतुकीसाठी बंद होणं गरजेचं होतं. पण, राष्ट्रीय महामार्गावर जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनधारकांची या मार्गावरून अजूनही वाहतूक चालू असल्याचं चित्र दिसतं आहे.
बुलढाणा : चिखली तालुक्यातील मिसाळवाडी-पिंपळवाडी, शेळगाव आटोळ परिसरात ढगफुटीसदृश धुवांधार पाऊस झाला. या पावसानं मिसाळवाडी नदीला महापूर आला असून, मिसाळवाडी धरण पूर्णक्षमतेने भरले आहे. या धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. या पावसामुळं शेतीपिकांचं अतोनात नुकसान झालं आहे.
सातारा : सोनगांव ते शेंद्रे मार्गावर वडाचे मोठे झाड पडल्याने वाहतूक बंद झाली आहे. साताराहून बाेगदा मार्गे शेंद्रे येथील वाहतूक बंद झाली आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यात आज, गुरुवारी अन् काल बुधवारी दिवसभर पावसाची उघडीप राहिली. पावसाचा जोर कमी झाला असला तरी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले झाल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. आज, सकाळी पंचगंगेची पातळी 41 फूट 7 इंच इतकी असून, धोक्याच्या पातळीच्या (43 फूट) दिशेने वाटचाल सुरू केल्याने जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांमधील ग्रामस्थांचे स्थलांतर सुरू केलं आहे. आंबेवाडी, प्रयाग चिखली, आरे आदी गावांमधील हजारो ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पंचगंगा नदीवरील 73 बंधारे पाण्याखाली आहेत.
आज सांगली जिल्ह्यात पावसानं उघडीप दिली आहे. पण, शिराळा तालुक्यासह वारणा (चांदोली) धरण परिसरात पाऊस सुरूय. यामुळं वारणा धरणातून ९४४८ क्युसेकने विसर्ग सुरू झाल्यामुळं वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर गेले असून बंधारेही पाण्याखाली गेले आहेत. कृष्णा नदीची दिवसात काल पाच फुटाने पाणीपातळी वाढून २५ फुटांवर गेली आहे.
अलमट्टी धरणामध्ये १२३ टीएमसी पाणीसाठा करण्याची क्षमता आहे. मंगळवारी धरणात ११७.५४ टीएमसी पाणीसाठा होता. धरणात एक लाख दोन हजार १८६ क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. यामुळे बुधवारी सायंकाळी पाचनंतर दोन लाख क्युसेकनं विसर्ग सुरू करून दोन टीएमसीनं पाणीसाठा कमी करून सध्या ११५.५४ टीएमसी ठेवला आहे. धरणात पाण्याची आवक वाढल्यास आणखी विसर्ग वाढविण्याची अलमट्टी जलसंपदा प्रशासनानं तयारी ठेवली आहे.
तब्बल 26 तासानंतर मोहाडी येथील पाणी ओसरल्याने मध्यप्रदेशकडे जाणारा भंडारा- तुमसर मार्ग पुन्हा सुरू झाला आहे. बुधवारी मोहाडी बस स्टॉप जवळ चंदू बाबा नाला ओव्हरफ्लो झाल्याने हा रस्ता पाण्याखाली गेला होता.
कोयना धरण पायथा विद्युत गृहातून आज (गुरुवार) दुपारी तीन वाजता 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीमध्ये सोडण्यात येणार आहे. तरी नदी काठच्या गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन काेयना धरण व्यवस्थापन आणि सातारा जिल्हा प्रशासनानं केलं आहे.
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून आज १२ वाजता मुठा नदी पात्रामध्ये साधारण ३४२४ क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. खडकवासला धरण १०० टक्के भरल्यामुळं हा विसर्ग केला जाणार आहे. दरम्यान, नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये आणि योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतली आहे. मात्र, पूरस्थिती जैसे थे आहे. पुराचे पाणी घरात शिरत असल्यामुळं नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच धरणाचे पाणी नदीत सोडण्यात येत असल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे.
इचलकरंजी : दोन दिवसांपासून वरुणराजाने थोडीशी उसंत घेतली असली तरी धरणातून सुरु असलेल्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ कायम आहे. बुधवारी सायंकाळी पंचगंगा नदीची पाणी पातळी ६४.४ फुटावर पोहोचली असून पूराच्या पाण्याची वाटचाल इशारा पातळीच्या दिशेनं सुरु आहे. पाणी पातळीत वाढ होत चालल्याने इचलकरंजी- हुपरी मार्गावर पाणी आले आहे. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी सायंकाळनंतर बंद करण्यात आला आहे. पंचगंगेची इशारा पातळी ६८ फुटावर तर धोका पातळी ७१ फुटावर आहे.
मंत्री उदय सामंत 14 ऑगस्टपासून रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच उदय सामंत रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. योगेश कदम यांच्या खेड मतदार संघापासून दौऱ्याला सुरवात होणार असून दौऱ्यादरम्यान चिपळूनच्या वाशिष्ठी नदीची पहाणी करणार आहेत.
Maharashtra Rain Update : राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसानं धुमाकूळ घातलेला आहे. अनेक जिल्ह्यांना पुन्हा झोडपून काढलेलं (Flood) आहे. काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्यासारखा पाऊस पडताना दिसत आहे. तर, हवामान खात्याकडून (IMD Alert) हे पुढचे काही तास पावसाचे राहणारा असल्याचा इशारा देण्यात आलाय. मुंबईतही पावसाच्या कोसळधारा सतत सुरूच आहेत. सातारा, सांगली, रत्नागिरी आणि कोल्हापूरलाही पावसानं चांगलंच झोडपून काढलं आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाच्या प्रत्येक वेगवान अपडेट तुम्ही या ठिकाणी पहा..
जून, जुलै महिन्यात झालेला मुसळधार पाऊस व ऑगस्टच्या 8 तारखेपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळं जिल्ह्यात सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झालीय. या पुराचा मोठा फटका पिकांना बसलाय. नागरिकांवर स्थलांतरणाची वेळ आलीय. अनेक गांवाचा संपर्क देखील तुटला आहे. दरम्यान, शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी जिल्ह्यातील काही तालुक्यांना भेट देत पूरग्रस्त भागांचा आढावा घेतला.
राज्याच्या अनेक भागात गेल्या दोन दिवसापासून पावसाची जोरदार बॅटींग सुरु आहे. 7 ऑगस्टपासून झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, 24 जिल्ह्यात सरासरीपेक्षा 60 टक्के जास्त पाऊस झाला आहे, तर चार जिल्ह्यात सरासरीपेक्षा 20 टक्के जास्त पाऊस झाला आहे. तर 9 जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झाला आहे. सध्या मुंबईसह परिसरात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. तसेच राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पाऊस पडत आहेत. काही ठिकाणी नद्यांना पूर आल्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
मालेगाव शहरातून वाहणाऱ्या मोसम नदीच्या फरशी पुलावरून दोन तरुण वाहून गेल्याची घटना समोर आलीय. पुलावरून जात असताना दुचाकी घसरल्याने ही दुर्दैवी घटना घडली. घटनेची माहिती मिळताच मालेगाव अग्निशमन दालचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, बचावकार्य सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.