कोल्हापूर / सांगली / सातारा : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला, तरी धरणांच्या पाण्याचा विसर्ग सातत्याने होत आहे. त्यामुळे नद्यांतील पाणीपातळीची वाढ शनिवारी (ता. २७) सुरूच राहिली. त्यामुळे पूरस्थिती गंभीर होत चालली आहे. जिल्ह्यातील सुमारे ५ हजार ८४५ नागरिकांचे स्थलांतर सुरू झाले आहे. तर १५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली आहेत. सर्वच धरणे नव्वद टक्क्यांहून अधिक भरल्याने मोठा विसर्ग सुरू झाला आहे. पंचगंगा नदी धोका पातळीपेक्षा पाच फुटांवरून वाहत असल्याने कोल्हापूर शहर, जिल्ह्यात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.
कोयना धरणांतून पाणी सोडण्यात येत असल्याने कोयना व कृष्णा नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. यामुळे शिरोळ तालुक्याला पुराचा धोका निर्माण झाल्याने या भागात आता भीतीचे वातावरण आहे. पावसाने जवळपास ७० हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. ग्रामीण भागातील ग्रामस्थांचे स्थलांतर होत असल्याने गावगाड्यावर संकट आले आहे. अनेक गावांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. राधानगरी धरणाच्या चार दरवाजांमधून ७,२१२ क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. शिरोली येथील राष्ट्रीय महामार्गालगत पाणी आले आहे. पाणीपातळीत २ फुटांनी वाढ झाल्यास महामार्ग पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
कोयनेतून ३२ हजार १०० क्युसेकने विसर्ग
कोयना धरणांतून शनिवारी दुपारपर्यंत ३२ हजार १०० क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. पावसाचा जोर कमी झाल्याने धरण व्यवस्थापनाने आणखी पाणी सोडण्याचा निर्णय लांबणीवर टाकला. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील गावांना तात्पुरता दिलासा मिळाला.
सांगलीत किंचित दिलासा
सांगली जिल्ह्यात आज पावसाने उसंत घेतली असली तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर ओेसरल्याने पुरपट्ट्याला दिलासा मिळाला. कोयना धरणातून ३२ हजार क्युसेक तर चांदोली धरणातून १५ हजार क्युसेकने विसर्ग सुरू होता. त्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत संथ गतीने वाढ होत राहिली. नदीकाठी पूरस्थिती कायम आहे. पूरग्रस्त भागातील ८० हून अधिक घरांची पडझड झाली आहे. सांगलीत आज नदीने इशारा पातळी ओलांडली. सायंकाळी आयर्विन पुलाजवळ ४०.५ फूट पाणीपातळी होती.कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत संथ गतीने वाढ होत आहे. वारणा नदीच्या पाण्यातही वाढ कायम आहे. वाळवा, शिराळा तालुक्यात काही ठिकाणी सरी कोसळत होत्या.
चार हजार नागरिकांचे स्थलांतर
जिल्ह्याच्या पूरग्रस्त भागात आजही पूरस्थिती कायम आहे. वाळवा, पलूस, मिरज आणि शिराळा या चार तालुक्यातील नदीकाठच्या गावातील ४९५ कुटुंबांतील दोन हजार २० नागरिकांचे तर सांगली शहरातील ४८१ कुटुंबांतील दोन हजार ४२ नागरिकांचे असे एकूण चार हजार ६२ नागरिकांचे आज सायंकाळपर्यंत स्थलांतर करण्यात आले. या नागरिकांची निवारा केंद्र, जिल्हा परिषद शाळा आणि माध्यमिक विद्यालयांमध्ये निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. याशिवाय दोन हजार ७८२ पशुधन सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील २४ पूल आणि १२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
‘अलमट्टी’त २,१८,२३० क्युसेकने आवक
महाराष्ट्रातील जलाशयांतून येणारे पाणी व पावसाच्या पाण्याची आवक प्रचंड वाढत आहे. सध्या ‘कृष्णेत पाणी वाढत आहे. ‘अलमट्टी’तून शुक्रवारी (ता.२६) दुपारनंतर ३ लाख क्युसेक विसर्ग सुरू केला गेला. शुक्रवारी रात्री अलमट्टीत २ लाख ७ हजार १३० क्युसेकने पाण्याची आवक होती, तर तीन लाख क्युसेकने विसर्ग होता. या दरम्यान धरणात ८२.५० टीएमसी पाणीसाठा होता. शनिवारी सकाळपासून अलमट्टीत पाण्याची आवक २ लाख १८ हजार २३० क्युसेकने आहे. शुक्रवारपासून पाण्याचा विसर्ग वाढविल्याने धरणातील ५.८ टीएमसीने पाणीसाठा कमी झाला असून सध्या ते ७६.८० टीएमसी आहे.
विदर्भात पूरस्थिती गंभीर
विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली असून गडचिरोली जिल्ह्यात अनेक मार्ग अद्यापही बंदच आहेत. चंद्रपूरमध्ये सकाळपासून पावसाला सुरवात झाली. गोंदियात सडक अर्जुनी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे चिंगी गावांचा संपर्क तुटला आहे. भंडारा, अकोला, वाशीम, बुलडाण्याला पावसाचा तडाखा बसला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.