८० टक्के पालकांची मुलींना पसंती; दोन हजारांवर मुलींना मायेची ऊब
नागपूर - एकीकडे नकोशा म्हणून नाकारल्या जात असताना दुसरीकडे मुलींना दत्तक घेण्याचे प्रमाण महाराष्ट्रात वाढले आहे. नवजात मुलींना बऱ्याच कुटुंबांनी मायेची ऊब देत पालकत्व स्वीकारले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात दत्तक घेतलेल्या एकूण मुलांमध्ये ८० टक्के प्रमाण मुलींचे असून, यात राज्य आघाडीवर आहे.
‘मुलगा वंशाचा दिवा’ या म्हणीप्रमाणे पूर्वी मुलगा दत्तक घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक होते. परंतु, आता अनेक दाम्पत्यांचा कल मुलगी दत्तक घेण्याकडे वाढल्याचे दिसून येत आहे. दत्तक घेण्याचा प्रकार शेकडो वर्षांपासून सुरू आहे.
यात प्रामुख्याने मुलांचाच समावेश अधिक राहायचा. आपला वारसा चालत राहावा, हा यामागे हेतू होता.
गरिबीमुळे किंवा अनैतिक संबंधातून जन्मलेले बाळ सोडून देण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशी बेवारस मुले बाल समितीच्या माध्यमातून अनाथालयात जातात. दत्तक घेण्याच्या प्रवृत्तीतही बदल घडून येत आहे.
एक मूल असताना दुसरे मूल दत्तक घेतले जात आहे. मुलगा असेल, तर मुलगी आणि मुलगी असेल, तर मुलगा दत्तक घेण्याचे प्रमाणही वाढत आहेत. नागपूर जिल्ह्यात एकूण आठ अनाथालये आहेत. पालकांकडून एक ते तीन वर्षे वयाच्या मुलांना अधिक पसंती असते.
२४ हजार मुलांना हक्काचे पालक
सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स ॲथॉरिटीने (कारा) ऑगस्ट २०१५ पासून दत्तक प्रक्रिया ऑनलाइन केली. महाराष्ट्र राज्य दत्तक विधान संस्थेच्या माहितीनुसार पाच वर्षांत देशभरातील एकूण २४ हजारांवर मुलांना हक्काचे पालक मिळाले आहेत. त्यातील २१ हजार ८९५ मुले आपल्याच देशातील कुटुंबांत तर दोन हजार १७० मुले परदेशांतील कुटुंबांत दत्तक गेली आहेत. देशातील अन्य कोणत्याही राज्यांपेक्षा महाराष्ट्रात सर्वाधिक, म्हणजे दोन हजार ६४० मुलींना दत्तक घेतले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.