महाराष्ट्रातील पावसाचे वातावरण पुन्हा सक्रिय होत असून पुढील काही दिवस राज्यभरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काल पुणे शहरातील काही भागांमध्ये सायंकाळच्या दरम्यान जोरदार पावसाचा अनुभव आला. परतीचा पाऊस अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे शहरात पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. यावर्षी पावसाळ्यात रस्त्यांच्या दुरवस्थेने महानगरपालिकेवर मोठे आव्हान उभे केले आहे. पावसाळ्यानंतर उखडलेल्या रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करणं आवश्यक आहे, अन्यथा वाहतुकीस अडथळे निर्माण होतील. परतीच्या पावसामुळे आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळासह पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईत पुढील 24 तासांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहणार असून, हलक्या पावसाची शक्यता आहे. शहरातील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस असणार आहे. पुण्यातही ढगाळ आकाशासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, आणि तापमान 32 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याचा अंदाज आहे. किमान तापमान 20 अंश सेल्सिअस असेल.
नागपूरमध्ये ढगाळ आकाशासह हलका पाऊस होईल, तर तापमान 32 अंश सेल्सिअस असेल. नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये दुपारनंतर ढगाळ आकाश होण्याची शक्यता आहे, आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वादळासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यात 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात सलग 11 दिवस पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हा पाऊस झाला, तर मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. यापूर्वीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.