Manoj Jarange Maratha Reservation : मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी बोलावलेल्या बैठकीला मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जरांगे यांनी समाजासमोर दोन पर्याय दिले होते. त्यापैकी दुसऱ्या पर्यायाला सर्वांनी सहमती दर्शवली. त्यामुळे आता राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मराठा समाज पुरस्कृत एक अपक्ष उमेदवार उभा राहू शकतो. विशेष म्हणजे हा उमेदवार मराठा, धनगर, मुस्लिम, दलित या समाजाचाही असू शकतो.
बैठकीमध्ये बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, १७ ते १८ मतदारंसंघांवर मराठ्यांचं वर्चस्व आहे. मात्र सगळे फॉर्म भरत राहिलात तर मतं विखुरले जातील. त्यातून कुणाचंही साधू शकतं. मुळात आपलं लोकसभेत काही अडलेलं नाही. त्यामुळे अपक्ष म्हणून एकच फॉर्म जिल्ह्यातून टाकावा. मुख्यमंत्री शिंदे विनाकारण मराठा समाजाच्या नजरेतून उतरायला लागले आहेत, गरज नसताना लाट अंगावर घेत आहेत.
आपलं काम राज्य सरकारशी असल्याने आपण विधानसभा निवडणुकीत सरकारला हिसका दाखवू. अजूनही मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेतलेले नाहीत, मराठा-कुणबी एकच असताना ओबीसी आरक्षण मिळालेलं नाही. त्यामुळे सरकारला विधानसभेत धडा शिकवायचा आहे.
जरांगे पाटलांनी यावेळी समाजासमोर दोन पर्याय ठेवले होते. एक होता, सगळ्या पक्षातल्या उमेदवारांना पाठिंबा देऊन त्यांच्याकडून मराठा आरक्षणाचा मुद्दा बाँडवर लिहून घ्यायचा. पण लोकांना हे मान्य नव्हतं. दुसरा मुद्दा होता, प्रत्येक मतदारसंघातून एक अपक्ष उमेदवार द्यायचा. तो उमेदवार सगळ्या जाती-धर्माचा असणार. याला लोकांनी संमती दिली.
३० मार्चपर्यंत गावागावात बैठका घेऊन, डेटा आल्यावर प्रचाराला जायचं की नाही हे ठरवू असं मनोज जरांगेंनी सांगितलं. सरकारकडून मागत बसण्यापेक्षा तुम्ही सरकारमध्ये बसा आणि सत्ताधारी-देणारे बना, असं आवाहन यावेळी जरांगेंनी समाजबांधवांना केलं.
मनोज जरांगे यांच्या आजच्या बैठकीनंतर मराठा समाज प्रत्येक लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार उभा करणार, हे दिसून येत आहे. विशेष म्हणजे संभाव्य अपक्ष उमेदवार हा केवळ मराठा समाजाचा असणार नाही तर तो धनगर, दलित, मुस्लिम समाजातून देण्यात येणार असल्याचं स्पष्ट होत आहे. तसं झालं तर प्रस्थापित पक्षांची मोठी अडचण होऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.