Maratha Reservation: मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देण्यास प्रारंभ झाला असून ज्या मराठा बांधवांच्या पूर्वजांच्या कागदपत्रांवर कुणबी किंवा कुणबी- मराठा किंवा मराठा- कुणबी असा उल्लेख असेल तर त्याचे वंशज हे कुणबीच ठरतात, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.
सध्या जिल्ह्यात सर्वत्र कुणबी उल्लेख असलेल्या कागदपत्रांची शोधाशोध सुरू आहे. ज्या मराठा बांधवांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र हवे आहे त्यांनी संबंधित तहसीलदारांकडे अर्ज करणे, आवश्यक आहे.
कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी १३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्याच्या आधी जन्म झालेल्या तुमच्या रक्तनाते संबंधातील नातेवाईक म्हणजे वडील/ चुलते/आत्या, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा, वडिलांचे चुलते/आत्या, आजोबांचे चुलते/आत्या, पणजोबांचे चुलते/आत्या, खापर पणजोबांचे चुलते/आत्या यापैकी कुठल्याही एका नातेवाईकाचा कुणबी जात सिद्ध करणारा जातीचा पुरावा असणे आवश्यक आहे.
जातीचा पुरावा मिळवण्यासाठी काय कराल?
१रक्त संबंधातील नातेवाइकाचा प्राथमिक शाळा प्रवेश निर्गम उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला काढून त्यावर कुणबी नोंद आहे का ते तपासा. स्वातंत्र्यपूर्व काळात गावातील प्रत्येकाच्या जन्म-मृत्यूची नोंद त्याच्या जातीसह कोतवाल बुक किंवा गाव नमुना नं. १४ मध्ये ठेवली जात असे. पूर्वी या नोंदी दरमहा तहसील कार्यालयात पाठवल्या जायच्या. १ डिसेंबर १९६३ पासून कोतवाल पद महसूल विभागाकडे वर्ग झाल्यानंतर हे काम ग्रामसेवकाकडे देण्यात आले. आपल्या रक्तनाते संबंधातील नातेवाइकांचा जन्म किंवा मृत्यू झालेल्या गावाशी संबंधित तहसील कार्यालयात अर्ज करून त्याच्या नावाच्या गाव नमुना नं.१४ किंवा कोतवाल बुकाच्या नक्कलांची मागणी करावी. त्यात कुणबी नोंद आहे का? ते तपासा, त्या नोंदी मिळवा.
२ आपल्या कुळातील जुन्या महसुली कागदपत्रांपैकी वारस नोंदी (६ ड नोंदी), जमीन वाटप नोंदी, ७/१२ उतारे, ८अ उतारे, फेरफार, खरेदीखत, भाडेपट्टा, सातबारा अमलात येण्याआधी असणारे क.ड. ई. पत्र, सूडपत्र, खासरा पत्रक, हक्कपत्रक किंवा तत्सम इतर कुठल्याही महसुली कागदपत्रांमध्ये कुणबी जातीचा उल्लेख आहे का? ते शोधावे आणि असेल तर ते कागदपत्र काढून घ्यावे.
३ भूमी अभिलेख कार्यालयातील फॉर्म न. ३३ व ३४ वरील नोंदी तपासाव्यात, यातही सर्वत्र कुणबी नोंदी आढळून येतात. रक्तसंबंधातील नातेवाइक शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत असल्यास सर्व्हिस बुकच्या पहिल्या पानावर संबंधित कार्यालयाने त्या नातेवाइकाची कुणबी जात नोंद केलेली असल्यास त्याचा साक्षांकित केलेला उतारा घ्यावा.
४ रक्त संबंधातील नातेवाइकाने अगोदरच कुणबी जात प्रमाणपत्र काढले असेल तर त्याचे कुणबी जात प्रमाणपत्र आणि समाज कल्याण खात्याच्या छाननी समितीने वैध ठरवलेले त्याचे कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र हे सुद्धा जातीचा पुरावा म्हणून ग्राह्य मानले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.