Maratha Reservation Kolhapur Dasara Chowk Sabha Manoj Jarange-Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

गोचिडाप्रमाणं जनतेचं रक्त पिऊन जगलात, म्हणून तुमच्यावर तुरुंगात पिठलं-भाकरी खायची वेळ आली; जरांगेंचा भुजबळांवर पलटवार

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जीव गेला तरी हरकत नाही. एक इंचही मागे हटणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

मराठ्यांना शंभर टक्के ओबीसीत आरक्षण मिळणार असल्याने त्यांचा तिळपापड झाला आहे.

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जीव गेला तरी हरकत नाही. एक इंचही मागे हटणार नाही. ही न्यायाची लढाई असून, तिच्या आडवा कोण आला, तर त्याला सोडणार नाही, असा रोखठोक इशारा मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी येथे दिला.

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना वेळीच न रोखल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल; अन्यथा ही त्यांची भूमिका आहे का, याचा खुलासा करावा, असेही ते म्हणाले. सकल मराठा समाजातर्फे ऐतिहासिक दसरा चौकात आयोजित सभेत ते बोलत होते.

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व संभाजीराजे प्रमुख उपस्थित होते. पावणेपाच तास उशिरा सुरू झालेल्या सभेस मराठा बांधवांसह महिलांची उपस्थिती लक्षवेधी होती. जरांगे-पाटील यांनी गावा-गावांतील लोक रस्त्यावर उतरून स्वागत करत असल्याने सभेच्या ठिकाणी पोचण्यास उशीर झाल्याचे स्पष्ट करत दिलगिरी व्यक्त केली.

जरांगे-पाटील म्हणाले, ‘‘मराठ्यांना डावलून पुढे जाणारी माझी औलाद नाही. भले पाचजण जरी रस्त्यावर आले तरी मी त्यांना भेटतो. अनेक षड्‌यंत्र मोडीत काढत आरक्षण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे काळजी करू नका. मराठा समाजाला १८०५ ते १९६७ पर्यंत आरक्षण होते. त्याचे पुरावे शोधले असून, गावागावांत पुरावे सापडायला लागले आहेत. मग ते सत्तर वर्षे कोणी लपवून ठेवले?

आरक्षणासाठी ज्या समित्या नेमल्या, त्या समित्यांचे मराठ्यांकडे पुरावे नसल्याने त्यांना आरक्षण देता येणार नाही, असे म्हणणे होते. आता तर पुरावे सापडायला लागले आहेत. काही व्यक्तींचा सरकारवर इतका दबाव होता की, पुरावे सापडत नव्हते. तेच पुरावे आता कसे मिळतात, या प्रश्‍नाचे उत्तर मिळाल्याखेरीज स्वस्थ बसणार नाही. पुरावे मिळाल्यावरच आरक्षण मिळाले असते, तर मराठा ही जगात प्रगत जात म्हणून पुढे आली असती.’’

सामान्य मराठ्यांनी आंदोलन हातात घेऊन एकजूट दाखविल्यानंतर पुराव्यांचा अहवाल बनविणे सुरू झाले आहे, असे स्पष्ट करत ते म्हणाले, ‘‘हैदराबाद संस्थानातील नोंदीचा अहवाल बनवून सरसकट आरक्षण द्यायचे, असे आमचे व सरकारचे ठरले होते. तो सरकारला सादर झाल्यानंतर एक भाऊ खूश, तर दुसरा नाराज असे चालणार नाही, अशी भूमिका सरकारसमोर मांडली. त्यामुळे त्या समितीला राज्याचा दर्जा देऊन कुणबीच्या नोंदींचा शोध सुरू झाला. ज्यामुळे आरक्षणाचे दान पदरात पडायला सुरुवात झाली आहे. ज्यांनी आरक्षणाची आशा सोडली होती, त्यांनी पुन्हा शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे.’’

भुजबळांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधत जरांगे - पाटील म्हणाले, ‘‘मधल्या काळात मी त्यांच्यावर बोलायचे बंद केले होते. त्यावर मी त्यांच्या एकट्याच्या मागे लागलोय, असे त्यांचे म्हणणे होते. दोन-चार दिवसांनी पुन्हा त्यांचे सुरू झाले. मी तऱ्हेवाईक असल्याने मोठा दणका देतो. सरकारने त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवावे. समाजात दंगली घडवून आणण्याचे काम ते करत आहेत. त्यांना मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी रोखावे. आमचे बोर्ड फाडले जात आहेत.

आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाही; अन्यथा शांततेत बेमुदत उपोषण केले नसते. यापुढेही आंदोलन शांततेच होईल. सरकारने त्यांना थांबवावे; नाहीतर आमचा नाईलाज होईल. भाऊबंदकीत शेतीचा बांध फोडला तर आम्ही दोन-दोन पिढ्या एकमेकांशी बोलत नाही; मग आमचे आरक्षण कोणी खात असेल तर आम्ही काय करावे?’’

ते म्हणाले, ‘‘कुणबी शब्दात वाईट काय? आजोबा-पणजोबा कुणबी करतो म्हणायचे. त्याला सुधारित शब्द शेती आला. पायताणला चप्पल, वाड्याला हाउस आला. ज्याला कुणबी प्रमाणपत्र नको असेल, त्याने शेत विकून चंद्रावर राहायला जावे. स्वत:च्या डोक्यावर झाड लावावे. गोरगरिबांचे कल्याण होत असताना ज्यांना कुणबी प्रमाणपत्र नको असेल, त्यांनी घरी शांत राहावे. उगाच माती कालवू नये. मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का? आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना किंमत देऊ नका.’’

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व जरांगे-पाटील यांची गळाभेट...

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे-पाटील यांची भेट घेतली होती. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना दसरा चौकातील त्यांचे भाषण मराठा बांधवात बसून ऐकायचे होते; मात्र समन्वयकांनी व्यासपीठावर बसण्याचा आग्रह धरल्याने ते स्टेजवर आले. जरांगे-पाटील यांना पाहताच त्यांनी त्यांची गळाभेट घेतली. भाषणात आक्रमकता कमी ठेवत असल्याचे जरांगे-पाटील यांनी त्यांच्यासमोरच स्पष्ट केले.

मराठ्यांनो, बेसावध राहू नका!

चारी बाजूंनी मराठा समाजाला घेरले आहे. बेसावध राहू नका. कुणबीचे पुरावे असताना ते दाबून ठेवले होते. मराठ्यांना शंभर टक्के ओबीसीत आरक्षण मिळणार असल्याने त्यांचा तिळपापड झाला आहे. एका पठ्ठ्याला तर काही सुधारेना झाले आहे. तो टप्प्यात आला की मी वाजवलंच म्हणून समजा. मी शिवछत्रपतींचा मावळा आहे. कोणाला भीत नाही, की कोणाला भीणारही नाही, असा इशारा जरांगे-पाटील यांनी दिला.

स्वत:च्या लेकराला मोठे करा

कुणबीच्या नोंदीचा कायदा कोणत्याही परिस्थितीत पारित होणार असून, सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. मराठा समाज ओबीसी आरक्षणात गेला, असे समजाच. ते जर झाले नाही, तर २५ डिसेंबरनंतर मतभेद, राजकारण बाजूला ठेवून ‘साहेबांचे’ पॉम्पलेट कोठे लावू नका. आपण तर भयानक साहेब निर्माण केले आहेत. त्यांना आपल्याच बाप-जाद्यांनी मोठे केले आहे. तोच साहेब आता आपल्या मदतीला येत नाही. त्याची मुले परदेशात शिकत आहेत. त्याला आपण ‘भैय्यासाहेब’ म्हणतोय, तर आपणच मुलांना नाम्या, तुक्या म्हणत आहोत. भैय्यासाहेबाला मोठे करायचे बंद करा आणि स्वत:च्या लेकराला मोठे करा, असा सल्लाही जरांगे-पाटील यांनी दिला.

त्यांचे डाव उधळून लावले!

माझे बेमुदत उपोषण थांबवण्यासाठी एक मातब्बर मंत्री आला. डॉक्टरने तर मला एक मुत्रपिंडच नसल्याचे सांगितले; पण, मी त्या सर्वांचे डाव समाजाच्या ताकदीवर उधळून लावले. मी निब्बार माथ्याचा असल्याची त्यांची पक्की समजूत झाली आहे. मुंबईत बसणाऱ्यांपासून सावध राहा. ही संधी पुन्हा येणार नाही. त्याचे सोने करा, असे आवाहन जरांगे-पाटील यांनी केले.

स्वप्नांची राखरांगोळी

काबाडकष्टातून शिकवूनही ना बापाचे, ना मुलाचे स्वप्न पूर्ण होत नव्हते. बाप ना चप्पल घालायचा, ना त्याला चांगले कपडे होते. तो पोटभर खायचाही नाही. केवळ लेकराला शिकवायचा, असा प्रकार सुरू होता. केवळ आरक्षणापायी त्यांचा घात झाला. त्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. मुलांचे आयुष्य उद्‌ध्वस्त झाले. आता मात्र एकजूट ठेवा, असे कळकळीचे आवाहन जरांगे-पाटील यांनी केले.

पोटातले आले ओठांवर

मला मुख्यमंत्री व्हायचे आहे, असे भुजबळांना वाटत असल्याचे मला समजले आहे. मग अजितदादा, फडणवीसांचे काय? की भुजबळांनाच मुख्यमंत्री व्हायचे आहे? त्यांच्या पोटातले ओठांवर आल्याचे दिसत आहे, असा टोला जरांगे-पाटील यांनी लगावला.

तुम्ही गोचिडाप्रमाणे रक्त प्यायला!

छगन भुजबळ यांचे नाव न घेता जरांगे-पाटील म्हणाले, ‘‘त्यांचा मी व्यक्ती म्हणून आदर करत होतो. विचाराला मात्र विरोध होता. त्यांच्याशी शत्रुत्व नव्हते. त्यांनी पातळी सोडली आहे. ते, मी सासरवाडीतलं खातो, असे म्हणत आहेत. त्यांनी मुंबईला काय केले? कोणत्या पाहुण्याकडे जेवले, हे सांगायचे ठरवले, तर त्यांचे अवघड होईल. आम्ही घाम गाळून खातो. तुम्ही गोचिडाप्रमाणे जनतेचे रक्त पिऊन जगलात. आमच्या बापजाद्यांचा पैसा लुबाडलात. एकवेळचे जेवण करायला तुमच्याकडे पैसे नव्हते. दुसऱ्याचे रक्त पिऊन जगलात म्हणून तुरुंगात पिठलं-भाकरी खायची तुमच्यावर वेळ आली. तुम्हाला जनतेचा तळतळाट लागला.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT