सोलापूर : मराठा आरक्षणासाठी राज्यभर सुरू असलेल्या शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याची सुरवात सोलापूर शहरातून होणार आहे. बुधवारी (ता.७) दुपारी १२ वाजता धर्मवीर संभाजी महाराज चौकात मनोज जरांगे पाटील यांचे आगमन होणार असून त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांची सभा होणार आहे.
मनोज जरांगे-पाटील यांच्या शांतता रॅलीला मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. मराठा समाज ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण देण्यात यावे, या मागणीवर ते ठाम असून, पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रात शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरवात करण्यात येत आहे. यासाठी शुक्रवारी मनोज जरांगे-पाटील यांच्या शिष्टमंडळाने सोलापूर येथील सभास्थळाला भेट देऊन पाहणी केली. या शिष्टमंडळात प्रदीप सांळुखे, किशोर कारट व इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर विचारपीठाचे पूजनही करण्यात आले.
शेतकऱ्याची मुलगी करणार स्वागत
सकल मराठा समाजाच्या ५८ शांतता मोर्चाचे निवेदन ज्याप्रमाणे केवळ लहान मुलींच्या हस्ते देण्यात येत होते, त्याप्रमाणे बुधवारच्या शांतता रॅलीतही कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांऐवजी शेतकऱ्याच्या मुलीच्या हस्ते मनोज जरांगे-पाटील यांचे स्वागत करण्यात येणार आहे. सभेच्या वेळी विचारपीठावरही फक्त मनोज जरांगे-पाटील हे एकटेच असतील.
पार्किंगची व्यवस्था...
पुणे रस्त्यावरून येणारी वाहने (बार्शी, मोहोळ, उत्तर सोलापूर) : अवंतीनगर येथील दुतर्फा रस्ता व बसवंती पार्किंग रुपाभवानी रोड, महामार्गाचा सर्व्हिस रोड.
तुळजापूर रोडवरून येणारी वाहने : जव्हर मळा येथील पार्किंग
मंगळवेढा रोड : जुनी मिल कंपाउंड, एक्झिबिशन सेंटर, सीएनएससमोरील बंद रस्ता
अक्कलकोट, विजयपूर रोड : होम मैदान
-------------------------------------------------------------
‘या’ आहेत सुविधा...
दोन आपत्कालीन रुग्णालये, दोन्ही ठिकाणी रुग्णवाहिकेसह उपचाराची सुविधा
ठिकठिकाणी खाद्य पदार्थ व पाणी वाटपाचे स्टॉल
पार्किंगच्या ठिकाणी व मार्गावर मार्गदर्शनासाठी स्वयंसेवक
सोलापूर शहरातील मराठा बांधवांची सहकुटुंब उपस्थिती
ठिकठिकाणी मोबाईल टॉयलेटची सुविधा
२०१६ च्या मोर्चापेक्षा मोठ्या रॅलीचे नियोजन
मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रित यावे
मनोज जरांगे-पाटील यांचा लढा संपूर्ण मराठा समाजासाठी आहे. यासाठी मराठा समाजातील सर्व राजकीय नेत्यांनी राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून या लढ्यात उतरावे. समाजाला न्याय देण्याची ही शेवटची संधी आहे. ही लढाई मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रित येऊन लढवायची आहे.
- अमोल शिंदे, समन्वयक, सकल मराठा समाज
-----------------------------------------------------
बारा लाखांपर्यंत लोक रॅलीत सहभागी होतील
२०१६ च्या मोर्चापेक्षा मोठी रॅली काढण्याचे नियोजन केले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मागील अनेक दिवसांपासून दौरे सुरू आहेत. समाज बांधवातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. अकरा ते बारा लाख लोक या रॅलीत सहभागी होतील असा अंदाज आहे. जिल्ह्याप्रमाणेच शहरातूनही यासाठी जनजागृती करण्यात आली आहे.
- माऊली पवार, समन्वयक, सकल मराठा समाज
ग्रामीणमध्ये रस्ता बंदोबस्त; शहरातही बंदोबस्ताचे नियोजन
तुळजापूर येथून मनोज जरांगे-पाटील सोलापूरला येणार आहेत. धाराशिव हद्दीतून सोलापूर ग्रामीणच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर सोलापूर तालुका पोलिस ठाण्यांकडून रस्त्यावर बंदोबस्त नेमला जाणार आहे. त्यानंतर सोलापूर शहरातील रॅली आटोपून ते कामतीमार्गे मंगळवेढ्याला जाणार आहेत. त्यावेळी ग्रामीण पोलिसांचा रोड बंदोबस्त नेमलेला असणार आहे. तुळजापूरहून जरांगे-पाटील यांचे धर्मवीर संभाजीराजे चौकात आगमन होईल. तेथून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात येणार आहेत. त्याठिकाणी त्यांची सभा होणार आहे. यावेळी शहर पोलिसांकडून बंदोबस्त नेमला जाणार आहे. त्यासंदर्भातील नियोजन शहर पोलिसांकडून सुरू आहे. दोन दिवसांत त्याचे नियोजन होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.