धुळे : बहुचर्चित धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (Dhule-Nandurbar District Bank) १७ जागांसाठीची पंचवार्षिक निवडणूक (Election) बिनविरोध होण्यासाठी धुळे जिल्ह्यातून महत्प्रयत्न सुरू आहेत. यात महाआघाडी (Mahavikas Aghadi) व भाजपतर्फे (BJP) सर्वाधिकार माजी शालेय शिक्षणमंत्री तथा विधान परिषदेचे आमदार अमरिशभाई पटेल (MLA Amrishbhai Patel) यांना बहाल झाले आहेत. यंदा बँकेचे अध्यक्षपद नंदुरबार जिल्ह्याला मिळावे, अशी शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी (MLA Chandrakant Raghuvanshi) व नंदुरबारमधील काही नेत्यांची इच्छा आहे. ती किती फळास येते याकडे सर्वांचे लक्ष असेल.
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रथम जागावाटपाच्या फॉर्म्युल्यासह सर्वपक्षीय पॅनलचा प्रयत्न झाला. नंतर त्यातून काँग्रेसने माघार घेतल्याने तेथे भाजपविरोधात इतर विरोधक एकत्र आले. या धर्तीवर धुळे जिल्ह्यातूनही जिल्हा बँकेची स्थानिक निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रस्ताव मांडला गेला. जळगावइतकी प्रमुख राजकीय पक्षांची आक्रमकता धुळे व नंदुरबार जिल्ह्यात दिसून येत नसल्याने ही निवडणूक येथे बिनविरोध होण्याची अटकळ बांधली जात आहे.
राजकीय चिमटे अन् कोटी...
सहा दिवसांपूर्वी निवडणूक जाहीर होण्यावेळी धुळे शहरात प्रमुख पक्षांचे नेते, पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात धुळे जिल्ह्यातून भाजप व महाविकास आघाडीचे मिळून सर्वपक्षीय पॅनलद्वारे वाटेच्या जागा बिनविरोध होण्यास कुठलाही अडसर नसल्याचा दावा झाला होता. याबाबत नंदुरबार जिल्ह्यातूनही विरोध होऊ नये म्हणून प्रयत्न केले जावेत, असे सुचविले होते. बैठकीत गमतीजमती होत असताना एकमेकांना राजकीय चिमटे काढण्याची संधी उपस्थित काही नेते, पदाधिकाऱ्यांनी सोडली नाही. यात जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी नंदुरबारमधील शिवसेनेचे नेते माजी आमदार रघुवंशी यांच्या मनधरणीचा प्रयत्न आमदार रावल यांनी करावा, ते नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांचे नेते रघुवंशी यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित झाले. त्यामुळे आमदार रावल यांनी नेते रघुवंशी यांना निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मनवावे, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सनेर यांनी सांगताच हशा पिकला. तसेच ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा करायचा असेल तर राज्यपालांच्या पटलावर असलेला चंदुभय्यांचा आमदारकीचा मार्ग मोकळा करावा, अशी कोटी आमदार पाटील यांनी करताच पुन्हा हशा पिकला. यावरून ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी धुळे जिल्ह्यातील प्रमुख पक्षीय नेत्यांना चंदुभय्यांची मनधरणी करावी लागेल, असे स्पष्ट होते. त्यानुसार कसोशीने प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, धुळे जिल्ह्यातून निवडणुकीबाबत विविध पक्षीय सर्वाधिकार अमरिशभाईंना बहाल केले आहेत. ते धुळे आणि नंदुरबार विधान परिषद मतदारसंघाचे आमदार असल्याने स्थिती सावरतील, बरेच अडसर दूर करू शकतील, अशी अटकळ इतर नेत्यांना आहे. धुळे-नंदुरबार जिल्हा बँक निवडणुकीनिमित्त महाआघाडी आणि भाजपचे मिळून सर्वपक्षीय पॅनल होते का; की जळगाव बँकेच्या निवडणुकीप्रमाणे राजकीय ताटातूट होते याकडे सर्वांचे लक्ष असेल. या सर्व घडामोडींमध्ये नेते अमरिशभाई, रघुवंशी आणि नंदुरबार जिल्ह्याची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
संयुक्त बैठक रविवारनंतर शक्य
नेते अमरिशभाई आणि आदिवासी विकासमंत्री ॲड. के. सी. पाडवी रविवार (ता. २४)पर्यंत उपलब्ध नाहीत. ते रविवार (ता. २४)नंतर अनुक्रमे शिरपूर व नंदुरबार येथे येण्याची शक्यता असेल. यानंतरच धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख पक्षीय नेत्यांची संयुक्त बैठक होऊन जागावाटपाची प्रक्रिया पार पडू शकेल. तसेच दिवाळी गोड जावी म्हणून माघारीच्या अंतिम मुदतीतील ८ नोव्हेंबरपूर्वी दोन ते तीन दिवस अगोदर निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न होतील, असे राजकीय गोटातून सांगण्यात येते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.