राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे की नाही असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.
मुंबई - आरोग्य भरती घोटाळा, पेपरफुटी प्रकरण ताजं असतानाच राज्यात म्हाडाच्या परीक्षा (MHADA Exam Cancelled) ऐनवेळी रद्द केल्यानं विद्यार्थ्यांचा संताप व्यक्त केला जात आहे. यावरून आता राज्यात महाविकास आघाडी सरकारवर (Maha vikas Aghadi) टीका केली जातेय. राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनीही महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटरवर, राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे की नाही असा सवाल विचारला आहे. नोकरी देऊ शकत नसाल तर अशी थट्टा तरी करू नका असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
म्हाडाकडून (MHADA) आयोजित केली गेलेली ५६५ जागांसाठीची परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने पुन्हा एकदा मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. फडणवीस म्हणाले की, आरोग्य भरती परीक्षेचा घोळ, पेपर फुटीचे धागेदोरे आरोग्य संचालनालयापर्यंत सापडले. आता म्हाडाच्या परीक्षेतही तेच घोळ, मध्यरात्री परीक्षा रद्द करण्याची वेळ आलीय.
सरकारकडून मात्र या सगळ्यावर मौन बाळगलं जात असल्याचा आरोप करताना फडणवीस यांनी म्हटलं की, सरकारी भरतीचा हा बट्ट्याबोळ आणि राज्य सरकार काहीच बोलायला तयार नाही. भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस गाठला असल्याची टीका फडणवीस यांनी केली.
राज्य सरकारवर प्रश्नांची सरबत्ती करताना फडणवीस यांनी म्हटलं की, किती दिवस आणि किती वेळा हे सहन करायचे? राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे की नाही? आज पुन्हा लाखो विद्यार्थ्यांना फटका बसलाय. पण सरकार म्हणून कुणी याची जबाबदारी घेणार की नाही? असे प्रश्न फडणवीसांनी विचारले आहेत.
नोकरी देऊ शकत नसाल तर किमान त्यांची अशी थट्टा तर करू नका दोषींवर कठोर कारवाई कराच अशी मागणीही फडणवीस यांनी ट्विटरवर केली. राज्यातील भरती प्रक्रियेतील गोंधळामुळे विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे मानसिक खच्चीकरण आणि दुसरीकडे आर्थिक भुर्दंडाला विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.