Milind Narvekar
Milind Narvekar sakal
महाराष्ट्र

Milind Narvekar: मिलिंद नार्वेकर यांच्या उमेदवारीने चुरस वाढली;विधान परिषद निवडणूकः अकरा जागांसाठी बारा उमेदवार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : विधानसभेत अपुरे संख्याबळ असतानाही महाविकास आघाडीने विधान परिषद निवडणुकीत तिसरा उमेदवार रिंगणात उतरवल्याने या निवडणुकीतील चुरस वाढली आहे. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मंगळवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. शिवसेना ठाकरे गटाचे ऐनवेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिल्याने निवडणुकीतील रंगात वाढली आहे. उमेदवारी अर्जांची बुधवारी (ता. ३) छाननी होणार असून पाच जुलैला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत आहे. त्यामुळे अर्ज माघारीच्या दिवशी विधान परिषद निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

मिलिंद नार्वेकर यांचे नाव सुरूवातीला चर्चेत नसल्याने निवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. विधान परिषदेच्या ११ सदस्यांची मुदत येत्या २७ जुलै २०२४ रोजी संपत आहे. या रिक्त हहोणाऱ्या ११ जागांसाठी १२ जुलै २०२४ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यानुसार भाजपच्या पाच, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रत्येकी दोन तर काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येकी एका उमेदवाराने आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे सध्या ११ जागांसाठी १२ अर्ज आल्याने विधान परिषद निवडणुकीची शक्यता वाढली आहे.

महाविकास आघाडीने सुरुवातीला दोन जागा लढविण्याची तयारी केली होती. यापैकी एक जागा काँग्रेस लढणार आणि दुसऱ्या जागेसाठी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा देतील, असे ठरविण्यात आले होते. मात्र, ठाकरे गटाने सोमवारी रात्री मिलिंद नार्वेकर यांची उमेदवारी जाहीर केल्याने विधान परिषद निवडणुकीची समीकरणे बदलली आहेत. नार्वेकर यांच्या उमेदवारीमुळे शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सावध झाला आहे.

लोकसभेवर झालेली निवड, आमदारांचे राजीनामे आणि सदस्यांचे निधन यामुळे विधानसभेचे संख्याबळ सध्या २७४ इतके आहे. परिणामी विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी मतांचा कोटा कमी झाला असून तो २३ वर आला आहे. विधानसभेत काँग्रेसचे ३७, उद्धव ठाकरे गटाचे १५ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे १३ असे एकूण महाविकास आघाडीचे ६५ आमदार आहेत. क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख ठाकरे गटासोबत आहेत. त्यामुळे आघाडीचे संख्याबळ ६६ पर्यंत जाते.

आघाडीला आपले तीनही उमेदवार निवडून आणण्यासाठी ६९ मतांची गरज असल्याने आणखी तीन मतांसाठी आघाडीची मदार समाजवादी, एमआयएम, कम्युनिस्ट पक्ष या छोट्या पक्षांवर तसेच अपक्ष आमदारांवर असणार आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मते फुटून काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. त्यामुळे काँग्रेस आपल्या उमेदवारीसाठी मतांचा कोटा हा २३ ना ठेवता ३० पर्यंत वाढवला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रे शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाला तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी अतिरिक्त मतांची जमवाजमव करावी लागू शकते.

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाने या निवडणुकीसाठी मावळत्या आमदार मनीषा कायंदे यांना पुन्हा उमेदवारी नाकारली असून भाजपच्या आग्रहामुळे लोकसभा निवडणुकीत तिकीट कापावे लागलेल्या भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) परभणीतील नेते राजेश विटेकर आणि पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांना उमेदवारी दिली आहे. ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकर आणि शेकापच्या जयंत पाटील यांनीही आज उमेदवारी अर्ज भरले.

आज अर्ज दाखल केलेले उमेदवार

  • भाजप : पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत

  • शिवसेना (शिंदे गट) : भावना गवळी, कृपाल तुमाने

  • राष्ट्रवादी (अजित पवार गट) : राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे

  • काँग्रेस : डॉ. प्रज्ञा सातव

  • शिवसेना (ठाकरे गट) : मिलिंद नार्वेकर

  • शेकाप : जयंत प्रभाकर पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News Updates : मुंबईला पावसाने झोडपले; 6 तासांत पडला 300 मिमी पेक्षा अधिक पाऊस

Mumbai Worli Hit and Run: शिवसेनेच्या नेत्याचा मुलगा, दहावी पास...वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहा कोण आहे?

Euro 2024 : इंग्लंडची पेनल्टींवर बाजी! स्वित्झर्लंडविरुद्ध विजयात गोलरक्षक पिकफोर्ड अभेद्य

Rain Update: महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अतिमुसळधार... मुंबई-कोकणासाठी धोक्याची घंटा! रेल्वेसेवा विस्कळीत, महामार्ग बंद

Zika Virus : पुण्यात झिकाचे आणखी दोन नवीन रुग्ण; रुग्णांची संख्या अकरावर

SCROLL FOR NEXT