Jayakumar Gore vs Sharad Pawar  esakal
महाराष्ट्र बातम्या

'माणचं नव्हे, तर शरद पवारांचं राजकारण मी नासवलंय'

केराप्पा काळेल

'पवारांचा सच्चा सैनिक म्हणविणारे देशमुख भाजपमध्ये घ्या म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या हातापाया पडत होते.'

कुकुडवाड (सातारा) : मला माझ्या मतदारसंघाचा विकास करायची, पाणी योजना पूर्ण करायची मस्ती आहेच. मी माणचे नव्हे, तर शरद पवारांचे (Sharad Pawar) राजकारण नासवलंय हे जिल्ह्याला माहित आहे. पवारांचा सच्चा सैनिक म्हणविणारे प्रभाकर देशमुख (Prabhakar Deshmukh) भाजपमध्ये घ्या म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) हातापाया पडत होते. पवारांनी कायम सहकार्य केलेले देशमुख निवृत्तीनंतर पवारांचाच कार्यक्रम करायला निघाले होते, असा गौप्यस्फोट आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांनी केलाय. जनतेला लुबाडून भ्रष्टाचाराने गोळा केलेली त्यांची संपत्ती लवकरच रडारवर येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय.

विरळी येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनानंतर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar), भाजपाचे (BJP) तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, माजी नगराध्यक्ष धनाजी जाधव, सिध्दार्थ गुंडगे, लिंगराज साखरे, बाळासाहेब माने, धर्मदेव पुकळे, सरपंच प्रशांत गोरड, बबनराव काळे, धनाजी कदम, नरळे साहेब, अमर गोरड, हेमंत नलवडे, आप्पासाहेब आटपडकर, सोपानराव गोरड, गावोगावचे सरपंच-उपसरपंच आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार गोरे पुढे म्हणाले, विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) रावणरुपी लुटारु देशमुखांनी कधी नव्हे ते मतदारसंघात जातीपातीचे राजकारण केले. पैशांच्या जीवावर ८८ हजार मते घेतली. मात्र, कोरोना काळात ते कुलूपबंद होते. ते गायब असल्याची बोंबाबोंब सुरु झाल्यावर शेवटी शेवटी विविध कंपन्यांकडून काही पैसे आणायचे नाटक करताना त्यातही भ्रष्टाचार केला. लोधवडेतील देशमुखांच्या उसालाही मी आणलेले उरमोडीचे पाणी मिळते. मी मतदारसंघात आल्यावरच पाणी आडवा पाणी जीरवा संकल्पना सुरु झाली. साखळी सिमेंट बंधारे माझ्याच काळात झालेत, त्यामुळे जयकुमारचे नाव घ्यायचीही देशमुखांची लायकी नाही. मी त्यांच्यासारखा लुटारु रावण नाही. माण-खटावच्या जनतेचा मी सेवक आहे. मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवायला मला पुन्हा आमदार व्हायचे आहे, त्यासाठी तुमच्यासारख्या बाजारबुणग्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. नोकरीत असताना महत्वपूर्ण पदे भोगली, मात्र तेव्हा कुणाला नोकरीला लावले नाही. सीओ असताना एमआयडीसीसाठी काही केले नाही. आम्ही अगोदर पाणी आणले आणि नंतर एमआयडीसी (Maan MIDC) मंजूर करुन घेतली. फाटलेल्या आभाळाला टाके घालायचे काम मी गेली १२ वर्षे करतोय.

१४३ कोटींच्या निधीतून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी नेण्याची कामे सुरु आहेत. माझ्या मतदारसंघातील सर्व भागात पाणी नेल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. माणमधील २४ पैकी १८ सोसायट्या आमच्या ताब्यात आल्यात, पण आम्ही मस्ती केली नाही. देशमुख मात्र थोड्या सोसायट्या ताब्यात येताच हुरळून गेले आहेत. नोकरीत त्यांना पगार किती होता, त्यांच्याकडे किती संपत्ती आहे याची लवकरच चौकशी होणार आहे. त्यांच्याकडील माल बघून त्यांचीच पार्टी त्यांना सोडत नाही. जनताही तुम्हाला सोडणार नाही. लवकरच जिहे-कठापूरच्या पाण्याने अंघोळ घालून त्यांचे शुध्दीकरण करावे लागणार असल्याचा टोलाही गोरेंनी लगावला.

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, जयाभाऊ देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. त्यांनी माण-खटावच्या जिहे-कठापूरसाठी मोठ्या निधीची तरतूद केली आहे. जयाभाऊंच्या रुपाने दुष्काळी भागाचा आवाज विधानसभेत यापुढेही बुलंद राहणे गरजेचे आहे. जयाभाऊंचे पैसेवाले विरोधक भ्रष्टाचारी आहेत. त्यांच्याकडे हजारो कोटींचे संपत्ती कुठून आली याची चौकशी होवून ते नक्कीच जेलमध्ये जाणार आहेत. प्रत्येक अडचणीत केंद्रानेच राज्याला मदत केली आहे. मात्र, अनैसर्गिक आघाडीतून जन्माला आलेले आघाडी सरकार रोज केंद्राविरोधात बोंब मारत आहे. प्रास्ताविक जाधव गुरुजींनी केले. शिवाजीराव शिंदे, सरपंच प्रशांत गोरड यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात जलदूत, कोरोना योध्दे आणि सोसायटीच्या नूतन संचालकांचा गौरव करण्यात आला.

सेटलमेंट करत नाही, छाताडावर बसून पुढे जातो

माझी औलाद तुमच्यासारखी सेटलमेंट करणारी नाही. छाताडावर बसून मी पुढे जातो. जिल्हा बॅंक निवडणुकीत ३ जागा मिळत होत्या, पण डाग लागायला नको म्हणून घेतल्या नाहीत. बॅंकेत मनोज पोळांचा पराभव देशमुखांमुळेच झाला असेही आमदार गोरेंनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT