मुंबई : अमरावतीचे खासदार आणि बडनेऱ्याचा आमदार हा भाजपचा असेल असं वक्तव्य भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. त्यानंतर राणा हे भाजपसोबत असून बावनकुळे यांचं वक्तव्य सूचक आहे असं मतही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. त्यामुळे नवनीत राणा आणि रवी राणा हे भाजपकडून निवडणूक लढवणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत पण नवनीत राणा यांनी आपल्या खासदारकीचं श्रेय कधी शरद पवारांना तर कधी देवेंद्र फडणवीसांना दिल्याचं चित्र पहायला मिळालं आहे.
(Navneet Rana)
"मला पवार साहेबांनी 2019 च्या लोकसभेच्या आशिर्वाद दिला नसता तर मी माझ्या उभ्या आयुष्याच खासदार झाली नसते." असं वक्तव्य नवनीत राणा यांनी एका भाषणात केलं होतं. तर आज अमरावती येथे आयोजित केलेल्या दहिहंडी कार्यक्रमातील भाषणात त्या म्हणाल्या की, "२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस माझ्यासोबत असते तर मी खासदार झाले असते. त्यावेळी ते आमच्यासोबत नव्हते त्यामुळे मी खासदार होऊ शकले नाही. पण आज मी त्यांच्यामुळे खासदार आहे." असं बोलत त्यांनी आपल्या खासदारकीचं श्रेय फडणवीसांना दिलं आहे.
दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकांत नवनीत राणा यांच्याविरोधात शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ हे उमेदवार होते. राणा या अपक्ष असल्यामुळे त्यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर राणा यांनी अडसूळांचा पराभव करून विजय मिळवला होता. त्यानंतर आता त्यांनी भाजपचा आणि फडणवीसांचा पाठिंबा असल्यामुळे मी खासदार झाले असं वक्तव्य केल्यामुळे फडणवीसांनी तात्कालीन युती असलेल्या शिवसेनेच्या उमेदवाराला पाडण्यासाठी नवनीत राणांना मदत केली का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
त्याचबरोबर आमदार रवी राणा यांनी बावनकुळे आणि फडणवीसांच्या वक्तव्यावर बोलताना, फडणवीस हे आमचे बंधू आहेत, आम्ही कायम भाजपसोबतच आहोत असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता राणा दाम्पत्य हे येत्या निवडणुकांत भाजपकडून लढणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.