मुंबई : महाराष्ट्रात 51 नाट्यगृहांची परिस्थिती खूप बिकट आहे. त्यांच्या डागडुजीचे आणि दुरुस्तीचे काम सरकार लवकरच करेल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. प्रशांत दामले यांनी काम केलेल्या नाटकांचा 12,500 वा प्रयोग आज माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी विक्रमादित्य अभिनेते प्रशांत दामले यांनी मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातील नाट्यगृहांची स्थीती खूप बिकट आहे.त्यांची डागडुजी करणे आवश्यक आहे ,अशी विनंती केली. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी विभागीय अधिकाऱ्याची नेमणूक करुन सर्व्हे करून आणि कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
मुख्यमंत्री म्हणाले," मराठी चित्रपटसृष्टी व नाट्यसृष्टीच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे. त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या आम्ही लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करू." यानंतर विक्रमादित्य अभिनेते प्रशांत दामले यांच्या 12,500 व्या प्रयोगाला संबोधताना मुख्यमंत्री म्हणाले," आम्ही देखील साडे तीन महिन्यांपूर्वी एक महानाट्य केले. त्याचे पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रात चांगले पडसाड उमटताना दिसत आहेत. परंतु 12,500 प्रयोग करून आज प्रशांत दामले यांनी इतिहास रचला आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स चे सौरभ गाडगीळ, अभिनेते दिलीप जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकाचा 530वा प्रयोग रंगला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मानपत्र देऊन विक्रमादित्य प्रशांत दामले यांचा सन्मान करण्यात आला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले," आज प्रशांत दामले यांनी 12,500 प्रयोग करत इतिहास रचला. मराठी नाट्यसृष्टी ज्याप्रकारे विष्णुदास भावे यांच्या नावाने ओळखली जाते त्याचप्रकारे भविष्यात मराठी नाट्यसृष्टीच्या इतिहासात विष्णुदास भावेंप्रमाणेच प्रशांत दामले यांचे देखील नाव आवर्जून घेतले जाईल हे मात्र निश्चित. कलेची अविरतपणे सेवा करणाऱ्या प्रशांत दामले यांचे आणखी 25,000 प्रयोग होवोत हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना.
राज ठाकरे म्हणाले," आज या 12,500 प्रयोगांची सरासरी वेळ पाहता प्रशांत दामले यांनी आपल्या आयुष्यातील जवळपास 1,562 दिवस रंगभूमीची सेवा केली. मुख्य म्हणजे एवढे वर्ष आपल्या चेहऱ्यावरील कुतूहल जपणे खूप अवघड असते परंतु ते त्यांनी अतिशय प्रभावीपणे निभावले यासाठी त्यांचे विशेष कौतुक. मला असे वाटते आज आपल्या देशात जी काही कलाकार मंडळी आहेत ती जर इथे जन्मली नसती तर या देशात कधीच अराजक आले असते. आपण या कलाकारांच्या कलेत गुंतून राहतो त्यामुळेच आपण वाईट विचारांपासून दूर राहिलो आहोत. परंतु दुर्दैवाने त्यांची पुरेशी दाद घेतली जात नाही. मी एकदा रोम मध्ये गेलो होतो. तेव्हा तेथील विमानतळाला लिओनार्दो द विन्सी यांचे नाव दिले होते परंतु आपल्याकडे कलाकारांची अशी दाद घेतली जात नाही. फक्त चौकांना कलाकारांचे नाव दिले जाते. आपण प्रतिमा जपतो प्रतिभा जपत नाही"
प्रशांत दामले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. त्यानंतर ते म्हणाले," मला आज या क्षेत्रात 39 वर्षे झाली. आतापर्यंत चांगली संहिता, चांगले सहकलाकार, चांगले तंत्रज्ञ असलेली नाटके मिळाली हे मी माझे भाग्य समझतो . मराठी माणूस हा नाटक वेडा आहे. त्यामुळे मराठी नाटके बघायला प्रेक्षक निश्चित येतात."
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने केले
यावेळी प्रेक्षकांनी प्रशांत दामले यांना पद्मश्री पुरस्कार मिळावा असे सुचवले. ही बाब संकर्षण कऱ्हाडेने उपस्थित मान्यवरांच्या हे निदर्शनास आणता देवेंद्र फडणवीस म्हणाले," आम्ही या पूर्वीच त्यांचे नाव सुचवले आहे. "
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.