mpsc solapur sakal
महाराष्ट्र बातम्या

महापालिकेतील लिपिकाची मुलगी ‘MPSC’त राज्यात प्रथम! दोनदा थोडक्यात संधी हुकली, पण जिद्द सोडली नाही, शेवटी तो क्षण आलाच...

कौटुंबिक परिस्थिती मध्यम, वडील सोलापूर महापालिकेत लिपिक, आई घरकाम करते. आई-वडिलांचे स्वप्न, पोलिस खात्यातील मामा व भावाचे प्रोत्साहन घेऊन स्वप्नपूर्तीसाठी ‘एमपीएससी’च्या तयारीसाठी पुण्यात गेलेल्या सुप्रिया सुभाष टाकळीकरने तिसऱ्या प्रयत्नात यश मिळविले आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : कौटुंबिक परिस्थिती मध्यम, वडील सोलापूर महापालिकेत लिपिक, आई घरकाम करते. आई-वडिलांचे स्वप्न आणि पोलिस खात्यातील मामा व भावाचे प्रोत्साहन घेऊन स्वप्नपूर्तीसाठी ‘एमपीएससी’च्या तयारीसाठी पुण्यात गेलेल्या सुप्रिया सुभाष टाकळीकर हिने तिसऱ्या प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य कर निरीक्षक (एसटीआय) परीक्षेत मुलींमधून राज्यात पहिला क्रमांक पटकाविला.

सोलापूर शहरातील स्वागत नगरातील सुभाष टाकळीकर सोलापूर महापालिकेत लिपिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे मेव्हणे विजयकुमार बादोले व हणमंतराव बादोले हे दोघेही पोलिस खात्यात अधिकारी आहेत. त्यांच्याप्रमाणे आपलीही मुलगी अधिकारी व्हावी हे स्वप्न सुभाष टाकळीकर यांनी पाहिले. आई कलावती यांनाही वाटायचे मुलगी सुप्रिया निश्चितपणे अधिकारी होईल. त्यांनी मुलगा-मुलगी भेदभाव न करता मुलाप्रमाणे मुलीला शिक्षणासाठी मोकळीक दिली. सुप्रियाचे शालेय शिक्षण लष्कर परिसरातील मॉडर्न हायस्कूल येथे झाले. बारावीपर्यंत संगमेश्वर महाविद्यालयात आणि त्यानंतर पदवीचे शिक्षण पुण्यातील इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी येथे पूर्ण केले. अभ्यास नेहमीच पुढे असलेली सुप्रिया नक्की अधिकारी होऊ शकते हा विश्वास तिच्या आई-वडिलांना होता. त्यामुळे पुण्यात पदवीपर्यंत शिक्षण घेऊन अभियंता झालेल्या सुप्रियाला त्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी पाठबळ दिले.

पहिल्या व दुसऱ्या प्रयत्नानंतरही अपयश आल्यानंतर आई-वडील, मामा व भावाने तिला प्रोत्साहन दिले. मागील परीक्षांमधील चुका सुधारून सुप्रिया पुन्हा नव्या जोमाने अभ्यासाला लागली. अखेर तो दिवस उजाडला, २१ डिसेंबरला ‘एमपीएससी’चा निकाल जाहीर झाला आणि सुप्रिया मुलींमधून राज्यात पहिल्या क्रमांकाने पास झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आई- वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले.

कॉन्टिटीपेक्षा क्वालिटीला महत्त्व हवे

आपण दररोज किती तास अभ्यास करतो किंवा आपल्या हातात किती तास पुस्तक आहे, यापेक्षा आपण केलेला अभ्यास किती परिपूर्ण आहे हे फार महत्त्वाचे असते. तास्‌नतास अभ्यास केला नाही, पण जेवढा केला तो क्वालिटीचा होता, असा अनुभव सुप्रिया टाकळीकर हिने ‘सकाळ’शी बोलताना कथन केला. प्रत्येकाकडे ‘प्लान- बी’ असावा पण तो आहे म्हणून आपल्या ध्येय्याकडे किंवा स्वप्नाकडे जराही दुर्लक्ष करायचे नाही, तरच यश मिळू शकते, असा सल्लाही तिने तरुणांना दिला. अपयशाला संधी मानून पुन्हा जोमाने सुरवात करा, एक दिवस नक्की आपला येतोच, असा विश्वासही तिने व्यक्त केला.

शिक्षक आजोबांमुळे अभ्यासाची गोडी

सुप्रियाचे आजोबा गिरमलप्पा टाकळीकर हे शिक्षक होते. त्यामुळे बालपणापासूनच सुप्रियाला अभ्यासाची गोड लागली होती. पुढे अभ्यासात सातत्य ठेवले आणि आई- वडिलांबरोबरच स्वत: पाहिलेले अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुप्रियाने खूप वाचन केले. त्याचा फायदा हे यश मिळविण्यासाठी झाला. आता राज्यसेवेची तयारी करीत असल्याचेही सुप्रियाने यावेळी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मगरी, शार्क असलेल्या नदीत पडले Ian Botham; ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज क्रिकेटपटूने वाचवले अन्यथा...

Latest Maharashtra News Updates : अलिगढ मुस्लिम विद्यापीठाला अल्पसंख्याकांचा दर्जा - SC

Sawantwadi Election : शिवसेनेच्या उमेदवारीवर नारायण राणे शेवटचे लढले, अटीतटीची 'ती' निवडणूक ठरली लक्षवेधी

Beed Assembly Election 2024: बीड विधानसभेच्या बंडखोर अपक्षांनी पळविले तोंडचे पाणी!

Jayant Patil : 'महायुतीच्या त्रिकुटाने महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला बांधला'; जयंत पाटलांची सडकून टीका

SCROLL FOR NEXT