Nagpuri Saoji Mutton Curry : महाराष्ट्र हा त्याच्या आगळ्या वेगळ्या संस्कृतीसाठी ओळखला जातो. यात महाराष्ट्राची खाद्य संस्कृती हा नेहमीच चर्चेचा विषय राहलाय. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळे खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहे आणि हेच खाद्यपदार्थ महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीची ओळख आहे.
आज आपण महाराष्ट्रातील एका अशा हटके झणझणीत नागपूरी सावजी मटणविषयी जाणून घेणार आहोत ज्याची चर्चा भारताबाहेरसुद्धा आहे. (Nagpuri Saoji Mutton Curry history and recipe Maharashtra Din special )
सावजी मटण म्हटलं की नाव समोर येतं ते नागपूरचं. अर्थातच सावजी मटण हे नागपूरकरांची ओळख आहे पण तुम्हाला माहिती आहे का सावजी मटण नागपूरात कसं जन्माला आलं?
सावजी मटणाचा इतिहास
सावजी मटणाचा रोमांचक इतिहास आहे. पूर्वी नागपूरात मोठ्या संख्येने मिल्स होत्या. या मिल्समध्ये अनेक राज्यातील लोक कामासाठी यायचे. मध्यप्रदेश हे नागपूरपासून खूप काही अंतरावर नाही त्यामुळे तेथील काही हलबा कोष्टी लोकंही नागपूरात मील्समध्ये काम करण्याच्या हेतूने आले.
सुट्टीच्या दिवशी हे लोक एकत्र जेवायचे आणि कोणाला काय खास बनवता येतं, याची पैज लावायचे, यातूनच सावजी मटण उदयास आले, असं म्हणतात पण हा पदार्थ नागपूरकरांना कळायला अर्थात फेमस व्हायला खूप वेळ लागला.
पुढे ज्या मिल्ससाठी हे कामगार दुसऱ्या राज्यातून आले होते त्या मिल्स बंद पडल्या. मग घरी माघारी कसं जायचं? पोटापाण्याचा प्रश्नही उभा राहला. अशातच काहींनी घरीच सावजी खानावळ काढण्याचं ठरवलं. या खानावळी चर्चेत येऊ लागल्या अन् पुढे गोळीबार चौकात पहिल्यांदा सावजी हॉटेल सुरू झालं.
मग काय... या सावजी हॉटेलच्या टेस्टनी अख्ख्या नागपूरकरांना वेड लावले आणि सावजी मटण फेमस व्हायला लागले. काही सावजी हॉटेलला विशेष प्रसिद्धी मिळाली आणि विशेष म्हणजे ज्या कोष्टी बांधवांनी हे सावजी हॉटेल सुरू केले ते सावजी म्हणून ओळखू लागले.
सावजी मटणात काय आहे विशेष?
सावजी मटण हे त्याच्या झणझणीत टेस्टमुळे ओळखलं जातं. या मटणाला काळी तर्री असते आणि हे खायला खूप स्वादिष्ट आणि तिखट असतं.
सावजी मटणाची आणखी एक विशेषत: म्हणजे यात वापरले गेलेले मसाले. हे मसाले खास सावजी लोक स्वत: तयार करतात. यामुळेच सावजी मसाले सुद्धा सावजी मटणासारखेच तितकेच फेमस आहे.
सावजीची तर्रीही तितकीच फेमस आहे. ही तर्री बनवण्यासाठी विशेष शैली वापरली जाते. अनेकजण ही तर्री नाश्ता करतानाही सोबत घेतात. उदा. तर्री पोहे.
सावजी मटण कसे बनवाचे?
साहित्य -
मटण ५०० ग्रॅम, तेल १ लहान चमचा, हळद चिमूटभर, कांदे चिरलेले २ मोठे,आलं १ १/२ इंच, लसूण पाकळ्या ८ ते १०, कोथिंबीर २ मोठे चमचे, सावजी मसाल्याचे साहित्य, धने ४ मोठे चमचे, जिरे २ मोठा चमचा, लाल सुक्या मिरच्या, दालचिनी १ इंच कांडी, तेजपान 2 मोठे, लवंग ५ ते ६, काळीमिरी १२ ते १५, हिरवी वेलची ३, ज्वारीचं पीठ २ मोठे चमचे, फोडणीसाठी तेल, मीठ स्वादानुसार, लाल तिखट १ मोठा चमचा आणि पाणी
कृती -
सर्व प्रथम मटण स्वच्छ धुवून घ्या कुकर मध्ये घालून त्यात थोड पाणी तेल व हळद घालून २ ते ३ शिटी करून घ्या.
आता सावजी मसाला बनवून घ्या त्यासाठी लाल सुख्या मिरच्या , धने , जिरे , लवंग , काळीमिरी , तेजपान , दालचिनी ,हिरवी वेलची , सर्व खरपूस तव्यावर भाजून घ्या साधारण ५ मिनिटे मंद आचेवरच भाजा मग ज्वारीचं पीठ घालून एकत्र भाजून घ्या१ ते २ मिनिटे मग ताटात काढा व गार करून घ्या.
आता कांदे लांब पातळ कापून घ्या, लसूण व आलं एकत्र तव्यावर तेल घालून भाजून घ्या लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्या.
भाजलेले कांदे लसूण आलं एक ताटात काढून गार करा
आता भाजलेले दोन्ही मसाले मिक्सर मधून वाटून घ्या. थोडं पाणी घालून मिश्रण अगदी बारीक करून घ्या
आता वाटलेला मसाला गाळून घ्या किंवा मसलीन फडक्यात बांधून घट्ट पिळून घ्या सावजी मसाला तयार आहे
आता कढईत तेल तापवून घ्या त्यात सावजी मसाला घालून ६ ते ७ मिनिटे परतवून घ्या.
शिजवलेले मटण घालून एकत्र करून घ्या
मग लाल तिखट आणि स्वादानुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करून झाकण ठेवा ५ ते ६ मिनिटे तोपर्यंत मसाला आणि मटण एकजीव होईल
रस्सा हवा तसा करा पातळ किंवा थोडा घट्ट
आता गरमागरम सावजी मटण तयार आहे
सावजी मटण भाकरी,चपाती भातासोबत खाऊ शकता
(रेसिपी : आरती निजापकर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.