महाराष्ट्र बातम्या

NCP Sharad Pawar : 'साहेबांना एकटे सोडणार नाही' ; राजकीय घडामोडींवर नेत्यांसह पदाधिकारी व सर्वसामान्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया..

राज्यात नाट्यमय राजकीय घडामोडी, या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

सकाळ वृत्तसेवा

राज्यात नाट्यमय राजकीय घडामोडी, या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

अहमदनगर - राज्यात नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावर राजकीय नेत्यांसह पदाधिकारी व सर्वसामान्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया..

सत्तेसाठी पक्ष, विचारधारा सोडून सत्तेसाठी काहीही करण्याच्या वृत्तीमुळे जनतेचे प्रश्न बाजूला राहतात. आज शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कुणाचेच लक्ष नाही. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही. त्यावर बोलायला कोणी तयार नाही. जो तो सत्तेचे राजकारण करण्यात गुंग आहे. यापुढे लोकांनी जनतेच्या प्रश्नावर सतत लढणा-यांच्या पाठीशी उभे रहावे.

- हर्षदा काकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य

सत्ता, पद यासाठी पक्ष सोडून राजकीय विरोधक एकमेकांच्या गळयात गळे घालतात. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने राजकीय नेते, पक्ष यांच्याकडून अपेक्षा करण्यात फारसा अर्थ उरलेला नाही. निवडणुकीत अशा लोकांना मतपेटीच्या माध्यमातून त्यांची जागा दाखवून द्यावी.

-उमेश भाडाईत, नागरिक शेवगाव

सत्ताधारी आणि विरोधक यातील फरक आता हळूहळू नष्ट होत आहे. राजकीय पक्षांना व नेत्यांना कुठलीच विचारधारा राहीलेली नाही. राजकारणाचे एवढ्या मोठ्या प्रमाणात अवमुल्यंन झाले नव्हते. कार्यकर्त्यांनी आता एकमेकांचे डोके फोडून घेण्यात अर्थ नाही.

- वसुधा सावरकर, शेवगाव

विचारांनी व तत्वांनी चालणारे राजकारण दिवसेंदिवस लयाला चालले आहे. सत्तेसाठी, पदासाठी, खर्चीसाठी राजकीय पक्ष, व्यक्ती आपली निष्ठा सोडून कुठल्याही धराला जात आहेत. राजकीय विरोध मोडून काढण्यासाठी शासकीय यंत्रणांचा वापर केला जात आहे. भाजपला साथ सर्व गुन्हे माफ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जनतेच्या हिताला घातक असणारे राजकारण फार काळ टिकणार नाही.

- अँड. सुभाष लांडे, कम्युनिस्ट पक्ष, राज्य सचिव

शरद पवार व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी यांच्यासोबत एक भावनिक नाते जोडले गेले आहे. संघर्षाच्या या काळात आम्ही साहेबांना एकटे सोडणार नाही.

-रामचंद्र निंबोरे, अध्यक्ष सेवा सोसायटी

सद्य स्थितीला राज्यात सुरु असलेल्या घडामोडींचे आम्हाला काहीही देणेघेणे नाही. कर्जत-जामखेडचे भाग्यविधाते रोहित पवार हेच आमचा पक्ष. रोहित पवार घेतील, त्या भूमिकेमागे आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत.

- गुलाब तनपुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य, मिरजगाव

सत्तेसाठी लाचारीचा कळस झाला आहे. कुणावर भरोसा ठेवायचा. असा प्रश्न निर्माण झाला आहे. राजकारणात काय चाललय काही कळेनासे झाले आहे. बेरोजगारी, महागाईने उच्चांक गाठला आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला कवडीमोल भाव मिळत आहे. सामान्य नागरिकांचे प्रश्न सुटत नाहीत. फोडाफोडीचे राजकारण जोमात आहे. या गोष्टी खटकतात.

- सुरेश आण्णासाहेब म्हसे, शेतकरी, शिलेगाव

राजकारणामध्ये कोणतीही गोष्ट निश्चित नसते. सर्व अनिश्चित असतात.

- माजी आमदार भानुदास मुरकुटे

आम्ही सर्व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विचाराने प्रेरीत असून कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या समवेत व पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. आमदार रोहित पवार हे राज्यातील एक महत्वाचे नेते आहेत. अनेक संकटे आली. मात्र राष्ट्रवादी फिनिक्स प्रमाणे पुन्हा झेप घेईल.

- नामदेव राऊत, प्रथम नगराध्यक्ष, कर्जत

राज्यात भाजपची एकहाती सत्ता यावी, हेच पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचे स्वप्न आहे. जोपर्यंत शंभर टक्के भाजपची सत्ता येत नाही, तोपर्यंत परिवर्तन झाले, असे मानणे ही एक प्रकारे स्वतःची फसवणूक स्वतःच केल्या सारखे होईल. अशा वेळी सामान्य निष्ठावान कार्यकर्त्यांनी शांत बसणे यालाच पक्षशिस्त म्हणत असावेत.

-विजय वहाडणे, माजी नगराध्यक्ष, कोपरगाव

काँग्रेस पक्षाला स्वातंत्र्यपूर्व काळाचा इतिहास आहे. मतदारांचा पक्षावर विश्वास आहे. सर्वसामन्यांच्या जीवनात बदल घडून आणणारा पक्ष म्हणून काँग्रेसची ओळख आहे. त्यामुळे येत्या काळात अश्या राजकारणामुळे पक्षावरचा मतदारांचा विश्वास आणखी वाढेल.

- नितीन शिंदे, सरचिटणीस, प्रदेश कॉंग्रेस कमिटी

हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर मी भाष्य करणे योग्य नाही. काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून आम्ही आमच्या विचारधारेची एकनिष्ठ राहून प्रतिगामी शक्तीशी संघर्ष करीत राहू.

- आमदार लहू कानडे

संपूर्ण जगात व देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता वाढत आहे. देशात मोदी व राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विश्वास जपणारे व श्वास्वत नेतृत्व आहे. आधार देणारे नेतृत्व देशात आणि राज्यात असल्याने आजचा चमत्कार झाला.

- बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार, नेवासे

आजची राज्यातील घडामोड ही राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय आहे. घडामोडीत अजूनही संदिग्दता आहे. दोन दिवसात सगळे काही स्पष्ट होईल. त्यानंतर त्यावर भाष्य करणे संयुक्तीक ठरेल.

- राजेंद्र नागवडे,जिल्हाध्यक्ष काॅंग्रेस

भविष्यात पक्ष ही संकल्पना नाहीशी होईल असे वाटते. मतदार व कार्यकर्ते यांनी फक्त पहात राहावे, अशी आजची राजकीय स्थिती निर्माण झाली आहे. यापुढे मतदार उमेदवार कोण आहे, त्यांचा चेहरा पाहून मतदान करतील. पक्ष पाहून नाही. लोकांचा नेत्यावरील विश्वास कमी झाला आहे.

- सुजित झावरे पाटील, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद

राज्यातील आजच्या घडामोडींमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस फुटला नाही, हे खुद्द अध्यक्ष शरद पवार यांनीच सांगितले आहे. आमदार संग्राम जगताप अजितदादांसोबत असले, तरीही ते राष्ट्रवादीतच आहेत. त्यामुळे आम्ही सर्व कार्यकर्ते शरद पवार यांच्याच नेतृत्वाखाली काम करणार आहोत. शहरातील विविध प्रश्न जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सोडविणार आहोत. सामाजिक कार्यातून आम्ही आगामी निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.

- अभिजित खोसे, जिल्हा कार्याध्यक्ष (नगर शहर)

अजित पवार यांच्यासोबत काम करणे अवघड जात होते, असे म्हणणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात पवार हेच उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत. मग शिंदे यांना ते चालते काय? पुरोगामी महाराष्ट्रात हे काय चालले आहे, असा प्रश्न पडत आहे. आपण मते कशासाठी देत आहोत ते कळतच नाही. काँग्रेस पक्षाचे आमदार मात्र अजूनही फुटलेले नाहीत, हे कौतुकास्पद आहे. आज जे घडले ते योग्य नाही. योग्यवेळी मतदार उत्तर देतील याचे भान सर्वानी ठेवायला हवे.

- अभिजित गर्जे, निपाणी जळगाव

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार खुप मोठा लढवय्या नेता असून त्यांची कारकीर्द युवक, महिला व जेष्ठामध्ये लोकप्रिय आहे. महाराष्ट्र राज्याकरीता त्यांनी दिलेले योगदान सर्वोच्च असल्याने त्यांच्या विचाराबरोबर मी सदैव होतो आणि राहिल. आज पक्षाला सोडून गेलेले सर्व जण त्यांच्याच कृपेने राजकारणात पुढे आलेले आहेत.

- दशरथ जाधव, ज्येष्ठ नागरिक, सोनई

फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेवून पुढे जात असलेल्या शरद पवारांना पक्षातूनच अशी आडकाठी आणली जात असेल तर योग्य नाही. अभूतपूर्व कार्यामुळे त्यांना आम्ही दैवत मानतो. मोठ्या कष्टातून उभा केलेला पक्ष त्यांच्या समोर अस्ताव्यस्त होत असताना दु:ख होत आहे. राजकारणात येऊ पाहणाऱ्या आमच्या सारख्या महिलांसाठी ही गोष्ट धक्कादायक आहे.

- ज्योती अभिजित ससाणे, देडगाव (ता.नेवासे)

ष्ठ नेते शरद पवार यांचे सारखे नेतृत्व कित्येक युगात एकदाच निर्माण होते. जीवनात त्यांच्या अनेक संकटे आली मात्र त्यांनी जिद्दीने परतून लावली.त्यांचाच वसा आणि वारसा आमदार रोहित पवार सक्षमपणे पुढे चालवीत आहेत. आम्ही त्यांच्याबरोबर आहोत.

- नितीन धांडे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, कर्जत

संपूर्ण देशातच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी सबका साथ सबका विकास, या न्यायाने देशाला विकासाच्या मार्गावर नेत आहेत. राष्ट्रहित व विकासाच्या विचाराने मुख्यमंत्री शिंदेनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्याच विचारांना आज राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा देत सरकारमध्ये सामील झाले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील आजचा दिवस हा ऐतिहासिक ठरला आहे. महाराष्ट्रासह देशाला खंबीर-मजबूत सरकारची आवश्यकता आहे.

- विमल पुंडे, जिल्हाप्रमुख, शिवसेना महिला आघाडी

आजची घटना म्हणजे मतदारांची एक प्रकारे फसवणूक झाल्यासारखे वाटते. मतदारांनी भाजप-शिवसेनेकडे पाहून मतदान केले होते. मात्र आज झालेले राजकारण नाही तर एक विकृती म्हणावे लागेल. सत्तेसाठी कोणी काहीही करू शकतो. निवडणूक लढवताच कशाला. देशाच्या पैशाचा हा एकप्रकारे अपव्यय आहे.

- तुषार सुभाष गंगवाल, सर्व सामान्य नागरिक, व्यापारी कोपरगाव

राज्यातील सध्या सुरू असलेला सत्तासंघर्ष चुकीच्या दिशेने चालला आहे. हा सत्तासंघर्ष कोठेतरी थांबणे गरजेचे आहे. अन्यथा राजकारणात तरुणाई येणार नसल्याचे संकेत दिसून येत आहेत.

- सतीश पाटील, सामान्य नागरिक, पारनेर

जवळच्या लोकांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांना या वयात सोडून जाणे चुकीचे आहे. आम्ही मात्र शरद पवारांबरोबर ठाम राहणार आहोत.

- राजेंद्र कोठारी, प्रदेश सचिव, राष्ट्रवादी काँग्रेस

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे विचार स्वीकारून, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सरकारमध्ये सामील झाल्याबद्दल त्यांचे स्वागत आहे.

- अजय काशीद, तालुकाध्यक्ष, भाजप, जामखेड

अजित पवारांनी पहिल्यांदा केलेला शपथविधी योग्य होता. त्यावेळेस गेले त्यावेळी तिथेच थांबले असते तर आज मुख्यमंत्री झाले असते. मात्र आजचा प्रकार म्हणजे पोरखेळ झाला आहे. अशा राजकारणातून राज्याचे भले होणार नाही. मतदान करणाऱ्या जनतेचा व लोकशाहीचा हा घोर अपमान आहे.

- राजेंद्र सौताडे, नागरिक

सर्व राजकारण्यांवरचा विश्वास उडाला आहे. जिकडे भेळ तिकडे खेळ असा प्रकार आहे. महाराष्ट्राला अत्यंत गलिच्छ राजकारण पाहण्याची वेळ आली.

ईश्वर सोनवणे, व्यवसायिक

यापूर्वीदेखील अशा प्रकारचे राजकीय चढ-उतार ''सह्याद्री''ने पाहिले. परंतु ''तो'' कधीही डगमगला नाही. त्यामुळे आम्ही पवार यांना मानणारे आहोत. यावरुन आमदार रोहित पवार जो निर्णय घेतील. तो स्वीकारुन आम्ही वाटचाल सुरू ठेवू.

- माधुरी पाटील, माजी पंचायत समिती सदस्य, भांबोरा

राष्ट्रवादी व कॉंग्रेसला पाठिंबा दिला म्हणून शिवसेनेतून बाहेर पडलेले मुख्यमंत्री शिंदे हे जर खरेच कै. बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक असतील, तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. राष्ट्रवादीला विरोध म्हणून बाहेर पडले, त्यांच्या बरोबर युती करावी लागत असल्याने मुख्यंत्री शिंदे जनतेला सामोरे कसे जाणार?

- प्रमोद लबडे, जिल्हाप्रमुख, शिवसेना (उद्धव ठाकरे गट)

विविध सामाजिक, राजकीय पक्षांमध्ये अनेक तरूण एका विशिष्ट विचारधारेला धरून येत असतात. नेते हे पक्षाची विचारधारा सोडून ईडीच्या नोटिसा, सत्तेसाठी तसेच अन्य कारणांमुळे पक्ष सोडतात. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम तयार होतो. काही विचारधारेसाठी तसेच तत्वांसाठी प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांशी संघर्ष केलेला असतो. त्यांच्याशी हातमिळवणी केल्यावर कार्यकर्ते गोंधळून जात आहे.

-दिगंबर गेंटयाल, जिल्हाध्यक्ष, हिंदू राष्ट्र सेना, अहमदनगर

पहाटे झालेल्या शपथविधीची आठवण करुन देणारा आजचा शपथविधी झाला. काँग्रेस, उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला भविष्यात चांगले दिवस असताना हा अनपेक्षित धक्का बसला.

- पांडुरंग अभंग, माजी आमदार, नेवासे

जसजशा निवडणुका जवळ येत आहेत. तशा या प्रक्रिया वाढत जाणार आहेत. पाठिंबा देणारे लोक घाबरलेले व इडीच्या भीतीने तेथे गेले आहेत. पहाटेचा अर्धवट राहिलेला शपथविधी वरिष्ठांच्या पाठिंब्याने पूर्ण झालेला आहे.

- विजय औटी,माजी आमदार

राज्यातील राजकीय घडामोडी पाहता राजकरण हे कोणत्याही विचार प्रणालीवर उभे नाही. जनता राजकीय लोकांच्या हातात सत्ता देते आणि राजकीय नेते मात्र राजकीय सत्ता हव्यासापोटी जनतेला विचारत न घेता स्वतःचे हित डोळ्यासमोर ठेऊन जेव्हा वागतात, तेव्हा राजकारण व्यावसायिक, व्यापारी होते आहे का ? असे वाटू लागते.

- मधुकर नवले

आजची झालेली राज्यातील राजकीय उलथापालथ अत्यंत चुकीची आहे. मतदारांना मुर्ख समजणाऱ्या राजकीय नेत्यांनी भविष्यात लोकांनाही ग्राह्य धरु नये. अशा कृतीमुळे लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडणार असून मतदान का व कशासाठी करायचे असाच प्रश्न पडला आहे. हा निर्णय लोकहितासाठी की स्वहितासाठी आहे हे सगळ्यांना माहिती आहे.

- संगिता भोंग, गृहिणी श्रीगोंदे.

राज्याचा विकास, जनतेचे प्रश्न, स्त्रियांवर होणारे अत्याचार व त्यातून पुढे आलेला सुरक्षेचा प्रश्न, धर्मा धर्मात जाणीवपूर्वक घडवून आणलेल्या हिंसा, या प्रश्‍नांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जोरकस भूमिका घेतली नाही, उलट त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत सत्तेच्या पायघड्या टाकणाऱ्यांची गळाभेट घेऊन उपमुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेतले आहे. राजकारणाची होणारी ही घसरण निश्चितच चिंताजनक आहे.

-ॲड. रंजना गवांदे - पगार, राज्य कार्यवाह, अंधश्रध्दा निर्मूलन समिती

अजितदादा पवार यांनी आज राज्य सरकारला पाठिंबा देऊन राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्वच्या सर्व जागा मिळून देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट होऊन येणाऱ्या २०२४ निवडणुकीत पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा निर्णय स्वागताहार्य आहे.

-जालिंदर वाकचौरे, भाजप, राज्य सदस्य, अकोले.

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षांत केलेली विकासकामे, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच शिंदे-फडणवीस सरकारने एक वर्षात घेतलेले धाडसी निर्णय व भविष्यात देशाची व राज्याची वाटचाल ही ह्याच नेतृत्वांच्या सोबत काम केले, तर राज्य प्रगती पथावर राहील त्यातूनच राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी घेतलेला हा निर्णय आहे. या निर्णयाचे स्वागत आहे. केंद्र व राज्य सरकारने एकमेकांच्या हातात हात घालून काम केले, तरच देश व राज्य पुढे जाईल.

- स्नेहलता कोल्हे, भाजप प्रदेश सचिव, माजी आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

SCROLL FOR NEXT