राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आणि मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरूच आहेत. आज पुन्हा जरांगे पाटील यांनी नाव न घेता छगन भुजबळांवर निषाणा साधला. त्याला भुजबळांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे.
राज्यात मराठा आरक्षणासाठी ५८ मोर्चे निघाले, लाखो कार्यकर्ते महिला सहभागी झाल्या. पण कुठेही कायदा व्यवस्थेला धक्का लागला नाही. पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात एक कायदा केला, तो अडचणीत आल्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री असताना दुसरा कायदा केला, तो हायकोर्टात टीकला पण सर्वोच्च न्यायालयात अडकला. त्यामुळे शांततेत आंदोलन केल्यास सरकार लक्ष देत नाही असा भाग नाही. आताही सरकार काम करतंच आहे.
पण जरांगे यांनी पोलिसांवर हल्ला करणं, पोलिसांना जखमी करणं. बीडमध्ये अनेकांची घरे कार्यालये, हॉटेल्स ही ठरवून, कट करून पेटवण्यात आली. त्यामध्ये जीवितहानीही झाली असती पण परमेश्वर कृपेने महिला, मुलं वाचले. राज्यात गावबंदी केली. ठराविक व्यक्तींना त्यातुन मुक्तता मिळाली. पण खासदार आमदारांना गावबंदी केली, अशा प्रकारे विरोध करणाऱ्यांना एक महिन्याची शिक्षा आहे.
सगळीकडं आम्हालाच उपदेश केला जातोय
सभागृहात, बाहेर आम्हालाच उपदेश केला जातो आहे की, दोन समाजात तेढ निर्माण करतो. म्हणजे आम्ही गप्प बसलो असतो आणि सगळ्या ओबीसींची राज्यभर जाळपोळ केली असती तर चाललं असतं का? त्यांनी कायदा हातात घ्यायचा, जाळपोळ करायची, बेकायदा पिस्तुलाचे बार उडवायचे, त्यांना पकडल्यावर त्यांना लवकर सोडा अशी मागणी करायची. सरकारवर दबाव आणायचा. हे सगळं तिकडे चालू आहे, इकडे फक्त भाषण. याला आळा घाला म्हणणं देखील चूकीचं ठरायला लागलं आहे, असेही भुजबळ म्हणाले.
अर्थात याला निवडणूका हे कारण आहे. प्रत्येक लोकप्रतिनीधीला वाटतं की आपल्याला मराठा समाजाची मते मिळणार नाहीत, त्यामुळे प्रत्येकाला छगन भुजबळच्या विरोधात बोललं पाहिजे असं वाटतं असेही छगन भुजबळ यावेळी म्हणाले.
ओबीसी आरक्षणाला धक्का लागलाच आहे...
हे बोलतात की ओबीसीला धक्का न लावता आरक्षण देणार. अरे अगोदरच तुम्ही वाटेल तेवढी कुणबी सर्टिफीकेट वाटत असाल तर धक्का लागलाच आहे. ओबीसीमध्ये आल्यानंतर शैक्षणिक आणि राजकीय आरक्षण देखील आपोआपच लागू होणार. एकदा ओबीसीत आला की ओबीसींना मिळणाऱ्या सर्व योजनाचा लाभ घेण्याचा अधिकार मिळतो, असे छगन भुजबळ म्हणाले.
१७ तारखेपर्यंत सरकारने काय ते सांगावं असा नवीन अल्टिमेटम जरांगे यांनी दिला आहे, यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, आतापर्यंत कोणी व्यक्ती सरकारला अशी धमकी देत होता? जनतेला वेठीस धरत होता? आज सरकारला तारखा देत आहेत उद्या कोर्टाला तारखा देतील. ही सवयचं बनली तर हे वाढतच जाईल. त्यामुळे सरकारने खंबीर उभं राहिलं पाहिजे. मराठा समाजाला वेगळं आरक्षण कसं देता येईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न झाले पाहिजेत असेही भुजबळ म्हणाले.
फडणवीस मला काय सांगणार
मराठा आरक्षणाविरोधात कोणी बोलू नये, फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर रोष वाढत असल्याचे जरांगे म्हणाले. यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, माझं वय ७६ आहे. त्यातले ३५ ते ३६ वर्ष मी ओबीसीसाठी काम करतोय. शिवसेना देखील सोडली, तेव्हा देवेंद्र फडणवीस आमदार देखील नव्हते. त्यानंतर ते १० वर्षांनी आमदार झाले. आता ते मला काय सांगणार. बाळासाहेब किंवा शरद पवार यांनीही काय बोलायचं हे मला सांगितलं नाही. आता मला कोणीतरी सांगावं आणि मी ते बोलावं अशी परिस्थिती नाही. मी माझ्या मनाचं बोलतो. माझे निर्णय माझे असतात आणि त्याचे परिणाम भोगण्याची माझी तयारी असते असे भुजबळ म्हणाले.
तू किस झाड की पत्ती
मनोज जरांगे यांनी माझ्या नादी लागू नको अन्यथा उरलेले केसही गळतील असं वक्तव्य नाव न घेता उद्देशून केलं. याबद्दल विचारले असता भुजबळ म्हणाले की, "जो कोणी बोलला असेल त्याला म्हणावं, तू काय मी फार मोठे-मोठे लोक अंगावर घेतले आहेत. तू किस झाड की पत्ती है!" असं रोखठोक उत्तर छगन भुजबळ यांनी दिलं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.