तळमावले येथे काही दिवसांपूर्वी मेळाव्यात शिंदे- फडणवीस सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केलेले अजित पवार यांनी दोन महिन्यांत बदललेल्या भूमिकेमागचे कारण काय?
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड करून काही आमदारांना सोबत घेऊन शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ आठ मंत्र्यांसोबत घेऊन अनपेक्षित धक्का दिला. या बंडामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित गट व शरद पवार गट अशी दुफळी निर्माण झाली. या बदलत्या राजकीय परिस्थितीत पाटण तालुक्यातील संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर (Vikram Singh Patankar) व सत्यजितसिंह पाटणकर (Satyajit Singh Patankar) यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार यांच्या पाठीशी उभी राहिली.
बदललेल्या राजकीय घडामोडींचे पडसाद येणाऱ्या काळात तालुक्यात पाहावयास मिळतील. माजी मंत्री पाटणकर व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील निष्ठेचे राजकारण गेली ४० वर्षे पाहावयास मिळते. जिकडे शरद पवार तिकडे पाटणकर असे समीकरण आहे. विक्रमसिंह पाटणकर यांची पहिली विधानसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून होती.
मात्र, त्यावेळीच त्यांनी शरद पवारांना राजकीय नेता मानले होते. पवारांच्या सोबत कॉँग्रेस, शरद पवारांचा पुलोद प्रयोग, एस कॉँग्रेस, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या राजकीय प्रवासात पाटणकर कायम सोबत राहिले. १९९९ ला राष्ट्रवादीच्या निर्मिती वेळी जिल्ह्यात प्रथम विक्रमसिंह पाटणकर यांनी उडी घेतली. हा राजकीय इतिहास आहे.
१९९९ ला राष्ट्रवादी- कॉँग्रेस आघाडी शासनात विक्रमसिंह पाटणकरांना कॅबिनेट मंत्रिपद देऊन शरद पवारांनी त्यांच्या निष्ठेचा गौरव केला होता. जिल्हा बँक व जिल्हा परिषदेच्या सत्तेत पाटणकर यांना कायम झुकते माप दिले आहे. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत मंत्री असताना विक्रमसिंह पाटणकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले, तरीही २००९ ला पुन्हा पक्षाची उमेदवारी दिली.
२०१४ व २०१९ ला युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांचा पराभव झाला, तरीही पवारांचे पाटणकरांवरील प्रेम कमी झाले नाही. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. सध्याच्या घडामोडीमुळे राजकारण ढवळून निघाले आहे. अजित पवारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगली. त्या वेळी गेली ४० वर्ष ऋणानुबंध असणारे विक्रमसिंह पाटणकर कोणती भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
बंड झाले त्यादिवशी माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रतिक्रिया न दिलेले पाटणकर पिता- पुत्र दुसऱ्याच दिवशी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी शरद पवारांना साथ देण्यासाठी कार्यकर्त्यांसोबत हजर होते. राज्यात झालेल्या घडामोडीचे तालुक्यातील राजकीय परिणाम समोर येण्यासाठी अजून काही काळ जावा लागेल. कारण, राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष व कार्यकारिणी विक्रमसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली एक आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान तालुकाध्यक्ष राजाभाऊ शेलार व माजी तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे हे पुलोदपासून शरद पवार यांचे कार्यकर्ते आहेत. अजितदादांनी सवता सुभा मांडून भाजपसोबत केलेली हातमिळवणी कार्यकर्त्यांना पचनी पडलेली नाही.
तळमावले येथे काही दिवसांपूर्वी मेळाव्यात शिंदे- फडणवीस सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केलेले अजित पवार यांनी दोन महिन्यांत बदललेल्या भूमिकेमागचे कारण काय? महाविकास आघाडी शासनाच्या काळात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याबरोबर जुळवून घेणारे अजितदादा तळमावले कार्यक्रमात बोचरी टीका करताना जनतेने पाहिले आहे.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडताना अजित पवारांवर हल्लाबोल केला. मात्र, अजितदादा साताऱ्याचे पालकमंत्री असताना शंभूराज देसाई व अजितदादा मित्र असल्याचे जाहीर कार्यक्रमात सांगायचे. राहिला प्रश्न अजितदादांचा वेगळा असा गट तालुक्यात नाही. शिंदे गटासोबत अजितदादांचे संबंध कसे राहतात? यावर तालुक्यातील पुढील राजकारण अवलंबून आहे.
अजित पवार बंड करून शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत या तीन पक्षांमध्ये जागावाटप झाले तर पाटणची जागा विद्यमान आमदारांना जाईल. अजितदादांसोबत गेलो, तर युती धर्म पाळावा लागले. या धर्म संकटात पडण्यापेक्षा साहेबांच्या सोबतीला गेले, तर उमेदवारीचा प्रश्न राहणार नाही, असेही कारण असू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.