Morning swearing Morning swearing
महाराष्ट्र बातम्या

‘पहाट’ शपथेचा परिणाम; शिवसेना-काँग्रेस एकाच पंक्तीत

शिवसेना कॉंग्रेसजवळ जाण्यास देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची ‘पहाटभेट’ कारणीभूत ठरली

अनिल यादव

नागपूर : काळाच्या ओघात ज्याप्रमाणे सामाजिक आणि जातिभेदाचे घट्ट धागे आता उसवत चालले आहेत; त्याचप्रमाणे राजकीय अस्पृशताही पातळ झाली आहे. डाव्यांची राजकीय ताठरता आणि कडवटपणा सोडला तर काँग्रेससहीत सर्वच राजकीय पक्ष आता ‘हमाम मे नंगे’ झाले आहेत. धर्मनिरपेक्षता, नीतिमूल्ये आणि पक्षीय शुचिता आता केवळ तोंडी लावण्यापुरतीच उरली आहेत.

शिवसेनेचे खासदार राजकारणातील नवे ‘नारदमुनी’ खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली. शिवसेना आता कॉंग्रेसच्या (Congress) नेतृत्वातील संयुक्त पुरोगामी आघाडीत (यूपीए) सहभागी होण्यावर दोघांत चर्चा झाल्याच्या बातम्या आहेत. खरे तर ही फार मोठी राजकीय घडामोड म्हणावी लागेल. कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने शिवसेनेच्या (shiv sena) नेत्याशी दिल्लीत भेटणे म्हणजे भविष्यात देशाचे राजकारण कोणते वळण घेणार आहे याची नांदी होय.

खरं पाहता आतापर्यंत काँग्रेस विनाकारणच हिंदुत्ववादी पक्षाचा द्वेष करीत आली आहे. जातीयता, धर्मांधता, हिंदुत्व हे नुसतेच शब्दच आहेत. त्याने काहीही फरक पडलेला नाही आणि पुढेही पडणार नाही. कॉंग्रेस आज शिवसेनेसोबत सत्तेत आहे. याचा अर्थ शिवसेनेचे हिंदुत्व आणि कॉंग्रेसची धर्मनिरपेक्षता संपली असे मुळीच नाही. वास्तविक पाहता शिवसेना कॉंग्रेसजवळ जाण्यास देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची ‘पहाटभेट’ (२३ नोव्हेंबर २०१९) कारणीभूत ठरली.

साडेतीन दिवसांच्या ‘हनिमून’मुळे राज्य आणि देशाच्या राजकारणाची दिशाच बदलली. याचा सर्वाधिक फायदा शिवसेनेला झाला. कारण, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना वेगळे लढले पण सत्तेसाठी एकत्र आले होते. ३० वर्षांपासून हिंदुत्वाच्या कच्च्या धाग्यात हे दोन्ही मणी गुंफून होते. त्यामुळेच शिवसेना सहा महिन्यांनी का होईना अपमानाचे मूग गिळत सत्तेत सहभागी झाली होती.

अन् भाजप व शिवसेना हे दोन मणी गळून पडले

भाजपपासून फारकत घेण्याची मानसिक तयारी आणि हिंमत शिवसेना नेते आणि शिवसैनिकांची नव्हती. भाजपही गुरमीत होती. ‘आपल्याशिवाय शिवसेना जाणार कुठे? आज ना उद्या येईल फरफटत मागे’ असे भाजपच्या नेत्यांना वाटत होते. परंतु, ज्या दिवशी अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे पाच वाजता शपथ घेतली त्याच दिवशी हिंदुत्वाच्या कच्च्या धाग्यात ३५ वर्षांपासून गुंफलेले भाजप आणि शिवसेना हे दोन मणी गळून पडले.

शिवसेनेचा मार्ग झाला मोकळा

कॉंग्रेस, राष्ट्रवादीसह देश आणि राज्यातील धर्मनिरपेक्ष पक्षांच्या हातात हात घालून चालण्याची संधी शिवसेनेला चालून आली. धर्मांधता, जातीयवादाचे आवरण गळून पडले. पहाटेची शपथ भारतीय जनता पक्षाला एवढी महागात पडली की १०५ आमदार असूनही सत्तेपासून दूर राहावे लागले. जर राष्ट्रवादी कॉंग्रेस (Bjp) भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत सहभागी होऊ शकते तर आपण कॉंग्रेससोबत सरकार स्थापन केले तर काय बिघडले? असा आत्मविश्वास शिवसेनेला आला. मानसिक अडथळे दूर झाले. तसेही शिवसेनेला कॉंग्रेसचे कधीच वावडे नव्हते. प्रश्न कॉंग्रेसचा होता. पण अजित पवार यांच्यामुळे आपोआप शिवसेना-कॉंग्रेस यांच्यातील राजकीय मतभेदाचे पडदे गळून पडले.

...तर शिवसेना-राष्ट्रवादी युती पक्की

राजकीय मंचावरील शिवसेना-कॉंग्रेस यांचे वागणे एवढे बेमालूम आहे की जणू काही हे पक्ष वर्षानुवर्षे एकत्र आहेत. या सर्व राजकीय घडामोडीत मोठे राजकीय नुकसान झाले ते भाजपचे! कारण, शिवसेनेसारखा मित्र गमावला. उद्या जर महाविकास आघाडी जर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढली तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा सुफडासाफ झाल्यास नवल वाटणार नाही. समजा महाविकास आघाडी एकत्र लढली नाही आणि कॉंग्रेसने स्वबळाचा नारा दिलाच तर शिवसेना-राष्ट्रवादी युती पक्की समजावी. या समीकरणात भाजप आणि कॉंग्रेसला जागांचे मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. अशावेळी कॉंग्रेस आणि भाजप एकत्र येण्याची आणि शिवसेना भाजपसोबत जाण्याची सुतराम शक्यता नाही. एकतर भाजपला सत्ता स्थापनेसाठी पूर्ण बहुमत प्राप्त करावे लागेल किंवा पुन्हा एकदा महाविकास आघाडी सत्तेत येईल. हे सर्व घडले अथवा घडणार आहे ते पहाटेच्या शपथेमुळेच! शेवटी राजकारणात काहीही अशक्य नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT