वार- शनिवार, दिवस होता ७ मे २०११ आणि ठिकाण होतं आर मॉल, घोडबंदर रोड, ठाणे. याच ठिकाणी, याच दिवशी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचे चिरंजीव निखिल खडसे आपली पिस्तूल विसरून गेले होते. त्यावेळी ऐन वीकेंडला आरमॉलच्या सुरक्षा यंत्रणा कामाला लागल्या.... हा किस्सा आहे बरोब्बर निखिल खडसेंच्या मृत्यूच्या २ वर्षाआधीचा. कारण १ मे २०१३ च्या संध्याकाळी निखिल यांनी मुक्ताईनगरमधील राहत्या घरी गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. त्यावेळी एकनाथ खडसे हे राज्याचे विरोधी पक्षनेते होते. त्यामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यातही या घटनेने खळबळ माजली होती…
आता खडसेंच्या मुलाच्या मृत्यूबद्दल आज का चर्चा होतेय? तर भाजप नेते गिरीश महाजन यांनी निखिल खडसे यांनी आत्महत्या केली की त्याचा खून झाला? असा संशय व्यक्त केला आहे. जळगावच्या राजकारणात कायमच महाजन विरुद्ध खडसे वाद पाहायला मिळतो. त्यात यंदा हा वाद थेट निखिल खडसेंपर्यंत जाऊन पोहचला. कारण गिरीश भाऊंना मुलगा नाही अशा आशयाचं वक्तव्य खडसेंनी केलं होतं, त्यानंतर एकनाथ खडसेंच्या मुलाचं नेमकं झालं काय? हा संशोधनाचा विषय असल्याचं महाजनांनी म्हटलं. त्यामुळे एकनाथ खडसेंच्या मुलाची हत्या की आत्महत्या? आता हे प्रकरण पुन्हा एकदा तापलेलं दिसतंय.
हेही वाचा - गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....
पण निखिल खडसेंच्या मृत्यूवेळी नेमकं काय घडलं होतं? ते प्रकरण काय आहे हेच आपण जाणून घेणार आहोत.
१ मेच्या बुधवारी सकाळपासून निखिल घराबाहेर होते आणि दुपारी मुक्ताईनगरमधील घरी परतले. त्या वेळी घरात आई मंदाताई आणि पत्नी रक्षा खडसे होत्या. एकनाथ खडसे त्यावेळी जुन्या गावात एका ग्रामपंचायत सदस्याकडे लग्नाला गेले होते. तर, घरी आल्यावर निखिल वरच्या मजल्यावरील आपल्या खोलीत गेले आणि काही वेळातच त्या खोलीतून गोळीबाराचा आवाज झाला. त्यामुळे सर्व कुटुंबीय त्याच्या खोलीकडे धावले. तेव्हा निखिल खडसे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते.
त्यांनी स्वत:च्या रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून घेतली होती. ही माहिती तातडीने एकनाथ खडसेंना कळवण्यात आली. त्यामुळे तेही घरी परतले. निखिल खडसे यांना तातडीने जळगावकडे रवाना करण्यात आले. पण, गोळी थेट मेंदूला लागल्यानं डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाहीत.
निखिल खडसेंची राजकीय कारकीर्द
निखिल सर्वात आधी जिल्हा परिषदेत भाजपतर्फे सदस्य म्हणून निवडून आले. ऑक्टोबर २००९ मध्ये विधान परिषद निवडणुकीतही जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपने त्यांना उमेदवारी दिली होती. मात्र, अपक्ष उमेदवार मनीष जैन यांनी त्याचा पराभव केला. त्यामुळे स्थानिक राजकारणात हा खडसे कुटुंबासाठी मोठा धक्का मानला जात होता. पक्षाकडून भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्षपदही निखिल खडसे यांना देण्यात आलं होतं. पण निवडणुकीतील पराभव आणि राजकारणात आपलं काहीही होत नसल्याचं नैराश्य निखिल खडसे यांना होतं.
त्यातच काही वर्षांपासून निखिल हे पाठ आणि मानेच्या दुखण्यानेही त्रस्त होते. त्यामुळे आजारपणाच्या नैराश्यातून निखिल खडसे यांनी आत्महत्या केल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. दरम्यान, आत्महत्येनंतर पोलिसांना कुठलीही सुसाईड नोट मिळाल्याची नोंद नाही.
त्यामुळे २०१३ सालची निखिल खडसेच्या मृत्यूची घटना गिरीश महाजनांच्या आरोपांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दरम्यान राजकारण काहीही असलं तरी आरोप प्रत्यारोपाचं हे राजकारण कुणाच्या कुटुंबापर्यंत जाणं नक्कीच योग्य नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.