पुणे जिल्ह्याच्या राजकीय आखाड्यामध्ये शिवसेनेला सध्या तरी काही गमविण्याची भीती नाही.
पुणे : शिवसेना पक्षामध्ये बंडखोरी झाल्यानंतर पुणे जिल्ह्यात अद्याप कोणतीही फूट पडलेली दिसत नाही. उलट बंडखोरीचे तीव्र पडसाद उमटले. ग्रामीण भागातील शिवसेनेचा प्रमुख प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी कॉंग्रेस आहे. त्यामुळे येथील कार्यकर्ते सध्या पक्षाच्या बैठकांमध्ये शिवसेनेसोबतच एकनिष्ठ राहण्याचा निश्चय करत आहेत, पण त्या जोडीला राष्ट्रवादीकडून कसा त्रास दिला जात आहे, हेही मांडत आहेत. त्यामुळे नेत्यांची भूमिका जणू ‘वेट अँड वॉच’ची दिसत आहे.
पुणे जिल्ह्याच्या राजकीय आखाड्यामध्ये शिवसेनेला सध्या तरी काही गमविण्याची भीती नाही. सध्या तर जिल्ह्यातील २१ आमदारांपैकी एकही आमदार शिवसेनेचा नाही. मात्र, साडेतीन खासदारांपैकी रायगडमधील तीन व पुणे जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघाचा मिळून असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे यांच्या रूपाने शिवसेनेचा खासदार आहे. हीच काय ती दिलासादायक बाब आहे. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे जिल्हा परिषद या संस्थांमध्ये सुद्धा शिवसेनेची ताकद तुलनेने नगण्य आहे.
महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे हेच पुणे जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांना वेळोवेळी ताकद देत होते. आढळराव पाटील हे सातत्याने त्यांच्या संपर्कमध्ये होते. त्यामुळे ते त्यांची साथ देणार की शिवसेनेचा भगवा कायम ठेवणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. सचिन अहीर यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात त्यांनी राष्ट्रवादीकडून कशाप्रकारे खच्चीकरण केले जात आहे, हे आक्रमकपणे मांडले. भोर व खडकवासला मतदारसंघात शिवसेनेची ताकद राष्ट्रवादीच्या बरोबरीने आहे. तसेच, विजय शिवतारे हे कट्टर पवार विरोधक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे शिंदे यांचे बंड हे त्यांच्यासाठी प्रकारची संधी मानली जात आहे.पिंपरी-चिंचवडमध्येही एकमेव आमदार असलेले गौतम चाबुकस्वार यांचा राष्ट्रवादीच्या अण्णा बनसोडे यांनी पराभव केला. येथे शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यामध्ये वाद पाहायला मिळतो.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यातच युद्ध रंगणार आहे. त्यावेळी महाविकास आघाडी कायम राहिल्यास शिवसेनेतील इच्छुक उमेदवार काय भूमिका घेतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्यात पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवड येथील शिवसेना ही मूळ कार्यकर्त्यांपेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादीतून आलेल्या नेत्यांनी वाढवलेली स्वतःची सेना आहे.. तसेच, मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहण्याची सांगितलेले असले, तरी त्यांची पुढची वाट बिकट आहे. कारण, मावळ लोकसभा मतदारसंघाचा समावेश असलेल्या रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरांची साथ दिली आहे. अशा परिस्थितीत बारणे यांचा मार्ग अवघड आहे.
जर महाविकास आघाडीचे कोसळले आणि भाजपचे सरकार आले, तर पुणे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मोठे फेरबदल झालेले दिसतील. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये दौंडला आमदार राहुल कुल हे भाजपच्या उमेदवारावर यावेळी निवडून आलेले आहेत. ते जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील भाजपचे एकमेव आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे फार मोठी संधी असू शकते. तसेच, इंदापूरचे हर्षवर्धन पाटील यांच्यावरही पक्ष मोठी जबाबदारी टाकू शकतो. विशेष म्हणजे राहुल कुल, हर्षवर्धन पाटील आणि विजय शिवतारे हे तीनही नेते बारामती लोकसभा मतदारसंघातील आहेत. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी करायची असेल, तर या नेत्यांना भाजप नक्कीच ताकद देणार आहे. विधान परिषदेतील विजयानंतर राम शिंदे यांचे या परिसरात होणारे सत्कार सोहळे त्याची प्रचिती देत आहे.
कार्यकर्ते आक्रमक
ग्रामीण भागातील नेत्यांची राष्ट्रवादीवर आगपाखड
ठाकरे यांच्या समर्थनार्थ आंदोलने
खासदार श्रीरंग बारणे हे ठाकरेंसोबत
शिवाजीराव आढळराव पाटील, विजय शिवतारे यांची भूमिका महत्त्वाची.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.