'मराठा समाजाला ५० टक्क्यांत व ५० टक्क्यांवरील आरक्षण देण्याची भाषा नेते करत आहेत. ते लोकांना भुलविण्यासाठी आहे.'
कोल्हापूर : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Community) देण्यासाठी ओबीसी नेते (OBC leaders) विरोध करत असतील तर ते घटनाबाह्य आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे (Rajendra Kondhare) यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
आरक्षणाच्या अंमलबजावणीत चूक असून, मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्याबाबत नेते भुलवत असल्याचा आरोप त्यांनी केला. कोंढरे म्हणाले, ‘मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाला निवेदन दिले होते. खत्री कमिशनमुळे पुन्हा कुणबी प्रमाणपत्रासाठी संघर्ष करावा लागला. कुणबीचे ५१ प्रकार असून, केवळ तीन जातींत रोटी-बेटी व्यवहार केला जातो.
मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र मिळाल्यावर त्यांचा ओबीसीत समावेश होतो. त्याला ओबीसी नेत्यांनी विरोध करणे चुकीचे आहे. ओबीसी नेत्यांनी न्यायाची भूमिका लक्षात घ्यावी. गायकवाड आयोगाचे तीन अहवाल न्यायालयात आहेत. शिक्षण व नोकरीत ३० टक्के आरक्षण होते, असं त्यांनी सांगितलं.
कोंढरे पुढे म्हणाले, गायकवाड आयोगाच्या शिफारसीमुळे १६ टक्के झाले. पुढे ते १३ वरुन १२ टक्के झाले. ओबीसीतील ४० ते ४५ जातींचे आरक्षण धोक्यात येऊ शकते, हे ओबीसी नेत्यांनी लक्षात घेणे जरूरीचे आहे. १९९४च्या परिपत्रकात आरक्षण देताना चूक झाली. त्यामुळे जाणकार नेत्यांनी कायदे कसेही पास करत गेलो तर वातावरण कलुषित होईल, हे लक्षात घ्यावे.’ पत्रकार परिषदेस राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, शैलजा भोसले उपस्थित होते.
मराठा समाजाला ५० टक्क्यांत व ५० टक्क्यांवरील आरक्षण देण्याची भाषा नेते करत आहेत. ते लोकांना भुलविण्यासाठी असून, सर्वोच्च न्यायालयातील क्युरेटिव्ह पिटीशनमध्ये दुरूस्ती केल्याखेरीज आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार नाही, असे कोंढरे यांनी स्पष्ट केले.
‘मनोज जरांगे-पाटील यांच्या दौऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामागे मराठवाड्यातील बेरोजगारी, राजकीय लोकांचे झालेले दुर्लक्ष, औद्योगिक विकासापासून वंचित प्रांत, अशी कारणे आहेत. त्याची गंभीरपणे नोंद घ्यायला हवी’, अशी अपेक्षा कोंढरे यांनी व्यक्त केली.
मराठा समाजाच्या व्यावसायिक विकासासाठी ‘पुढचं पाऊल’ ही मार्गदर्शिका तयार केली आहे. ती पाच लाख कुटुंबांपर्यंत पोचवली जाणार आहे. त्यातून समाजाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेले आरक्षण पुनर्स्थापित होईपर्यंत आरक्षणाच्या लढ्यात कोल्हापूर अग्रेसर राहील, असा निर्धार अखिल भारतीय मराठा समाजातर्फे आज करण्यात आला. नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळाला अभिवादन करण्यात आले. यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या हस्ते समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी वसंतराव मुळीक, शशिकांत पाटील, शैलजा भोसले उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.