कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर जगभरात 'ओमिक्रॉन'चा धोका पसरू लागला आहे.
सोलापूर : कोरोनाची (Covid-19) दुसरी लाट ओसरल्यानंतर जगभरात 'ओमिक्रॉन'चा (Omicron) धोका पसरू लागला आहे. या नव्या व्हेरिएंटची लक्षणे निश्चित झाली असून त्याचा सर्वाधिक धोका 40 पेक्षा कमी वयोगटातील तरुणांनाच असल्याची बाब समोर आली आहे. प्रतिबंधित लस (Covid Vaccine) न घेतलेलेच सर्वाधिक बाधित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्राला प्रस्ताव पाठवून कोविशिल्ड (Covishield) लसीच्या दोन्ही डोसमधील अंतर कमी करण्याची मागणी केली आहे.
पहिल्या लाटेत कोरोना तर दुसऱ्या लाटेत डेल्टा (Delta) अन् डेल्टा प्लस (Delta+) हे नवे व्हेरिएंट पाहायला मिळाले. आता ओमिक्रॉन हा नवा व्हेरिएंट आला असून त्याचा प्रसाराचा वेग पूर्वीच्या विषाणूच्या तुलनेत दुप्पट असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे. त्याची बाधा झालेल्यांमध्ये सौम्य लक्षणे आढळली असून बहुतेक रुग्ण 40 वर्षांखालील आहेत. चिंतेची बाब म्हणजे, ओमिक्रॉन झालेल्या बहुतांश रुग्णांनी कोरोनावरील प्रतिबंधित लस घेतलेली नाही. कर्नाटकात आढळलेले दोन्ही रुग्ण आफ्रिकेतून आल्यानंतर 11 ते 20 दिवसांनी शोधण्यात यश मिळाले. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील सर्वच संशयितांना शोधले की नाही, याचे उत्तर अद्याप अस्पष्टच आहे. महाराष्ट्र सरकारने सावध भूमिका घेऊन राज्याच्या सीमावर्ती भागात तपासणी वाढविली आहे. राज्यातील नऊ कोटी 14 लाखांपैकी साडेसात कोटी व्यक्तींनी लस टोचून घेतली आहे. अजूनही पावणेदोन कोटी व्यक्ती लसीकरणापासून दूर असून दुसरा डोसही एक कोटी व्यक्तींनी घेतलेला नाही. त्यांना आता 'हर घर दस्तक'च्या माध्यमातून घरापर्यंत जाऊन लस टोचली जात असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
ओमिक्रॉनची लक्षणे...
घशात खवखवणे अन् कोरडा खोकला लागणे
काम न करताही येतो थकवा; डोकेही प्रचंड दुखते
शरीराचे स्नायू दुखावतात अन् दम लागतो
शरीराचे तापमान प्रचंड वाढते; वारंवार ताप येतो
कोरोनावरील प्रतिबंधित लस न घेतलेल्यांनाच सर्वाधिक धोका
राज्याचा केंद्राला प्रस्ताव...
कोविशिल्ड लसीच्या दोन्ही डोसमधील 84 दिवसांचा कालावधी कमी करावा
12 वर्षांवरील लहान मुलांना कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचायला द्या मान्यता
लस घेऊन सहा महिन्यांहून अधिक काळ झालेल्यांना बूस्टर डोससाठी द्यावी परवानगी
दम लागणे, थकवा अन् स्नायू दुखणे ही ओमिक्रॉनची प्रमुख लक्षणे आहेत. लस न घेतलेल्यांनाच या विषाणूचा सर्वाधिक धोका असून कोविशिल्ड लसीच्या दोन्ही डोसमधील अंतर कमी करणे आवश्यक आहे. हा विषाणू हवेतून पसरत असल्याने प्रत्येकाने कापडापेक्षा मास्क वापरायला हवा.
- डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर
ओमिक्रॉनपासून बचावाचे उपाय...
कापड अथवा कापडी रुमाल वापरणे टाळा
एन-95 मास्कवर वापरा सर्जिकल मास्क
कोरोनावरील प्रतिबंधित लसीचे दोन्ही घ्या डोस
गर्दीत जाणे टाळावे, लक्षणे आढळल्यास तत्काळ करून घ्या कोरोना चाचणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.