महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Assembly Election 2024: पंकज भुजबळांनाच आमदारकी का? महायुतीने मराठा मतांचा नाद सोडून दिलाय का? 'असं' आहे राजकीय गणित

Komal Jadhav (कोमल जाधव)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल आज वाजलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्याआधी दुपारी १२.३० च्या सुमारास राज्यपाल नियुक्त सात आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी भाजपकडून चित्रा वाघ, विक्रांत पाटील, महंत बाबूसिंग महाराज राठोड, शिवसेना शिंदे गटाकडून मनीषा कायंदे आणि हेमंत पाटील तर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून इद्रीस नायकवडी आणि पंकज भुजबळ यांनी आमदारकीची शपथ घेतली. तरी, आता अजित पवार गटातून इद्रीस नायकवडी आणि पंकज भुजबळांनाच संधी का देण्यात आली? त्यांचीच निवड का झाली? हे समजून घेऊयात.

१. इद्रीस नायकवडी

मूळ सांगलीचे. सांगली, मिरज कूपवाड महापालिकेचे माजी महापौर राहिलेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. अल्पसंख्याक चेहरा असल्यानं त्यांना संधी देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

तर, राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून संधी दिल्यानंतर अजितदादांनी दिलेला शब्द पाळल्याचं इद्रीस नायकवडी यांनी म्हटलं आहे.

२. पंकज भुजबळ

पंकज छगन भुजबळ हे नावच पुरेसं आहे. मराठा विरुद्ध ओबीसी आंदोलनात जरांगेंविरुद्ध मोठं आंदोलन उभारणारे छगन भुजबळांचे ते चिरंजीव. म्हणजे राज्यातील सध्याचं सत्तेचं गणित पाहिलं तर महायुतीचा मराठा मतदार त्यांच्यापासून दूर चालला आहे. त्यामुळे मराठा दुरावत असेल तर ओबीसींना जवळ करण्यासाठी भुजबळ हे महायुतीसाठी मोठं प्यादं आहे आणि मागील काही दिवसात भुजबळांनी स्वत:ला कायम ओबीसींचं नेतृत्व म्हणून सगळीकडे शोकेस केलं आहे. मग ते मंत्रिमंडळ असो वा बाहेर.

म्हणजे एकदा तर, सत्तेत असूनही, मंत्री असूनही ओबीसी समाजासाठी मंत्रिपदाला धुडकावण्याची तयारी भुजबळांनी दाखवली होती. पण, त्यांना अजितदादांनी रोखल्याचं त्यांनी म्हटलं. त्यानंतर लोकसभा निवडणुकीवेळीही मोदी-शाहांनी आपल्यावर विश्वास दाखवला पण पक्षनेतृत्वानं उमेदवारी घोषित करायला वेळ लावला म्हणत भुजबळांनी निवडणुकीतून माघार घेतली अन् महायुतीला लवकरात लवकर उमेदवार घोषित करण्याचं आवाहन केलं. त्यामुळे तिथेही भुजबळांची नाराजी स्पष्ट दिसून आली.

जेव्हा मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद राज्यात तापला त्यावेळी सरकारदरबारी होणाऱ्या घडामोडी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून जरांगेंना दिली जाणारा वर्तणूक यावर भुजबळांनी वारंवार आक्षेप घेतला. अन् त्याला ओबीसी समाजाकडून, नेत्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. तर, सत्तेत असूनही मंत्रिमंडळात न बोलणाऱ्या भुजबळांनी माध्यमांसमोर येऊन सरकारवर ओढलेले ताशेरेही वादाचा मुद्दा बनला. महाविकासआघाडीनं याच मुद्द्यावरुन महायुतीला धारेवरही धरलं. तरी, भुजबळांना महायुती अन् सरकारप्रती असणारी नाराजी दूर करण्यासाठी भुजबळांच्या एकाच घरात सध्या तीन पदं दिली जात असल्याची चर्चा आहे. एक म्हणजे स्वत: छगन भुजबळ येवल्यातून आमदार आणि राज्याच्या कॅबिनेटमध्ये मंत्री आहेत. दुसरे आता चिरंजीव पंकज भुजबळांना राज्यपाल नियुक्त आमदार केल्यानं दुसरी आमदारकी त्यांच्या घरात गेली आहे. तर तिसरं नाव म्हणजे त्यांचे पुतणे समीर भुजबळ, ज्यांना नांदगावातून विधानसभेसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी छगन भुजबळ इच्छुक आहेत. तशा शुभेच्छा त्यांनी समीर भुजबळांना वाढदिवसाला शुभेच्छा देताना आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमधून बोलून दाखवल्या.

त्यामुळे भुजबळांचं ज्येष्ठत्व, त्यांची राजकीय कारकीर्द पाहता सध्या अजितदादांना त्यांची नाराजी भरून काढण्यासाठी समीर भुजबळांनाही आमदारकी देतात का हे पाहणं महत्वाचं असेल. पण, पंकज भुजबळांना राज्यपालनियुक्त आमदारकीची संधी देऊन त्यांनी कुठेतरी भुजबळांची नाराजी ५० टक्के मिटवल्याची चर्चा रंगतेय.

Rajeev Kumar on Media Trends: एक्झिट पोल्सचा फेक डेटा दाखवण्याचा अट्टाहास? मुख्य निवडणूक आयुक्त मीडिया ट्रेन्ड्सवर भडकले

Election Commission : पेजरचे स्फोट होतात, मग EVM कसे हॅक होणार नाहीत... निवडणूक आयोगाने दिलं उत्तर

PAK vs ENG: सईम आयूब, कामरान घुलाम या नवख्या खेळाडूंनी पाकिस्तानला सावरले; पहिल्या दिवसाअंती केल्या २५९ धावा

Baba Siddique : म्हणून शाहरुख बाबा सिद्दिकीच्या अंत्यसंस्काराला राहिला गैरहजर ; जाणून घ्या कारण

Latest Maharashtra News Updates : निकाल त्यांच्या बाजूने जात नाही, तेव्हा ईव्हीएम खराब - शिंदे

SCROLL FOR NEXT