सोलापूर : पूर्वीच्या काळात आधुनिक सोयी-सुविधा, जीम नव्हत्या. त्यावेळी टाकाऊ कापड एकमेकात गुंडाळून केलेल्या चेंडूने लगोरी हा खेळ खेळला जायचा. खो-खो, गोट्या, विट्टी दांडू, सागरगोटे (गजगे), सूरपारंब्या, भोवरा, कांदा फोडी, लोम्पाट, चोरी-पोलिस असे प्रमुख साधारण खेळ खेळले जायचे. पण, स्पर्धेच्या काळात ते खेळ पडद्याआड जात आहेत. परंतु, प्राचीन काळातील प्रत्येक खेळातून सुदृढ आरोग्य व मैत्रिपूर्ण संबंधाची शिकवण दिली आहे.
१) लगोरी
या खेळात एक बॉल (शक्यतो रबर किंवा चिंदी बॉल) आणि एकमेकांवर रचलेल्या सात सपाट दगडांचा ढीग असतो. हा खेळ साधारणपणे दोन संघात खेळला जातो, प्रत्येक संघात किमान तीन आणि जास्तीत जास्त ९ खेळाडू असतात. तीन खेळाडूंना प्रत्येकी तीन संधी मिळतात. सुमारे २० फूट अंतरावरून उभ्या रचलेल्या दगडांना खाली पाडण्याचा नियम असतो. जर एक संघ दगड पाडू शकला नाही तर पुढच्या संघाला बॉल फेकण्याची संधी मिळते. बचावात्मक संघाचे उद्दिष्ट हे फेकणाऱ्या संघातील कोणत्याही खेळाडूला गुडघ्याच्या खाली असलेल्या चेंडूने मारणे अपेक्षित आहे.
२) सूरपारंब्या
मोठ्या झाडांवर चढून, उड्या मारुन खेळला जाणारा हा खेळ आहे. झाडाच्या फांद्या पक्क्या हव्यात. दोन-तीन मुलांपासून कितीही मुले हा खेळ खेळू शकतात. अंगणात एक गोलाकार रेखून त्यात एक काडी किंवा काठी ठेवायची. एकावर राज्य व इतरांपैकी एकाने पाया खालून वर्तुळातील काठी लांब फेकायची. राज्य असलेल्या मुलाने ती काठी आणून वर्तुळात ठेवायची. तेवढ्या वेळात इतर मुलांनी पटापट झाडावर चढून जायचे किंवा वडा सारख्या झाडाच्या पारंब्याला लोंबकळून पाय जमिनीच्या वर घ्यायचे. कुणी खाली राहिल्यास त्याला राज्य घेतलेल्या मुलाने पकडायचे किंवा दोन मुलाने झाडावरून उडी मारुन काठी पुन्हा पायाखालून फेकण्याचा प्रयत्न करायचा. राज्य असलेल्या मुलाने पटकन कुणाला तरी पकडायचे जो आउट होईल, त्याच्यावर राज्य. पुन्हा सर्वांनी पळत जाऊन झाडावर चढायचे.
३) लोम्पाट (सुरफाटी किंवा आट्यापाट्या)
प्रामुख्याने पावसाळ्यात अन् इतर कोणत्याही वेळी खेळला जाणारा हा प्राचीन खेळ आहे. यात दोन्ही बाजूला चौकोनी बॉक्स आखलेले असतात. खेळाडूंच्या प्रमाणात कितीती चौकोन खाली आखता येतात. दोन संघातील या खेळात राज्य घेणारा एक आणि प्रत्येक चौकानाजवळ रेघा ओढून विरुद्ध संघाचा एक खेळाडू थांबलेला असतो. चौकोनात उभारलेल्या प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूला त्याठिकाणाहून खाली जाऊ द्यायचे नाही, ही जबाबदारी विरुद्ध संघाच्या त्या खेळाडूवर असते. चौकोनातून सुटून खालीपर्यंत जाणारा खेळाडू एक नंबरच्या चौकानात आला की समोरील संघ हरतो. चौकोनातून जाताना एकाजरी खेळाडूला विरुद्ध संघाच्या खेळाडूने हात लावला तर तो संघ तेथेच हरला जातो.
आरोग्याच्या समस्यांवर पारंपारिक खेळांचा उपाय
पूर्वीचे जुने खेळ हे शारीरिक हालचालीशी संबंधित होते. मुली-महिलांना मासिक पाळीसह इतर समस्या हालचाली होत नसल्याने जाणवतात. लगोरी, विट्टी दांडू अशा खेळांमधून ‘एकाग्रता’ वाढायला मदत होते. तसेच टिम बिल्डिंग, लिडरशीप वाढण्यास मदत होते. तणाव कमी होऊन शांत झोप लागेल. पालकांनी मुलांच्या हाती मोबाईल, टीव्ही अशी साधने देण्यापेक्षा पारंपारिक खेळाची आवड निर्माण करायला हवी, असे शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालयातील प्राचार्या डॉ. विणा जावळे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.