राज्याच्या जल खात्याचा अहवालच बदलून व चुकीची आकडेवारी जाहीर करून शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी बारामतीला वळविण्यात आले असल्याचा आरोप केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केला. मंत्री शेखावत सोमवारी (ता. १३) पंढरपुरात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी बारामतीकरांवर निशाणा साधला.
मंत्री शेखावत म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्या समितीने सर्वेक्षण केले असता ही बाब उघडकीस आली आहे. दुष्काळी भागाला पाण्याची गरज आहे. त्यामुळे या भागात योजना पूर्ण करण्यासाठी निधी देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
केंद्रीय मंत्री शेखावत यांनी सोमवारी पुणे ते उजनी धरणापर्यंत असणाऱ्या विविध जलसंपदा विभागांच्या योजनांची हवाई पाहणी केली. यानंतर त्यांनी पंढरीत येऊन श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. यावेळी खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार शहाजी पाटील, समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक आदींसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी गजेंद्रसिंह शेखावत यांनी, येथील शेतकऱ्यांवर अन्याय झाला असल्याचा दावा केला. जल खात्याचा अहवालच बदलून व चुकीची आकडेवारी जाहीर करून शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी बारामतीला वळविण्यात आल्याचा आरोप केला. खासदार निंबाळकर यांनी याबाबत वारंवार मागणी करून सर्वेक्षणाची मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन केंद्र व राज्य सरकारच्या समितीने सर्वेक्षण केले असता ही बाब उघडकीस आली आहे. जल खात्याचा अहवालच जाणीवपूर्वक बदलून पाणी वळविण्यात आल्याचे सिद्ध झाल्याचे शेखावत यांनी सांगितले. याद्वारे त्यांनी पवार यांच्या कुटुंबीयांचे नाव न घेता पाणी पळविल्याचा आरोप केला.
दरम्यान, पावसाचे पाणी चंद्रभागा नदीमधून मोठ्या प्रमाणात वाहून जाते. हे पाणी अडविण्याबाबत लवादाचा कोणताही आक्षेप नाही. यामुळे नदीमध्ये विविध ठिकाणी मोठे बॅरेज बांधून त्याद्वारे वाहून जाणारे पाणी अडविल्यास त्याचा शेतकऱ्यांना शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होऊ शकतो. तसेच नीरा देवघर धरणाच्या उजव्या कालव्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. हे काम पूर्ण केल्यास पंढरपूरसह सांगोला, माढा, करमाळा आदी तालुक्यातील दुष्काळी भागांना पाणी मिळू शकते. यासाठी राज्य शासनाने या योजनेचा प्रस्ताव तयार करून केंद्राकडे पाठवावा, अशी सूचना आपण केली आहे. हा प्रस्ताव येताच तो पूर्ण करण्यासाठी मदत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील महत्त्वाचे रखडलेले जल प्रकल्प, प्रस्तावित प्रकल्प याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री यांच्याबरोबर दिल्लीमध्ये एक बैठक घेणार असून, यामध्ये या प्रकल्पांचा समग्र आराखडा बनविला जाणार असल्याची माहितीही शेखावत यांनी यावेळी दिली.
दरम्यान, कृष्णा- भीमा स्थिरीकरणबाबत बोलताना शेखावत यांनी, लवादाने याबाबत काही निर्णय दिल्यामुळे सध्या हे काम इतर पद्धतीने कसे करता येईल, यावर विचार सुरू असल्याचे आश्वासन दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.