सोलापूर : भोंग्यासाठी सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेतच परवानगी राहील. औद्योगिक, व्यापारी व निवासी क्षेत्राबरोबरच शांतता झोनमध्ये ५० ते ७५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज असू नये, असेही सूचना पोलिसांनी केल्या आहेत. दरम्यान, मशिदींसह मंदिरांवरील जुन्या भोंग्याना परवानगी घेऊन ते नियमित करावेत तर नवीन भोंगे लावण्यापूर्वी स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी, अशा सूचनाही पोलिसांनी केल्या आहेत.
राज्यात भोंग्यावरून वातावरण तापले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ३ मेपर्यंत भोंगे काढण्यासाठी अल्टिमेटम दिला आहे. तत्पूर्वी, पोलिसांनी १९८६ आणि २००० मध्ये केलेल्या कायद्याचा आधार घेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मशीद असो वा मंदिरावरील भोंग्यांच्या आवाजाची मर्यादा निश्चित केली आहे. दरम्यान, कोणताही वाद निर्माण होऊ नये, सामाजिक शांतता व सुव्यवस्था बिघणार नाही, यादृष्टीने पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहेत. सोलापुरातील एका हनुमान मंदिरावर आज (मंगळवारी) भाजप नेते मोहित कंबोज यांनी दिलेला नवीन भोंगा लावून त्यावरून हनुमान चालिसा वाजविण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेऊन संबंधितांना परवानगी घेण्याचे आवाहन केले. त्यावेळी उपस्थितांनी शहरातील किती मशिदींवरील भोंग्यांना परवानगी आहे, असा उलट प्रश्न पोलिसांना केला. तर भाजप आमदार तथा माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पोलिसांची भूमिका सर्वांसाठी समान असावी, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला. त्यावर आता पोलिसांनी शहरातील सर्व मंदिरे व मशिदींवरील भोंग्यांसाठी परवानगी घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आवाजाची मर्यादा ओलांडू नये, असे आवाहनही केले आहे. दरम्यान, आठवड्यातून एका दिवशी त्या भोंग्याच्या आवाजाची मर्यादा मोजण्याचाही निर्णय घेतला आहे.
मंदिर, मशिदीवरील भोंग्यांसाठी पोलिसांकडून परवानगी घ्यावी, अशा सूचना सर्वांना दिल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ अंतर्गत ध्वनीप्रदूषण (नियंत्रण) नियम २००० चे नियम ३ (१) ते ४ (१) नुसार आवाजाची पातळी मर्यादित ठेवावी.
- उदसिंह पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, 'एफसी' पोलिस ठाणे, सोलापूर
आवाजाची झोननिहाय मर्यादा
झोन दिवसा रात्री
औद्योगिक ७५ डेसीबल ७० डेसीबल
व्यापारी ६५ डेसीबल ५५ डेसीबल
निवासी ५५ डेसीबल ४५ डेसीबल
शांतता ५० डेसीबल ४० डेसीबल
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.