मुंबई: आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांना संबोधित करत आहेत. आज बाळासाहेब ठाकरेंची ९६वी जयंती आहे. त्यानिमित्ताने शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच मोदी-शहांनीही निवडणुकीत माझ्या चेहऱ्याचा वापर केला असल्याचं त्यांनी म्हटलंय.
त्यांनी म्हटलंय की, आज मी तुमच्यासमोर खूप दिवसांनी आलो. मधले एकदोन महिने माझे उपचारामध्ये गेले. लवकरात लवकर मी बाहेर पडून महाराष्ट्र पिंजून काढणार. जे माझ्या विरोधात तब्येतीची काळजी घेत आहेत, त्या विरोधकांना मी भगव्याचं तेज दाखवणार आहे. हे काळजीवाहू विरोधक कधीतरी आपले विरोधक होते, ज्यांना आपण पोसलं, मागेही मी म्हटलो की २५ वर्षे आपली युतीमध्ये सडली. ते मत ठाम आहे, असं त्यांनी म्हटलंय.
पुढे ते म्हणाले की, हिंदूत्वासाठी आपल्याला सत्ता हवी होती. आजचं यांचं हिंदूत्व हे सत्तेसाठीचं आहे. त्यांनी हिंदूत्वाचं कातडं पांघरलं. अनेकदा आपल्यावर टीका होते. आम्ही हिंदुत्व नाही सोडलं, दूर जाऊ शकत नाही. भाजपला सोडलं, हिंदूत्व नाही. भाजप म्हणजे हिंदूत्व नाही, असंही त्यांनी म्हटलंय. अमित शहा आपल्यावर टीका करुन म्हणाले, एकट्याने लढा. आम्ही हे आव्हान स्विकारलं आहे. आव्हान द्यायचं आणि मागे इडीची पीडा लावायची हे शौर्य नाही, असं त्यांनी म्हटलंय.
ते आपल्यावर टीका करतात की आपण मोदी-शहांच्या चेहऱ्याचा वापर केला तर तसेच भाजपनेही आपल्या चेहऱ्याचा वापर केला आहे, असं आपण म्हणू शकतो. मोदी आणि शहांच्या निवडणुकीचा अर्ज भरायला आपल्याला आग्रहाने बोलावलं गेलं ते कशासाठी? अत्यंत आग्रहाने यासाठी बोलावलं गेलं कारण त्यांनाही आपल्या चेहऱ्याचा वापर करायचा होता, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.
पुढे त्यांनी म्हटलंय की, ते दिवस आठवा ज्यावेळी यांचं डिपॉझिट जप्त व्हायचं. त्यावेळी यांनी प्रादेशिक पक्षाशी युती करुन सरकार चालवलं. आता तोच भगवा पुसट होत चालला आहे. हे नवहिंदुत्ववादी हिंदुत्वाचा वापर स्वताच्या स्वार्थासाठी करत आहेत. सोयीप्रमाणे बदलणारे हिंदुत्व आमचं नाही. सत्ता पाहिजे मम्हणून हिंदुत्वाद्यांशी युती, संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीश कुमारशी युती, मेहबुबा मुफ्तीशी युती, असं करणारे हे नवहिंदुत्वावादी आहेत. हिंदुत्व असं असू शकत नाही. खरे हिंदुत्ववादी असेल तर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत एक धोरण करुन चला. आम्हाला गुलामासारखं वागवू इच्छित होता. आम्ही सूर्य उगवल्यावर शपत घेतली अंधारात नाही. चोरून मारु नाही. आम्ही करतो ते उघडपणाने करतो. तुम्ही दिलेलं वचन मोडंल म्हणून आम्ही घऱोबा केला. अनेक ठिकाणी सरकार पाडून घरे तोडून सरकार स्थापन केल आणि लोकशाहीच्या गप्पा मारल्या. हे हिंदुत्व नाही, असं त्यांनी म्हटलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.