सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने अचानकपणे कांदा लिलाव बंद ठेवल्याने शेतकऱ्यांनी आज (शुक्रवारी) ठिय्या आंदोलन सुरू केले होते. आंदोलनाचे वृत्त समजतात जेलरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी हे आपल्या पथकासह बाजार समितीत दाखल झाले. सुरवातीला त्या अधिकाऱ्याने शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकरी लिलावावर ठाम होते. यावेळी एक शेतकरी आपली बाजू मांडत असताना म्हणाला, ‘साहेब तुम्हाला आमची व्यथा, दु:ख काय समजणार’. त्यावेळी त्या पोलिस अधिकाऱ्याचा तोल घसरला व त्यांनी त्या शेतकऱ्याला प्रवेशद्वाराबाहेर नेऊन ‘बुटाने मारीन, गेटबाहेर नेऊन तुडवीन’ अशी भाषा वापरल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पण, आंदोलन निवळल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यास स्वत:ची चूक लक्षात आली आणि आपण रागाच्या भरात बोललो, असे सांगून त्या निषेधार्ह वक्तव्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
कुठलीही पूर्वसूचना न देता अचानकपणे कांद्याचे लिलाव बंद ठेवल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाच्या या निर्णयाविरुद्ध शुक्रवारी (ता. ८) बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला. त्यानंतर बाजार समिती प्रशासनाने पोलिसांना बोलावून शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. शेवटी शनिवारी (ता. ९) बाजारपेठ बंद ठेवून बाजार समितीतील दाखल कांद्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. एकूण आज बाजार समिती प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आणले.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील काही व्यापाऱ्यांची मनमानी व बाजार समिती प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका शेतकऱ्यांना बसला. बाजार समितीत ६०० ट्रक कांदा आलेला असतानाही शेतकऱ्यांना पूर्वकल्पना न देताना अचानक कांद्याचे लिलाव बंद ठेवले. यामुळे कांदा विक्रीसाठी आलेल्या संतप्त शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली. दरम्यान, आंदोलनाची माहिती मिळतात जेलरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आपल्या कर्मचाऱ्यांसह त्याठिकाणी दाखल झाले. यावेळी संतप्त शेतकरी बाजार समितीच्या मुख्य इमारतीसमोर ठिय्या मांडून बसले होते. पोलिस प्रशासनाने मध्यस्थी करीत आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला. काहीवेळाने बाजार समितीचे संचालक केदार उंबरजे त्याठिकाणी आले. त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कांद्याचे काटे (वजन) तत्काळ सुरू होईल, अशी ग्वाही दिली. त्यानंतर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.
गुरुवारी विक्रमी आवक; शुक्रवारचे नियोजन कोलमडले
बुधवारी (ता. ६) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले होते. गुरुवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ८६८ गाड्यांची विक्रमी आवक झाली. गुरुवारी लिलाव झालेल्या कांद्याची उचल रात्रभर सुरू होती. त्यामुळे शुक्रवारी बाजार समितीचे नियोजन कोलमडले आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीला सामोरे जावे लागले.
कांद्याचे लिलाव आज होणार
गुरुवारी झालेल्या विक्रमी आवकेमुळे सर्व यंत्रणा रात्रभर जागी होती. त्यामुळे शुक्रवारी कांदा उतरणे व चढविणे शक्य नव्हते. त्याचबरोबर केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यामुळे खरेदीदारांनीही व्यापारात सहभाग न होण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे शुक्रवारी लिलाव होऊ शकले नाहीत. शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला, मात्र सर्व संबंधित अडत्यांना शेतकऱ्यांच्या जेवणाची तसेच निवासाची सोय करण्याच्या सूचना दिल्या असून उद्या शनिवारी (ता. ९) या सर्व कांद्याचा लिलाव होईल.
- केदार उंबरजे, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, सोलापूर
५०० गाड्यांमधील कांद्याचा आज लिलाव
शुक्रवारी (ता. ८) बाजार समितीत जवळपास ५०० गाड्या कांदा असून या सर्व कांद्याचे लिलाव उद्या (शनिवारी) सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होईल. शनिवारी कोणताही कांदा बाजार समितीत येणार नाही, याची खबरदारी आडत व्यापाऱ्यांकडून घेण्यात आली आहे. केंद्र सरकारने निर्यात बंदी केली, तरीदेखील देशात आणि राज्यात कांदा लागवड कमी असल्याने भाव कमी होणार नाहीत, असे काही आडत व्यापाऱ्यांनी सांगितले. आंध्र प्रदेश, तमिळनाडू या ठिकाणी पाऊस पडल्याने कांद्याची वाहतूक बंद होती. त्यामुळे थोडासा भाव कमी झाला, पण पुन्हा तो वाढेल अशी स्थिती असल्याचेही सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.