महाराष्ट्राच्या राजकारणाला टर्निंग पॉइंट मिळाला आहे. सत्यजीत तांबे गनिमी कावा खेळत नाशिक शिक्षण मतदारसंघ निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या मतदार संघात काँग्रेसेने सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र त्यांना वेळेवर अर्ज दाखल केला नाही. तर सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत भाजपला मदत करण्याची विनंती केली. त्यामुळे सत्यजीत तांबे भाजप पुरूस्कृत उमेदवार ठरणार का, अशी चर्चा रंगली आहे.
राहुल गांधींचे कट्टर शिलेदार ते देवेंद्र फडणवीस यांच्याशी छुपी मैत्री, असा सत्यजीत तांबे यांचा प्रवास आहे. २७ एप्रिल २०१९ मध्ये राहुल गांधी यांची अहमदनगरच्या संगमनेरमध्ये प्रचारसभा होती. या सभेनंतर संगमनेर येथे मुक्काम केला यावेळी त्यांनी तेव्हा महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष असलेले सत्यजीत तांबे यांच्या घरी अचानक भेट दिली. त्यावेळी सत्यजीत तांबेंची मोठी तारांबळ उडाली. यावेळी तांबे यांनी राहुल गांधी यांचा चांगला पाहुणचार केला होता.
जशी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची मैत्री चर्चेत आहे. तशी सत्यजीत तांबे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या छुप्या मैत्रीची देखील चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गेविन न्यूजम यांनी लिहिलेल्या ‘सिटीझनविल’ हे पुस्तक सत्यजीत तांबे यांनी अनुवादीत केले. या पुस्तकाच्या लोकार्पण सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजीत तांबे यांची जाहीर स्तुती केली होती. यावेळी व्यासपीठावर काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री यशोमती ठाकूर, आमदार अमरिश पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पुस्तकाचे प्रकाशन झाल्यानंतर फडणवीस भाषण करण्यासाठी उभे राहिले तेव्हा त्यांनी काँग्रेसचे युवा नेते सत्यजीत तांबे यांचे कौतुक केले. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांना उद्देशून फडणवीस म्हणाले, "बाळासाहेब, माझी तक्रार आहे. सत्यजितसारख्या नेत्यांना किती दिवस बाहेर ठेवणार? त्यांना जास्त वेळ बाहेर ठेवू नका, नाहीतर आमचे त्यांच्यावर लक्ष आहे, कारण चांगली माणसे गोळा केली जातात." फडणवीसांच्या या वक्तव्यावर सभागृहात उपस्थित श्रोते हसले आणि खुद्द बाळासाहेब थोरात यांनाही हसू आवरता आले नाही. यानंतर देवेंद्र फडणवीस आणि सत्यजीत तांबे यांच्या मैत्रीबाबत चर्चा झाली.
सत्यजीत तांबे यांचा जन्म संगमनेर येथे डॉ. सुधीर तांबे आणि श्रीमती दुर्गाताई तांबे यांच्या पोटी झाला. त्यांचे आजोबा भाऊसाहेब थोरात हे थोर स्वातंत्र्यसैनिक आणि महाराष्ट्रातील सहकार चळवळीत त्यांनी मोलाचे कार्य केले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे सत्यजीत तांबे यांचे मामा आहेत.
सत्यजीत तांबे हे व्यवस्थापन व राज्यशास्त्रातील पदव्युत्तर पदवीधर आहेत. अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठातील जॉन एफ केनेडी स्कूलमध्येही त्यांनी शिक्षण घेतले आहे.
राजकीय प्रवास -
सत्यजीत तांबे हे काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रमुख युवा नेते आहेत. ते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहेत. युवक काँग्रेस ही जगातील सर्वात मोठी युवा संघटना आहे. या संघटनेत सत्यजीत तांबे चांगलेच सक्रिय होते. या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत. यावेळी त्यांनी पडद्यामागे राहूण किंग मेकरची भूमिका बजावली होती.
- सत्यजीत तांबे यांनी २००० मध्ये काँग्रेस कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली.
- २००० ते २००७ पर्यंत ते नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस होते.
- २००७ ते २०१७ पर्यंत ते अहमदनगर जिल्हा परिषदेच्या स्थानिक प्रशासकीय मंडळाचे ते सदस्य होते.
- २००७ मध्ये वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी त्यांच्या जिल्हा परिषद निवडणुकीत विजय झाला.
- २००७ मध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस बनले, हे पद त्यांनी २०११ पर्यंत भूषवले.
- २०११ ते २०१४ या काळात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली.
- सत्यजीत तांबे २०१७ पर्यंत जिल्हा परीषद सदस्य होते.
- २०१४ मध्ये राज्यात ज्या ६० जागांवर काँग्रेसचा अत्यल्प मतांनी पराभव झाला त्यात सत्यजीत तांबे यांचा देखील समावेश होता
- २०१८ मध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सत्यजीत तांबे निवडून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.