सोलापूर : मतदान प्रक्रियेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना पूर्वी मतदान संपताच रोख स्वरूपात भत्ता मिळत होता. या निवडणुकीपासून हा भत्ता ऑनलाइन मिळणार आहे. यासाठी सोमवारी (ता. १८) ट्रायल पेमेंटसाठी एक रुपया पाठविण्यात येणार असून पूर्ण रकमेसाठी कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. बुधवारपासून उर्वरित रक्कम प्रत्येकाच्या खात्यात जमा होईल.
प्रत्येक मतदार केंद्रावर एक केंद्रप्रमुख व इतर चार कर्मचारी काम करतात. या कर्मचाऱ्यांना निवडणूक भत्ता, आहार भत्ता देण्यात येतो. लोकसभा निवडणुकीपर्यंत हा भत्ता रोखीने देण्यात येत होता. मात्र, विधानसभा निवडणुकीपासून हा भत्ता ऑनलाइन स्वरूपात देण्याचा निर्णय झाला असून त्याबाबतचे पत्र उपसचिव तथा सह मुख्य निवडणूक अधिकारी के. सूर्यकृष्णमूर्ती यांच्या सहीने राज्यातील सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. यापत्रात नमूद करण्यात आले आहे की, निवडणूक कर्तव्यार्थ मतदान केंद्राध्यक्ष/ मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात येणार निवडणूक व आहार भत्ता हा ऑनलाइन स्वरूपात देण्यात यावा. यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक बॅंक खात्याचा तपशील पीपीएमएस (पोलिंग पर्सोनेल मॅनेजमेंट सिस्टिम) या स्वॉप्टवेअरमध्ये भरण्यात आलेली आहे.
पहिल्या व दुसऱ्या प्रशिक्षणानंतर ही माहिती जमा करण्यात आलेली आहे. आज (सोमवारी) यातील तपासणी करिता प्रत्येकाच्या खात्यावर प्रयोगिक तत्त्वावर एक रुपया पाठविण्यात येणार आहे. मतदान पथकांना रवाना करताना ज्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यावर एक रुपये ट्रायल पेमेंट मिळालेले नाही. त्यांचे बँक खाते अद्ययावत करण्यात येणार आहे. बॅंक खाते असल्याची खात्री झाल्यानंतर मंगळवारी (ता. १९) दुपारी तीन वाजता संपूर्ण यादी बॅंकेत दिली जाणार आहे. ही रक्कम बॅंकेने बुधवारी एक वाजता अदा करण्याची सूचना देण्यात आली आहे.
पारदर्शक पण करावी लागणार प्रतीक्षा
पूर्वी मतदान संपताच रोखीने मिळणारा भत्ता यंदा ऑनलाइन मिळत असल्याने यामध्ये पारदर्शकता येणार आहे. मात्र, बुधवारीच संबंधित बॅंका ही रक्कम जमा करणे कठीण आहे. मुळात या दिवशी बॅंकेला सुटी आहे. अनेक राष्ट्रीयकृत बॅंकेचे कर्मचारी निवडणूक ड्यूटीवर आहेत. यामुळे भत्तावाटप बुधवारीच होईल असे सांगता येत नाही. यामुळे यासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर येणार आहे. दरम्यान आतापर्यंतच्या निवडणूक प्रक्रियेत भत्ता वाटप करण्याची जबाबदारी केंद्रप्रमुखावर असे मतदानाची वेळ संपल्यानंतर इव्हीएम मतमोजणी केंद्रापर्यंत पोचविण्याची जबाबदारी प्रमुखांसह सर्व कर्मचाऱ्यांवर आहे. मात्र, यातील काही कर्मचारी वेळेअभावी दुसऱ्यावर जबाबदारी सोपवून निघून जात. यासाठी भत्ता मिळण्याचा अडसर होता. आता हा भत्ता ऑनलाइन मिळणार असेल तर केंद्र प्रमुखाचे यावरील नियंत्रण सुटणार आहे.
कुणाला किती भत्ता...
निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक कर्मचाऱ्यांना वेगळा दैनिक भत्ता आहे. या व्यतिरिक्त प्रतिदिन दोन वेळचा जेवण भत्ता १५० रुपयांप्रमाणे मिळतो. प्रशिक्षण काळात जेवणाची व्यवस्था केलेली असते. यामुळे याकाळातील भत्ता कपात केला जातो. मतदानाच्या दिवशी व आदल्या दिवशीच मात्र जेवणाचा भत्ता दिला जातो.
मतदान केंद्रावरील कर्मचारी
अ.क्र. पद दैनिक भत्ता एकूण दिवस
१) मतदान केंद्राध्यक्ष ३५० ४
२) सहा. मतदान केंद्राध्यक्ष २५० ४
३) मतदान अधिकारी एक २५० ४
४) मतदान अधिकारी दोन २५० ४
५) वर्ग चार कर्मचारी २०० २
६) पोलिस कर्मचारी २५० २
७) आशा कर्मचारी २०० १
८) स्वयंसेवक २०० १
९) सूक्ष्म निरीक्षक (एकदाच एक हजार रुपये)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.