सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष, सामाजिक जाणिवांनी समृद्ध व्यक्तिमत्त्व प्रतापराव गोविंदराव पवार १५ ऑक्टोबरला वयाची ८० वर्षे पूर्ण करून ८१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. प्रतापराव पवार सुमारे सहा दशके महाराष्ट्रातील कित्येक सामाजिक संस्थांचे सक्रिय कार्यकर्ते, भक्कम पाठिराखे आणि सक्षम मार्गदर्शक राहिले आहेत. या संस्थांच्या माध्यमातून लाखो लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडला. प्रतापराव पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या संस्थांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केलेल्या भावना विशेष पुरवणीद्वारे मांडत आहोत.
लघु उद्योगांचे तारणहार
श्री. प्रताप पवार आणि मराठा चेंबर ॲाफ कॅामर्स, इंडस्ट्रीज ॲन्ड ॲग्रिकल्चरचा ऋणानुबंध किमान तीस वर्षांचा आहे.
श्री. पवार चेंबरचे अध्यक्ष असताना विविध क्षेत्रांतील जाणकारांचे एक पॅनेल तयार करून (सिनियर एक्झिक्युटिव्हज् फोरम) त्याद्वारे प्रामुख्याने सूक्ष्म आणि लघु स्तरातील उद्योग घटकांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली. या समितीद्वारे पुढील अनेक वर्षे चेंबरच्या सभासदांना विविध क्षेत्रांत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच त्यांच्या पुढाकाराने उद्योग आणि शिक्षणसंस्था यांच्यात समन्वय साधून शैक्षणिक संस्थांमधला अभ्यासक्रम आणि उद्योग क्षेत्रात प्रत्यक्ष कार्यानुभव तसेच प्राध्यापक आणि उद्योजक यांच्यात संवाद साधण्यासाठी त्यांनी चेंबरमध्ये शिक्षण समितीची स्थापना करण्यात पुढाकार घेतला. या समितीची व्याप्ती कालांतराने वाढत गेली. आजही अनेक शिक्षणसंस्था आणि उद्योगघटक याचा लाभ घेत आहेत.
मराठा चेंबरमध्ये स्थापन झालेल्या कृषी आणि कृषी आधारित उद्योगांसाठीच्या समितीचे कार्य पुढे नेण्यासाठी, त्या क्षेत्रातील निर्यातीसाठीच्या संधी आणि तंत्रज्ञानाचा अवलंब यांच्या प्रसारासाठी श्री. पवार यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या नेतृत्वाखाली एस. एल. किर्लोस्कर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्र आकाराला आले आणि हजारो उच्चशिक्षित तंत्रज्ञ तसेच इतर क्षेत्रातील लोकांना कायमस्वरूपी नोकरी-व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्या.
श्री. प्रताप पवार यांच्या कार्यकाळात पुण्यातील आणि भारतातील सॅाफ्टवेअर क्षेत्राचा विस्तार होत होता. त्यावेळी प्रचलित असलेल्या Software Technology Parks of India (STPI) या योजनेचा लाभ घेऊन माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक कंपन्या स्थापन झाल्या होत्या. मात्र त्यांना अजून काही वर्षे आयातकर आणि मिळकतकर यातील सवलतीची गरज ओळखून त्यांनी केंद्र सरकारला निवेदन पाठवले. त्याची दखल घेऊन शासनाने ही योजना आणखी १० वर्षे वाढवली.
ते अध्यक्ष असताना महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या कार्यकक्षेत बदल करण्याच्या हालचाली सुरू होत्या. या आयोगामुळे केंद्र सरकारच्या धोरणानुसार वीजेच्या दराबाबत आणि वीज वितरण कंपन्यांच्या सेवांबाबत म्हणणे मांडण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ निर्माण झाले होते. राज्य शासनाच्या संभाव्य निर्णयामुळे त्या प्रक्रियेत हस्तक्षेप होण्याची दाट शक्यता होती. यासाठी तत्कालीन राज्यपाल महोदयांकडे मराठा चेंबर आणि इतर महत्त्वाच्या औद्योगिक संघटनांतर्फे संयुक्त निवेदन देण्यात यावे, यासाठी श्री. पवार यांनी पुढाकार घेतला आणि ही शिष्टाई फलद्रुप झाली. त्याचा लाभ आजही औद्योगिक आणि इतर ग्राहकांना होत आहे.
श्री. प्रताप पवार यांनी एक यशस्वी उद्योजक या नात्याने लघुउद्योजकांना कायमच प्रोत्साहन दिले आहे. तसेच निर्यातीवर भर देऊन उद्योगांनी आपला उत्कर्ष साधावा, यासाठीही मार्गदर्शन केले आहे. तसेच चेंबरच्या अनेक महत्त्वपूर्ण योजनांमध्ये सक्रिय योगदान दिले आहे.
त्यांना ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि शतायुषी भव ही सदिच्छा.
- दीपक करंदीकर, माजी अध्यक्ष, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲन्ड ॲग्रिकल्चर
प्रेरक व्यक्तिमत्व
विद्यार्थी साहाय्यक समितीचा माजी विद्यार्थी म्हणूण कार्यरत असल्याने पीजीपी सरांशी ओळख झाली होती. त्यांच्या २० मार्च २०२२ रोजीच्या व्याख्यानातील एक वाक्य माझ्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. ते म्हणाले उद्योजक व्हायला पैसा, जागा , भांडवल , ओळख याची गरज नसते , गरज असते ती म्हणजे तुमच्या काळजात ती आग आहे का ?. त्या वाक्याने माझ्या काळजात अशी आग लागली की पुढच्याच महिन्यातच खूप सेटल अशा २२ वर्षाच्या अभियांत्रिकी जॉब ला तिलांजली देत माझी कंपनी सुरु केली. सरांना कळताच त्यांनी तत्काळ मला बोलावले आणि त्याच वेळी त्यांची एक सदनिका वर्षभरासाठी वापरण्यास दिली. सरांच्या ह्या माझ्यावरील विश्वासाने मला दहा हत्तीचं बळ आलं , पुढे जीवतोड मेहनत केली. आज माझे स्वतःचे ऑफिस आणि १५ इंजिनिअर्स ची टीम आहे.
आज विद्या प्रतिष्ठान बारामती मध्ये तब्बल ४००० स्के फुट मध्ये ग्रामीण भागातील संबंध भारताच्या पहिल्या इंडस्ट्री ४.० च्या सेंटर ऑफ एक्सलन्स ची उभारणी झाली आहे. तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करत विद्यार्थ्यांना इथे स्मार्ट फॅक्टरीच्या सर्व घटकांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो.
पिजीपी सरांच्या शिस्तबद्ध नियोजनातून आमच्या सिम्युसॉफ़्टचे चार निवासी अभियंते आणि शिक्षकवर्ग हे २४ तास उपलब्ध असतात. औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील दरी कमी करत, आधुनिक कौशल्य व उद्योजकतेमध्ये उत्कृष्टतेची उंची गाठण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचे कार्य पीजीपी सरांच्या दूरदृष्टीतून या केंद्राद्वारे साकारले आहे. यासाठी महाराष्ट्रातील तमाम युवा पिढी त्यांची सदैव ऋणी राहील.
- सुनील चोरे, सीएमडी, सिम्युसॉफ़्ट टेक्नॉलॉजीज, पुणे
जाणते आधारस्तंभ
आदरणीय पद्मश्री प्रतापराव पवार हे स्व-रूपवर्धिनी संस्थेचे सन्माननीय सदस्य आहेत. वर्धिनीचे संस्थापक स्व. किशाभाऊ पटवर्धन यांनी विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी स्नेहाचे संबंध जोडले आणि त्यांचे सहकार्य व मार्गदर्शन संस्थेला मिळेल, यासाठी प्रयत्न केले. प्रतापराव हे वर्धिनीचे सुरवातीपासूनचे आधारस्तंभ.
वर्धिनीत युवक विभाग व अन्य जबाबदाऱ्या घेऊन काम करताना प्रतापरावांशी काही निमित्ताने संवाद होत राहिला. वर्धिनीचे पूर्ण वेळ काम करण्याचे थांबवल्यानंतर मी पत्रकारिता क्षेत्रात काम करू लागलो. मार्च २००३ मध्ये मी ‘सकाळ’मध्ये रुजू झालो.
‘सकाळ’मध्ये काम करताना साप्ताहिक बैठका, इतर संपादकीय कामांनिमित्त प्रतापराव अर्थात पीजीपी सरांची भेट व बोलणे होत असे. त्यांचा वेळेच्या बाबतीतील आग्रह आणि पत्रकारितेतील सामाजिक दृष्टिकोन या गोष्टी आमच्यासाठी आदर्श होत्या. पीजीपींना एका शस्त्रक्रियेच्या वेळी रक्ताची गरज होती. त्यावेळी मीही रक्तदान केले. त्यानंतर आपले आता रक्ताचे नाते जुळले आहे, अशा अर्थाचे पत्र त्यांनी आम्हा सर्वांना पाठवले. ‘सकाळ’मध्ये काम करणाऱ्या व्यक्तींकडे त्यांनी कधी कर्मचारी या दृष्टीने पाहिले नाही, तर नेहमी सहकारी या भूमिकेतूनच पाहिले. त्यामुळे त्यांच्याविषयीचा जिव्हाळा सर्वांमध्ये खोलवर पाझरला आहे.
- डॉ. संजय विष्णू तांबट, कार्याध्यक्ष, स्व-रूपवर्धिनी.
वक्तशीरपणाचा आदर्श
प्रतापराव पवार सरांनी १९९० च्या दशकात ‘सकाळ’ची सूत्रे स्वीकारली. त्यावेळी ‘सकाळ’चे वितरण पुणे आणि कोल्हापूर इतकेच मर्यादित होते. पुढच्या वीस वर्षांमध्ये सरांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ‘सकाळ’ पोहोचवला. ‘सकाळ’च्या विस्ताराच्या निमित्ताने ते महाराष्ट्रातील अनेक शहरांना सातत्याने भेटी देत. या भेटीच्या दरम्यान ‘सकाळ’चे बातमीदार, जाहिरातदार, वृत्तपत्र वितरक, ‘सकाळ’मध्ये काम करणारे सहकारी यांच्याशी त्यांचा सातत्याने संपर्क राहिला. या संपर्काचा भविष्यकाळामध्ये त्यांचा सर्वांशी ऋणानुबंध तयार झाला तो आजही कायम आहे. माध्यमांचा व्यवसाय करण्याआधी व करताना त्यांनी अनेक सामाजिक संस्था जोडल्या. माध्यमाचे बळ सामाजिक संस्थांना दिलं आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून समाज बदलण्याची महत्त्वाची भूमिका त्यांनी आजवर पार पाडली.
‘सकाळ’मध्ये त्यांच्यासोबत काम करताना त्यांची व्यवस्थापनाची अनेक कौशल्ये मला भावली. त्यापैकीच त्यांचा वक्तशीरपणा. ‘सकाळ’मधील मीटिंग्स आणि ‘सकाळ’चे कार्यक्रम वेळेत सुरू व्हायला हवेत याबाबत ते आजही आग्रही आहेत.
संस्थेसाठी वेळ देत असतानाच कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या आरोग्यासाठीही वेळ द्यायला हवा यासाठी ते नेहमीच आग्रही असतात. आरोग्याची काळजी कशी घ्यावयाची याचे आदर्श उदाहरण त्यांनी स्वतःच्या शिस्तबद्ध जीवनशैलीतून लोकांना दाखवून दिले आहे. सरांनी घालून दिलेल्या वाटेवरती वाटचाल करताना आज आम्हाला अभिमान वाटतो आहे. थँक्यू सर !!
- उदय जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी, सकाळ माध्यम समूह
सदाबहार व्यक्तिमत्त्व
सन १९८५ मध्ये मी पुण्यात नोकरीनिमित्त स्थायिक झालो आणि ‘सकाळ’मुळे प्रतापराव पवार हे नाव माहिती झाले.
माझा मित्र संजीव जगताप त्याकाळी मास्टेकमध्ये नोकरीला होता. एकदा संजीव म्हणाला, ‘प्रतापराव माझे मामा आहेत.’ त्यामुळे कॉम्युटर सोसायटी ऑफ इंडियाच्या एका सेमिनारला प्रतापराव प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. संजीवने आम्हा सर्वांना बजावले होते, ‘प्रतापराव वेळेचे पक्के आहेत. सगळं वेळेप्रमाणे करा.’ हा एक सुखद धक्का होता. कारण त्यापूर्वीचे सेमिनारच्या वेळी असा अनुभव आला नव्हता. नंतर मी मराठा चेंबरच्या आयटी समितीत काम करायला सुरवात केली आणि प्रतापराव सतत भेटत गेले.
प्रतापराव पोशाखाच्याबाबतीत एकदम स्मार्ट. कधीही मी त्यांना कॅज्युअल लूकमध्ये पहिले नाही. कधीकधी टेकडीवर फिरायला गेले असता, स्पोर्ट्स शर्ट व ट्रॅक पॅण्टमध्ये प्रतापराव भेटत. गेली तीस वर्ष त्यांच्यात काहीही फरक नाही. एका अर्थाने ते चॉकलेट हिरो देवानंदसारखेच सदाबहार आहेत. कै. निर्मलाताईं पुरंदरे यांच्यामुळे मी काही वर्ष विद्यार्थी साहाय्यक समितीत विश्वस्त होतो, त्यावेळी प्रतापरावांचा सहवास अजून लाभला. त्यांचे समाजसेवेबद्द्दलचे विचार, युवा पिढीबद्दल असलेली तळमळ जाणवली.
- डॉ. दीपक शिकारपूर, संगणक क्षेत्रातील तज्ज्ञ
सहवासातून प्रेरणा
सन २००४ मध्ये माझ्या पतीचे निधन झाले. या अनपेक्षित घटनेच्या धक्क्याने मी कोलमडून पडले होते. माझ्यासह माझ्या मुलीलाही हा मोठाच धक्का होता. अशा संकटाच्या काळात प्रतापरावांनी नेहमीच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आधार, सल्ला दिला. त्यांनी आम्हाला कशी मदत केली, या प्रश्नाचे एकच एक असे उत्तर देणार देता येणार नाही. शेकडो उत्तरे असतील. प्रतापरावांच्या व्यक्तिमत्वात ही उत्तरे दडलेली आहेत. त्यांची बुद्धिमत्ता, विनोदी वृत्ती, एखादी गोष्ट समजून सांगण्याची आणि इतरांची मते ऐकून घेण्याची क्षमता ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणता येतील.
व्यावसायिक मूल्यांची जोपासना, शिक्षणाचे महत्त्व, सतत कामात राहण्याची वृत्ती ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत.
- स्मिता निरगुडे (यूके) (अनुवाद – मयूर जितकर)
सजग मार्गदर्शक
`सकाळ`च्या पुरवणीत माझ्या उद्योजकतेच्या घडणीविषयी लेख प्रसिद्ध झाल्यावर तो वाचून त्यांनी लगेच मला घरी बोलावून घेतले. मला मिळालेल्या यशाचे कौतुक केले. उद्योजक हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यांच्याबरोबर संवाद साधताना त्यांनी दिलेल्या उदाहरणांमधून मी खूप प्रेरित झालो. माझ्या जर्मन जॉईंट व्हेंचरच्या कार्यक्रमासाठी मी सरांना आमंत्रित केले होते. त्या वेळेला त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये सांगितले की, जॉईंट व्हेंचर कंपनी मोठी झाली की जर्मन कंपन्या त्यांचे भाग वाढवून मूळ भागीदाराला बाहेर काढतात असा अनुभव आहे. या कंपनीबाबत तुम्ही तसे काही करू नका, असे त्यांनी जर्मन लोकांना निक्षून सांगितले. यावरून त्यांचा अनुभव आणि व्यापकता शिवाय सजग करण्याची पद्धत मला खूप भावली.
- जगन्नाथ इंगळे, उद्योजक, माजी विद्यार्थी, विद्यार्थी साहाय्यक समिती
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी योगदान
सुमारे ३५ वर्षांपूर्वी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुढाकाराने पुण्यात अंधश्रद्धा निर्मूलनाची जाहिरनामा परिषद घेण्यात आली होती. त्या जाहिरनाम्यावरील पहिल्या दोन सह्या होत्या ना. ग. गोरे आणि पु. ल. देशपांडे यांच्या. या परिषदेच्या संयोजनासाठी तयार करण्यात आलेल्या समितीचे प्रतापराव पवार अध्यक्ष होते. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती ट्रस्टची स्थापना करण्यात आली. डॉ. दाभोलकरांनी त्यांना ट्रस्टचे अध्यक्ष होण्याची विनंती केली. तेव्हापासून आजतागायत त्यांनी ही जबाबदारी समर्थपणे पेलली आहे.
- मिलिंद देशमुख, कार्यकर्ता, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
मराठी उद्योजकांसाठी धडपड
प्रतापराव पवार सरांचा वक्तशीरपणा, मृदूभाषिकता, सहृदयता, उत्तम वक्तृत्वकला, व्यावहारिकता, सामाजिक भान आणि महत्त्वाचे म्हणजे समोरच्या व्यक्तीबद्दल असलेला जिव्हाळा, अशा अनेकविध गुणांच्या प्रतापराव पवार सरांविषयीचा आदर वृद्धिंगतच होतो.
सरांचे वाचन अफाट आहे, अनुभव दांडगा आहे आणि उत्साह तर तरुणाईला लाजवणारा आहे. प्रत्येक भेटीत मराठी माणसाच्या व्यावसायिकवृद्धीसाठी काय करता येईल, याबाबत नवनवीन कल्पना मांडणे आणि त्यासाठी मदत देऊ करणे, हे तर सहजच घडते. अशा आदरणीय प्रतापराव सरांना अष्टदशकपूर्ती सोहळ्यादिनी सस्नेह प्रणाम आणि सहस्रपूर्ती वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
- माधव दाबके, सह संस्थापक टेक टॉक्स, संचालक, गर्जे मराठी ग्लोबल फाउंडेशन
शेतकरी हिताचा ध्यास
शेतकरी हिताचा ध्यास मनी बाळगून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर कमी खर्चात अधिक मोबदला देणारी शेती करण्यास शेतकऱ्यांना प्रवृत्त करणारे आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून मी प्रतापराव पवार यांच्याकडे पाहतो.
अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कामानिमित्ताने माझी प्रतापराव पवार सरांबरोबर भेट झाली. जागतिक स्तरावर सातत्याने विविध कामांच्या निमित्ताने फिरत असलेले व नाविन्याचा ध्यास घेतलेले प्रतापराव पवार यांच्या प्रचंड अनुभवाचा फायदा मला माझे काम करताना झाला.
संकटे आणि आव्हानांचा मुकाबला कसा करायचा, परिस्थितीशी कसे जुळवून घ्यायचे, हे मी त्यांच्याकडून शिकलो.
बारामतीतील अॅग्रिकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्टच्या विश्वस्तपदी प्रतापराव पवार यांची ७ ऑक्टोबर २०२० रोजी सर्वानुमते निवड झाली. गेल्या सहा दशकांच्या कारकिर्दीत विविध संस्थांच्या अध्यक्षपदी त्यांनी काम केलेले असून त्यांच्या अनुभवाचा फायदा ट्रस्टला सातत्याने झाला आहे. कृत्रिम बुध्दिमत्तेच्या मदतीने कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी शेती शक्य आहे, हे दाखवून देण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. उसाच्या शेतीवर हा प्रयोग सध्या सुरू आहे. त्यांचे जगभरातील मान्यवरांशी असलेले सौहार्दपूर्ण संबंध व त्यांना भारताशी जोडण्याचे कसब यातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक प्रगतीची वाट दाखवून दिली आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठ, मायक्रोसॉफ्ट, बिल गेट्स फाऊंडेशन अशा नामवंत संस्थांनी अँग्रिकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्टबरोबर काम सुरू केले आहे. आज फार्म ऑफ द फ्युचर हा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. शेतीसोबतच दुधाच्या पूरक व्यवसायावर भर देण्याचा प्रतापराव पवार यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या सूचनेनुसार गायीच्या शेणापासून प्रोमसारखी खते निर्माण केली गेली. बायोगॅसपासून वीजनिर्मिती सुरू झाली. सेंद्रिय खत निर्मितीमुळे संस्थेच्या तोट्यात गेलेल्या विभागाची आर्थिक घडी पुन्हा रुळावर येण्यास मदत झाली.
सन २०२२ - २०२३ या आर्थिक वर्षातील सर्वसाधारण सभेची नोटीस त्यांना टपालाद्वारे पाठवली गेली. त्यासाठी २५ रुपये शुल्क लागले. खर्चाबाबत जागरुक असलेले प्रतापराव पवार यांनी हीच नोटीस विनामूल्य असलेल्या समाजमाध्यमांद्वारे पाठविता आली नसती का, अशी विचारणा माझ्याकडे केली. प्रश्न पंचवीस रुपयांचा नव्हता तर संस्थेचे अवाजवी पैसे खर्च अजिबात होऊ नयेत, हा त्या मागील हेतू होता.
- डॉ. नीलेश नलावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, अँग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती.
Ideology of ‘Service unto Society.’
Mr. Pratap Pawar, known as ‘PGP Sir,’ is recognized for his humility, dedication and exceptional service. His association with COEP began in 2004 and as Chairman of the Board of Governors in 2019, he played a pivotal role in granting COEP the technological university status in 2022.
PGP Sir’s contributions went beyond expectations. He secured 29 acres of land at Chikhali, Pune, worth Rs. 300 crores, and persuaded the State Government to grant Rs. 150 crores for COEP’s research programmes. His commitment to the institution was unwavering, working closely with the State Government and COEP to ensure its advancement. A champion of indigenous product development, PGP Sir encouraged COEP students to explore opportunities in import substitution, fostering innovation. His modesty remained intact even after receiving the Padmashree, as he continued to embody the ideology of ‘Service unto Society.’
PGP Sir’s leadership and vision have left a lasting legacy at COEP, marking a transformative chapter in its history.
- Prof. B. B. Ahuja, Former Director, College of Engineering Pune
सामाजिक प्रश्नांसाठी भरीव योगदान
पीजीपी सरांच्या व्यक्तिमत्त्वाची व्याख्या करणारी काही मुख्य वैशिष्ट्ये आढळून येतात. त्यातील महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे वक्तशीरपणा. वक्तशीरपणा हा एक शिष्टाचार असून, पीजीपी सरांनी तो कायम पाळला आहे. कॅज्युअल असो वा प्रोफेशनल मीटिंग किंवा सार्वजनिक कार्यक्रम. प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी सर वेळेच्या आधी हजर राहतात. सरांनी नेहमी इतरांच्या वेळेला महत्त्व दिले.
पीजीपी सरांच्या विचारात कायम सुस्पष्टता दिसून येते. एखादा नवीन उपक्रम, उद्योग किंवा नवीन योजनेचा प्रारंभ करताना, सुरुवातीला त्यातील प्रत्येक बाबींचा अत्यंत तर्कशुद्ध विचार करून त्याचा समाजावर दीर्घकालीन होणारा परिणाम जाणून घेऊनच त्यास सरांकडून मान्यता दिली जाते. पीजीपी सरांनी कायमच व्यवसाय व समाजसेवा या दोन गोष्टी स्वतंत्र ठेवल्या त्यामुळेच सर दोन्ही क्षेत्रांत यशस्वी झाले आणि त्याचा एकूणच समाजाला फायदा झाला.
सरांसोबत काम करणे म्हणजे खूप गोष्टी शिकण्यासारख्या असून ही एक प्रकारची संधीच असते. कोणतेही काम करताना सरांचा कायम 'प्लॅन बी' तयार असतो. याशिवाय एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करून ते काम तडीस कसे नेता येईल, असा त्यांचा प्रयत्न असतो. अशा अनेक गोष्टी सरांकडून मला घेता आल्या.
- महेंद्र पिसाळ, मुख्य कार्यपालन अधिकारी, सकाळ माध्यम समूह
‘शिका आणि कमवा’ योजनेचे आधारस्तंभ
माझी श्री. प्रतापराव पवार सरांशी पहिली भेट झाली. एकदा ‘शिका व कमवा’ या संकल्पनेसंदर्भात माहिती देण्यासाठी वेळ मागितली. त्यांनी तत्काळ होकार देत थेट त्यांच्या घरी येऊन भेटण्यास सांगितले. संकल्पना सादर केल्यानंतर त्यांनी तिच्या आराखड्यात सुधारणा सांगत मोलाचे मार्गदर्शनही केले.
या योजनेअंतर्गत गोरगरीब घरातील विद्यार्थी- विद्यार्थिनींना मोठ्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये ऑन द जॉब ट्रेनिंग स्वरूपाचे काम करण्याची संधी मिळाली. टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज, कमिन्स, किर्लोस्कर, जनरल मोटर्स यासारख्या नामांकित साडेतीनशे कंपन्यांमधून आतापर्यंत एक लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी योजनेत सहभाग घेतला. ४५ हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अभियांत्रिकी पदविका प्राप्त करून त्याच कंपन्यांमध्ये तसेच इतर कंपन्यांमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळविली.
हे केवळ श्री. प्रतापराव पवार सर यांचे मार्गदर्शन आणि पाठपुराव्यामुळे प्रत्यक्षात येऊ शकले. अशा या दूरदृष्टी असलेल्या आणि कोणत्याही प्रकारची वैयक्तिक अपेक्षा न ठेवणाऱ्या तसेच इतक्या मोठ्या योजनेमध्ये स्वतःचा साधा नामोल्लेखही येऊ न देणाऱ्या, गुरूतुल्य व्यक्तिमत्वास वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
- विश्वेश कुलकर्णी, संस्थापक अध्यक्ष, यशस्वी शिक्षण संस्था समूह.
ग्रामीण समाजाशी बांधिलकी
श्री. प्रतापराव पवार १९ मार्च २००५ पासून बाएफ संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य आहेत. त्यांची बाएफबरोबरच्या प्रवासाची सुरुवात संस्थेचे विश्वस्त म्हणून झाली आणि लवकरच ते बाएफ कुटुंबाचा अविभाज्य घटक बनले. मला त्यांच्या विविध क्षेत्रांतील व्यासंगतेचा अत्यंत जवळून अनुभव घ्यायला मिळाला. ग्रामीण विकास असो, शिक्षण क्षेत्र असो किंवा कुठला व्यवसाय असो... सखोल अभ्यास, विषयाचे ज्ञान आणि त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांबरोबरचे संबंध या सर्वांचा सुरेख मेळ प्रतापरावांनी घातला आहे. या सर्वांचा फायदा त्यांच्या परिचयातील संस्था आणि व्यक्तींना करून देण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
बाहेरच्या ग्रामीण विकासाच्या कामात त्यांच्या या सर्वदूर असलेल्या सामाजिक संपर्काचा खूपच फायदा होतो. स्थानिक तसेच राष्ट्रीय स्तरावरील इतर अनेक समविचारी संस्थांबरोबर एकत्र काम करण्याची संधी त्यांनी बाएफला उपलब्ध करून दिली. अत्यंत व्यग्र वेळापत्रकातून त्यांनी नेहमीच ‘बाएफ’च्या कार्यक्रमांना वेळ देऊन ग्रामीण समाजासाठी त्यांची बांधिलकी सिद्ध केली आहे. बाएफ संस्थेच्या वतीने प्रतापरावांना त्यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
- डॉ. भरत काकडे, अध्यक्ष, बाएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन.
व्यवसाय आणि समाजकार्याचा समन्वय
प्रतापरावांचा आणि माझा संपर्क पहिल्यांदा सन २०१४ मध्ये एज्युकॉनच्या (Educon) माध्यमातून आला. मी त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा आणि त्यांच्या वक्तशीरपणाने खूप प्रभावित झालो. श्री. पवारसाहेब नेहमी समाजासाठी, लोकांच्या उन्नतीसाठी काय योगदान देता येईल, याचाच विचार प्रथम करतात. त्यांच्यामधील व्यावसायिक गुणही मला प्रकर्षाने जाणवतो. जो व्यवसाय कराल, त्याचा पूर्ण विचार केला पाहिजे. त्यातील व्यावसायिक प्रतिस्पर्धी काय करतात आणि जी सेवा किंवा प्रॉडक्ट देऊ ते उत्तम असले पाहिजे, यावर त्यांचा भर असतो. त्यांच्याबरोबर काम करताना त्यांच्यावरील कौटुंबिक संस्कार, व्यावसायिकता आणि समाजाप्रती असलेली तळमळ नेहमीच काम करण्यास प्रेरणा देते. त्यांना उदंड निरोगी आयुष्य लाभो, हीच शुभेच्छा.
- डॉ. गिरीश देसाई, कार्यकारी संचालक, पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी
समितीसाठी अनमोल योगदान
१९८३ ते ८६ या काळात मी समितीमध्ये विद्यार्थी म्हणून राहात असल्यापासून प्रतापरावांचा सहवास अनुभवण्याची अमूल्य संधी मला लाभली. आधी विद्यार्थी म्हणून आणि नंतर समितीमध्ये विविध पदभार सांभाळताना प्रतापरावांचे सामाजिक भान, मार्गदर्शक म्हणून त्यांची भूमिका, दानशूरपणा, अचूक निर्णयक्षमता, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय दिग्गज व्यक्तींबरोबर त्यांचे असलेले सलोख्याचे संबंध आणि त्या त्या व्यक्तींना योग्य संस्थेबरोबर जोडून घेण्याचे त्यांचे कौशल्य, समजायला सहजसोपी अशी ओघवती लेखनशैली, अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाचा मला परिचय होत गेला आणि मी पण थोडा समृद्ध झालो. मला व्यक्तिशः त्यांचा सर्वात भावलेला विशेष म्हणजे त्यांचा साधेपणा. त्यांना जेव्हा 'पुण्यभूषण' पुरस्काराने गौरविण्यात आले, त्यावेळी पुरस्कार म्हणून मिळालेल्या एक लाख रुपयांच्या रकमेमध्ये स्वत:ची भर घालून पन्नास लाखांची देणगी त्यांनी समितीला दिली. समितीचे अध्यक्ष म्हणून प्रतापरावांचे योगदान अनमोल आहे.
- प्रभाकर पाटील, कार्यकर्ता, विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे
कौशल्याधिष्ठित उद्योजकांची जडणघडण
‘तंत्रज्ञानाचा स्वामी’ या नात्याने उद्योग क्षेत्रात घेतलेली भरारी, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विपणन आणि तंत्रज्ञानावर आधारित उद्योगासाठीचे अर्थसाहाय्य या विषयात मिळवलेले विशेष प्रभुत्व आणि ‘सकाळ’ या वृत्तपत्र समूहाची केलेली उज्ज्वल प्रगती हे सारेच वंदनीय आहे. उद्योजक हा कौशल्यांचा अधिपती असावा लागतो. काळाशी सुसंगत राहून स्वतःला अद्ययावत ठेवावं लागतं. समुहाशी माणुसकीच्या सौहार्दाची वीण बांधून ठेवावी लागते. पवार सरांनी हे सारं स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात रुजवलं आणि फुलवलं. स्वतः यशस्वी उद्योजक झाल्यानंतर नवोदितांना संधी देऊन आणि मार्गदर्शन करून उद्योजक घडवले.
- शिवाजीराव गणगे, अध्यक्ष, मराठवाडा मित्र मंडळ, पुणे.
कम्युनिटी कॉलेजची मुहूर्तमेढ
श्री. प्रतापराव पवार यांच्यामुळे कोल्हापुरात ‘धातू तंत्र प्रबोधिनी’ची निर्मिती झाली. Community college या अमेरिकन धोरणातून अशा संस्था निर्माण झाल्या. धातू तंत्र प्रबोधिनी हे याचेच प्रतिक आहे. श्री. पवार साहेबांनी शिक्षणमंत्र्यांना पटवून मला अमेरिकेत अशा संस्थांमध्ये भेट वजा प्रशिक्षणाची संधी मिळवून दिली. यामुळे आमचे काम सोपे झाले. या माध्यमातून धातू अभियांत्रिकी तसेच ‘फौंड्री टेक्नॉलॉजी’चे विविध पदविका अभ्यासक्रम, तसेच कोल्हापुरातील ‘जेम्स अँड ज्वेलरी’ क्षेत्रासाठी धातू अभियांत्रिकी केंद्रित अभ्यासक्रम राबवण्यात आले. यामध्ये ‘कौशल्य विकास’ हा महत्त्वाचा गाभा असल्याने विद्यार्थ्यांना उद्योगधंद्यांमध्ये थेट प्रशिक्षण देणे, कौशल्य विकसित करण्यासाठी ऑन जॉब प्रशिक्षण यांचा समावेश आहे. २ – ४ वर्षे अनुभव असलेल्या कामगारांना केंद्रांतून शिकायची संधी मिळाली. यांतून शेकडो कामगार पदवीधर झाले. एरवी अशी संधी त्यांना आयुष्यात कधीही मिळाली नसती.
धातू तंत्र प्रबोधिनी हे कम्युनिटी कॉलेज भारतातील एक यशस्वी मॉडेल म्हणून राष्ट्रीय स्तरावर गणले गेले. २००६ मध्ये प्रतापरावांनी लावलेले छोटे रोपटे आता वृक्षासमान परिपक्व झाले आहे. त्यांनी याबाबतीत घातलेले लक्ष व शासन स्तरावर दिलेला आधार याचे महत्त्व अमूल्य असून त्यातून अनेकांची भविष्ये घडतील.
- शशांक मांडरे, प्र. विभाग प्रमुख, धातू अभियांत्रिकी, शासकीय तंत्रनिकेतन, कोल्हापूर
A Leader Who Gets Things Done
In 2007, Dr. Anil Sahasrabuddhe, then Director of COEP, approached me in Chicago with a request to foster innovation and entrepreneurship at COEP. Inspired, my friend Sanjay Inamdar and I began teaching entrepreneurship courses. Along with Dr. Nickhil Jakatdar and Mr. Atul Kirloskar, we each contributed to establish the Bhau Institute of Innovation, Entrepreneurship and Leadership.
It was during this time that I first met Mr. Prataprao Pawar. In our initial meeting, he quickly accepted our vision for the Bhau Institute and offered his full support. His involvement proved pivotal in two major instances. First, when our project approval from the Pune Municipal Corporation was delayed, Prataprao used his connections and persistent efforts to secure permission. Second, when there were reservations about setting up a Section 8 nonprofit company to manage the Bhau Institute, Prataprao personally convinced Dr. F. C. Kohli, then Chairman of the Board of Governor, COEP, sallowing us to move forward.
Today, the Bhau Institute has supported over 1,000 entrepreneurs and 300 startups, recognized as one of the top 75 such institutes by Department of Science and Technology (DST). As Mr. Prataprao Pawar celebrates his 80th birthday, we extend our heartfelt gratitude for his invaluable contributions in turning our vision into reality.
- Narendra Kale, Co-founder COEP, Bhau Institute of Innovation, entrepreneurship and leadership
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.