Prataprao Pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

...आणि विद्यार्थ्यांनी धरली उद्योजकतेची कास

सकाळ वृत्तपत्राशी नातं बालपणापासून जोडलं गेलं आणि प्रतापराव पवार सरांशी नातंही हळूहळू वृद्धिंगत होत गेलं.

सकाळ वृत्तसेवा

सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष, सामाजिक जाणिवांनी समृद्ध व्यक्तिमत्त्व प्रतापराव गोविंदराव पवार १५ ऑक्टोबरला वयाची ८० वर्षे पूर्ण करून ८१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. प्रतापराव पवार सुमारे सहा दशके महाराष्ट्रातील कित्येक सामाजिक संस्थांचे सक्रिय कार्यकर्ते, भक्कम पाठिराखे आणि सक्षम मार्गदर्शक राहिले आहेत. या संस्थांच्या माध्यमातून लाखो लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडला. प्रतापराव पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या संस्थांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केलेल्या भावना विशेष पुरवणीद्वारे मांडत आहोत.

आदर्श व्यक्तिमत्त्व

कोरोना काळात लॉकडाउन होता. त्यावेळी माजी विद्यार्थी मंडळातर्फे गरजूंना जेवण देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या दरम्यान पीजीपी सर आणि आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एकमेकांशी संवाद साधत होतो. पीजीपी सर मोलाचे मार्गदर्शन करीत. त्यावेळी त्यांना प्रत्यक्ष अनुभवले.

माझे शिक्षण विद्यार्थी साहाय्यक समितीमध्ये राहून झाले. समितीत असल्यापासून पीजीपी सरांना पाहात आलो आहे. समितीमधून बाहेर पडल्यानंतर माझ्यासारखे अनेक जण उद्योजक- व्यावसायिक झाले. सरांचा आदर्श घेऊन आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो, हा विचार करून आम्ही काम करत आहोत.

- गणेश काळे, अध्यक्ष, माजी विद्यार्थी मंडळ, विद्यार्थी साहाय्यक समिती.

निष्ठेचा आदर्श

माझी प्रतापराव पवार सरांशी पहिली भेट साधारणपणे ४५ वर्षांपूर्वी अजय मेटाकेम या कंपनीत झाली. गेल्या सहा वर्षांपासून विद्यार्थी साहाय्यक समितीमध्ये मी सक्रिय झाल्यापासून त्यांच्या कार्याची, नेतृत्वाची, आणि समर्पणाची जवळून ओळख झाली.

प्रतापराव पवार सरांच्या नेतृत्वाखाली समिती ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर तसेच रोजगाराच्या संधींवर भर देत असताना, उद्योजकतेसाठीही प्रोत्साहन देत आहे. त्यांच्या मातोश्री शारदाबाई गोविंदराव पवार यांच्या स्मृत्यर्थ समितीच्या उद्योजकता उपक्रमासाठी दिलेली ₹१.५ कोटीची देणगी हा त्याग आणि सामाजिक बांधिलकीचा ठळक नमुना आहे.

- डॉ. ज्योती गोगटे, विश्वस्त, विद्यार्थी साहाय्यक समिती

...आणि विद्यार्थ्यांनी धरली उद्योजकतेची कास

शिक्षण पूर्ण होऊन समितीतून बाहेर पडल्यावर मी थोड्याच कालावधीत कार्यकर्ता म्हणून समितीच्या कार्यात सक्रिय झालो. सुरुवातीला समितीच्या विद्यार्थी विकास केंद्राच्या उपक्रमात सहभाग घेतला. त्या अंतर्गत आम्ही निरनिराळ्या क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींना विद्यार्थ्यांशी संवादासाठी बोलावत असू. समितीचे अध्यक्ष आणि प्रतिथयश उद्योगपती म्हणून प्रतापराव पवार सरांनाही आम्ही निमंत्रित करत असू. समितीत ग्रामीण भागातील विद्यार्थी असल्याने प्रतापराव बऱ्याचदा आपला जीवनपट त्यांच्यापुढे उलगडत. प्राथमिक शिक्षणापासून बाजारहाटीपर्यंतच्या जबाबदाऱ्या, प्रतिकूलतेवर मात करत बिट्स पिलानीसारख्या संस्थेतून मिळवलेली अभियांत्रिकीची पदवी, शिक्षण पूर्ण झाल्यावर उद्योगच करायचा हा निश्चय आणि त्या दृष्टीने केलेले प्रयत्न, याची चर्चा विद्यार्थ्यांसमोर होत असे. मराठी मुलांनी व्यवसायाचा विचार करायला पाहिजे, तुम्ही नोकरी मागणारे होण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा, हा संदेश ते विद्यार्थ्यांना देत. त्यातूनच समितीच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी उद्योजकतेची कास पकडली.

समितीसारख्या समाजाच्या आर्थिक मदतीवर चालणाऱ्या संस्थेतील कर्मचाऱ्यांचे पगार तुटपुंजे असतात, परंतु संस्थेतील त्यांच्या योगदानाचा विचार करता काही वेळा स्वतःच्या खिशातून पैसे देऊन पवारसाहेबांनी त्यांना संस्थेशी जोडून ठेवले. त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते आपले मत कधीच इतरांवर लादत नाहीत. एखादा विषय गुणदोषांसह त्यांच्यासमोर मांडला तर ते मोकळेपणाने तो स्वीकारतात आणि आपले मतही बदलतात. प्रतापरावांच्या सकारात्मक विचारांतून इतरांना प्रेरित करणे, यांसारख्या गोष्टी आम्हा सर्वांना नेहमीच भावतात.

- तुकाराम गायकवाड, कायम विश्वस्त, विद्यार्थी साहाय्यक समिती,पुणे

एम्प्रेस गार्डनचे आधारस्तंभ

पुण्यातील ऐतिहासिक आणि सुप्रसिद्ध बागेचे व्यवस्थापन हे ॲग्री हॉर्टीकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेमार्फत केले जाते. सन २०२० मध्ये संस्थेचे अध्यक्ष श्री राहुल बजाज यांचे निधन झाले. त्यानंतर श्री प्रतापराव पवार यांची संस्थेचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या एम्प्रेस गार्डनची देखभाल केली जात असून उत्तरोत्तर एम्प्रेस गार्डनची प्रगतीच होत आहे.

संस्थेच्या प्रत्येक कार्यात श्री. प्रतापराव पवार यांचा सहभाग असतो. तसेच संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक उपक्रमावर त्यांचे बारीक लक्ष असते. आज एम्प्रेस गार्डन स्वतःच्या पायावर उभी आहे, याचे श्रेय अध्यक्ष म्हणून कार्यरत असणारे प्रतापराव पवार आणि सध्याचे संचालक मंडळ यांना आहे.

- सुरेश पिंगळे, मानद सचिव, एम्प्रेस गार्डन, पुणे

धीरोदात्त समाजव्रती

सकाळ वृत्तपत्राशी नातं बालपणापासून जोडलं गेलं आणि प्रतापराव पवार सरांशी नातंही हळूहळू वृद्धिंगत होत गेलं. त्यांच्या कार्याचा विस्तार, त्यातलं व्यवस्थापन, शिस्तप्रियता, दूरदृष्टी, निर्णय घेण्याची क्षमता या गुणांचा जवळून परिचय होत गेला. ते उद्योजक तर आहेतच, पण अधिकतम समाजवसा सांभाळणारे धीरोदात्त समाजव्रती आहेत. समाजातील अलक्षित घटकांना लक्षित करून त्यांच्या प्रगतीचा सातत्यानं करत असलेला विचार आणि त्याला दिलेली कृतिशीलतेची जोड निश्चितच अधोरेखित करावीशी वाटते. हा साकव अनेक पिढ्यांना भविष्यात प्रगतिपथावर नेईल, यात शंका नाही. मराठवाडा मित्र मंडळ, पुणेच्या माध्यमातून आपला स्नेह अधिक दृढ झाला, याचे मनोमन समाधान वाटते.

- किशोर मुंगळे, सरचिटणीस, मराठवाडा मित्र मंडळ, पुणे

सुसंस्कारित पिढीसाठी

मा. प्रतापराव पवार सरांच्या संकल्पनेतून शिक्षकांसाठीची प्रशिक्षण कार्यशाळा झाली. विद्यार्थ्यामध्ये चांगली मूल्ये रुजवली पाहिजेत हा कार्यशाळेचा उद्देश होता. विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजण्यासाठी शिक्षकांची खूप महत्त्वाची भूमिका आहे. या कार्यशाळेचा सकारात्मक प्रभाव विद्यालयातील शिक्षकांवर, त्यांच्या अध्यापन पद्धतीवर व विद्यार्थ्यांच्या अध्ययन करण्याच्या क्षमतेवरही दिसून आला.

नेदरलँडला एज्युकॉनच्या शैक्षणिक दौऱ्यात सहभागी होण्याची संधी प्रतापराव सरांमुळे मिळाली. प्रतापराव सरांची दूरदृष्टी आणि पुढाकार यातून शिक्षणतज्ज्ञांना मिळालेल्या या अनुभवाची गोड फळे भविष्यात नक्कीच चाखायला मिळतील.

- सौ. जॉयसी जोसेफ, प्राचार्या, विद्या प्रतिष्ठान न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, विद्यानगरी, बारामती

एसटीचालकाच्या भूमिकेतून संस्थांचे काम

सन १९९३ च्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थी साहाय्यक समितीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी मा. प्रतापराव पवार सर समितीमध्ये आले होते. मी माजी विद्यार्थी म्हणून त्यावेळी उपस्थित होतो. त्यांचे मनोगत झाल्यावर प्रश्नोत्तरांचे सत्र सुरू असताना मी त्यांना विचारले, ‘सर, समिती आणि ‘सकाळ’ या दोन मोठ्या जबाबदाऱ्या आपण सांभाळत आहात. हे करत असताना ओढाताण होत नाही का? आणि याबाबत तुमचा अनुभव काय आहे?’

त्यावेळी सरांनी दिलेले उत्तर आजही माझ्या लक्षात आहे. ते म्हणाले, ‘कोणतीही संस्था चालवत असताना संस्थाचालकाचा रोल हा एसटीच्या ड्रायव्हरसारखा असतो. बसमधले प्रवासी म्हणजे संस्थेतले लाभार्थी/ कर्मचारी, आणि संस्थेच्या बाहेरचे लोक/ समाज हे दोन्ही सुरक्षित राहतील, असे बघावे लागते. बस एका जागी बंद पडून चालत नाही. अपघात होऊनही चालत नाही. बसचा अपघात झाला तर प्रवाशांना इजा होते किंवा समाजालाही इजा होऊ शकते. संस्थेचे काम तसेच व्यवस्थित करणे गरजेचे असते. चांगला दृष्टिकोन ठेवला तर ते व्यवस्थित होऊ शकते.’

माझ्या साध्या प्रश्नालाही सरांनी समर्पक असे उत्तर दिले. हे ऐकून मी समाधानी तर झालोच, पण वेगळा विचारही करायला शिकलो.

सरांना पुढील निरामय आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.

- नंदकुमार तळेकर, विश्वस्त, विद्यार्थी साहाय्यक समिती

कात्रीची अनमोल भेट

मी मदत करू शकलो, तर मला काही समाधान मिळते," असे म्हणणार्‍या प्रतापराव पवार सरांनी मी करत असलेले जट निर्मूलनाचे काम अधिक सफाईदार व्हावे म्हणून यूकेहून आणलेली कात्री मला भेट दिली. माझ्यासाठी ही भेट अनमोल ठेवाच आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मला कोरोना झाला तेव्हा पवारसरांनी तत्परतेने हॉस्पिटलमध्ये जागा मिळवून दिली. वेळीच उपचार झाल्यामुळे मी कोरोनाशी यशस्वी सामना करू शकले. त्यांना आरोग्यसंपन्न उदंड आयुष्य लाभो, हीच सदिच्छा!

- नंदिनी जाधव, कार्यकर्ती, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती.

व्यक्तिगत जिव्हाळा

अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र या ट्रस्टचे ते स्थापनेपासूनचे अध्यक्ष आहेत. 'जबाबदारी घेणे' आणि 'पाठबळ देणे' याच्या त्यांच्या काही पद्धती मला जाणवल्या. त्या अशा...  दैनंदिन कामात ते अजिबात हस्तक्षेप करत नाहीत, परंतु मदत मागितली तर ती देण्यास तत्पर असतात. फोनवर बोलण्यासाठी ते नेहमी उपलब्ध असतात. सल्ला मागितला तर मोघम बोलून सल्ला देणे टाळत नाहीत. वादविवादाचे प्रसंग आल्यास ते सर्वांची मते जाणून घेतात. एक जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांनी सोबत असणे, हे त्यांच्या दातृत्वाइतकेच मोलाचे आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे मला जाणवलेले आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्याबरोबरच्या भेटीत बहुतांशरित्या कामाचेच बोलणे होते, तरी देखील वैयक्तिक जिव्हाळ्याची भावना ते तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतात..!

- मुक्ता दाभोलकर, कार्यकर्ती, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

असंख्यांचे सुहृद

पद्मश्री प्रतापराव पवार सरांचा कृतज्ञता सोहळा  साजरा करताना विद्यार्थी साहाय्यक समिती परिवाराला मनापासून  आनंद  होतो आहे. सरांचे कर्तृत्व, नेतृत्व  आणि दातृत्व सुपरिचित  आहेच, पण समाजातील  एक सुहृद  व्यक्तिमत्त्व  म्हणून त्यांचा परिचय  करून  द्यावासा वाटतो. सरांच्या  विचारांतील सर्व समावेशकता, त्यांच्या मनामध्ये असलेला  सगळ्यांसाठीचा सुहृद- मैत्र भाव आम्हाला फार मोलाचा वाटतो. सरांनी  परिश्रमपूर्वक, सचोटीने जी संपदा मिळवली आहे, ती ज्यांना खरी गरज  आहे, त्यांना यथायोग्य  देणे हे त्यांचे दातृत्व..! त्यामुळेच  आपण असंख्यांचे  सुहृद  आहात. हा मित्र  भाव समिती परिवाराला सतत लाभतो आहे, हे आमचे सद्भाग्य  आहे.

- सुप्रिया केळवकर, कार्यकर्ता, विद्यार्थी साहाय्यक  समिती.

Asset to society

It is my privilege and honour to express my thoughts about Prataprao Pawar on the occasion of the function to recognize Prataprao's yeoman's contribution to the society. Being someone based in Pune for the last many years, I had been impressed by his work done at MCCIA.

But once I got involved with Vidyarthi Sahayyak Samiti, I got to know Mr. Pawar much more closely.  What I got to experience is his passion for entrepreneurship, his belief in the power of science and technology to solve problems for the masses and his ability to leverage his network to help the NGOs that he is associated with. All very commendable and noteworthy attributes. When you couple these with his generosity, Prataprao becomes an invaluable asset to any social organization.  I wish Prataprao a very healthy future journey.

- Dr. Makarand Phadake, Trustee, Vidyarthi Sahayyak Samaiti.

सहवासातून अनुभवसंपन्नता

मा. प्रतापराव पवार सरांचा परिचय समितीचा विद्यार्थी असल्यापासून आहे. विद्यार्थी, माजी विद्यार्थी, कार्यकर्ता, विश्वस्त व कार्यकारी विश्वस्त या सर्व भूमिका बजावताना त्यांना अनुभवतो आहे, या प्रत्येक भूमिकेत त्यांच्याकडून मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. विशेषतः विश्वस्त व नंतर कार्यकारी विश्वस्त म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांना जवळून अनुभवता आले. त्यांच्यातील अनेक गुणांमुळे ते माणूस म्हणून किती ग्रेट आहेत, याची जाणीव झाली.

विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा सतत ध्यास, प्रचंड वक्तशीरपणा, गोष्टी योग्य पद्धतीने समजून घेऊन सर्वंकष मार्गाने प्रश्न सोडवण्याचे त्यांचे कसब, सर्वांना समजावून घेऊन विशिष्ट पद्धतीने योग्य निर्णयापर्यंत पोहोचण्याचे त्यांचे प्रयत्न, भावनिक पण तितकेच काही प्रसंगी कठोर निर्णय घेण्याची क्षमता, योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन घेण्याचा नेहमी अट्टहास, आईच्या शिकवणीबद्दल विशेष आदर व त्यानुसार जीवन मार्गक्रमण, शंतनुराव किर्लोस्कर यांचा त्यांच्या जीवनावरील प्रभाव अशा अनेक गोष्टी पाहता, अनुभवता आल्या. विविध क्षेत्रांतील लोक जोडून घेणे, आत्मीयतेने मनातील गोष्टी सांगणे, दुसऱ्यांचे मत जाणून घेणे व नंतर योग्य ते निर्णय देणे,  त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे, यासाठी प्रार्थना.

- तुषार रंजनकर, कार्यकारी विश्वस्त, विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे

चांगल्या कामाला खंबीर साथ

मी विद्यार्थी साहाय्यक समितीमध्ये सन २००३- ०४ पासून कार्यकर्ता म्हणून येण्यास सुरुवात केली.

कोणत्याही चांगल्या कामासाठी खंबीरपणे उभे राहणे, ही प्रतापरावांची वृत्ती आहे. त्याचा मला कायम प्रत्यय येत गेला. सर्व कार्यकर्त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून मग योग्य तो निर्णय घेणे, ही त्यांची खासियत आहे. काही अंशी समितीच्या कामामध्ये त्यांचा सहभाग निर्मलाताई पुरंदरे कार्यकारी विश्वस्त झाल्यानंतर वाढला, असे मला वाटते. मीटिंगला येताना कायम छोटी डायरी व पेन्सिल बरोबर असणारच. मीटिंग ठरवताना त्यात नोंद होणार आणि कधीही वेळेच्या आधी पंधरा- वीस मिनिटे साहेब हजर असणारच, हा माझा गेल्या वीस वर्षांचा अनुभव आहे. माझी चिकित्सक वृत्ती आहे. त्यातून काही सूचना केल्या तर त्यांनी त्यांचा कायम योग्य तो आदर केला. समितीची वाटचाल कोणत्याही दबावाला बळी न पडता चालू आहे, याचे सर्व श्रेय प्रतापराव यांच्यासारखे नेतृत्व समितीला लाभले, यामध्ये आहे, असे मला वाटते.

- रवींद्र नामजोशी, कार्यकर्ता, माजी विश्वस्त, विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे

समितीचे कवचकुंडल

आदरणीय प्रतापराव पवार हे विद्यार्थी साहाय्यक समितीचे कवचकुंडलच आहेत. ज्या ज्या वेळी समितीला काही  प्रश्न पडलेत, त्या त्या वेळी त्यांचे कृतिकेंद्रित मार्गदर्शन पथदर्शी ठरले आहे.

प्रतापरावांनी दिलेला सल्ला केवळ समितीलाच लाभदायक ठरतो, असे नाही, तर इतर अनेक सेवाभावी संस्थांना उपयुक्त ठरतो, त्यांच्या अशाच एका मौलिक सल्ल्यामुळे वस्तू व सेवाकराच्या जोखडातून मुक्तता झाली आहे. हजारो सेवाभावी संस्थांचीदेखील या कराच्या  जोखमीतून मुक्तता झाली आहे. प्रतापराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली समितीची जी चौफेर प्रगती चालू आहे, त्याला तोड नाही.

- सीए डॉ. दिलीप सातभाई, वस्तू व सेवाकर सल्लागार, विद्यार्थी साहाय्यक समिती 

Leading from the front

As a student of Management, I am amazed at PGP sir's hands on engagement with ALL his associations - professional or social. The secret, I think lies in the fact that he quickly assesses the impact of a potential situation. He seeks a professional/ technical assistance, if required at this stage. Once he has taken a view, he fully empowers and provides all freedom to the respective functionary, monitoring the progress periodically. This attribute is the essence of his style of management that delivers a uncommon width and depth to all his activities that he has been associated for last 4- 5 decades. He is extremely punctual and will seldom revise his commitment ONCE he has entered it in his small pocket diary. He certainly leads from the front by example. Samiti is fortunate to have him as the leader and mentor for last five decades providing a rare vision and continuum for Samiti work.

- Sanjay Amrite, Trustee & Treasurer- Vidyarthi Sahayyak Samiti, Pune

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Parkash Ambedkar : सत्तेत सहभागी होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका, ते म्हणाले...

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यांनी घेतला शहरी वृक्ष व्यवस्थापन कार्यशाळेत भाग

SCROLL FOR NEXT