एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंडखोरी केल्यामुळं राज्यातलं राजकीय समीकरण पूर्णपणे बदलून गेलं आहे.
सातारा : एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनेत बंडखोरी केल्यामुळं राज्यातलं राजकीय समीकरण पूर्णपणे बदलून गेलंय. मविआचं सरकार कोसळून आता शिंदे-फडणवीस यांचं सरकार स्थापन झालंय, त्यामुळं राज्यात पुन्हा एकदा भाजप सत्तेवर आलं आहे. यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी 2014 चा दाखला देत राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय.
2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी (Maharashtra Assembly Election 2014) राष्ट्रवादी काँग्रेसनं (NCP) आघाडी सरकारचा पाठिंबा काढला आणि महाराष्ट्रातील भाजप सत्तेत येण्यास मदत झाली. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमुळंच फडणवीसांची सत्ता आली, असं विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय. ते कराड इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 2014 मध्ये राज्यात आघाडीचं सरकारचं काम चांगलं होतं. मात्र, तेव्हा राष्ट्रवादीनं अचानकपणे सरकारचा पाठिंबा काढला. त्यावेळी राष्ट्रवादीनं जर हे सरकार पाडलं नसतं, तर पुन्हा आघाडीचंच सरकार सत्तेत आलं असतं. मात्र, तसं झालं नाही आणि याचा भाजपला (BJP) फायदा झाला. त्यामुळं राज्यात फडणवीसांचं सरकार (Fadnavis Government) सत्तेत यायला कोण कारणीभूत आहे, हे सगळ्यांना समजलं, असं म्हणत चव्हाणांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला.
यावेळी चव्हाणांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवरही भाष्य केलं. भारत जोडो यात्रा म्हणजे ‘मोदी हटाव यात्रा’ आहे. जोपर्यंत मोदी पंतप्रधानपदावर आहेत तोपर्यंत देशात दूषित वातावरण राहणार आहे, त्यामुळं बदलाची गरज आहे. काँग्रेसला आगामी निवडणुका जिंकाव्याच लागतील, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) चांगलं काम करतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
राज्यातून वेदांता-फॉक्सकाॅनपाठोपाठ आता टाटा समूहाचा एअरबस प्रकल्प गुजरातला गेला आहे. यावरही चव्हाण यांनी भाष्य केलंय. गेल्या अनेक वर्षात राज्यात मोठा प्रकल्प नाही. हे दुर्दैव आहे. एअरबसबाबत प्रकल्प गुजरातला जाणार हे स्पष्ट झालं आहे. आतापर्यंत कोणत्याच पंतप्रधान यांनी आपलं राज्य, आपलं शहर असा दुराग्रह केला नाही. कारण ते देशाचे पंतप्रधान असतात. पण, आता मोदी जे करत आहेत. ते दुर्भाग्यपूर्ण आहे, अशी त्यांनी नाराजी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.