Gujarat rains 
महाराष्ट्र बातम्या

Rain Update : रेड अलर्ट ते पर्यटनस्थळ व शाळा बंद; अतिवृष्टीचा इशारा

पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्यभर पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांच्या आणि धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. दरम्यान, पालघर, पुणे शहर, गडचिरोली या ठिकाणी पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये ‘एनडीआरएफ’च्या १३ आणि ‘एसडीआरएफ’ची दोन पथके तैनात आहेत. तसेच गेल्या १२ दिवसांत अतिवृष्टीमुळे राज्यात ८४ नागरिकांचा तर १८० जनावरांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे गुजरातची बिकटच परिस्थिती झाली आहे. गेल्या चोवीस तासांत गुजरातमध्ये पुरामुळे ६ जणांचा मृत्यू झालाय. (Rain LIVE Updates Maharashtra Gujarat Floods red alert)

गुजरातमधील नवसारीत गुरुवारी शाळा, महाविद्यालये राहणार बंद

गुजरातमधील पाऊस आणि पूरसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नवसारीत गुरुवारी सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत.

प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई

भारतीय हवामान खात्याने (IMD) अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांवर कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. प्रशासन १४ ते १७ जुलै या कालावधीत या स्पॉट्सच्या एक किमीच्या परिघात प्रवेश करण्यास मनाई केली आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाणार असल्याचे म्हटले आहे.

कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ देण्याच आवाहन

पुण्यात उद्यापासून दोन दिवस अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे पुणे पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. पुणे महानगरपालिकेने शहरातील सर्वच खाजगी कंपनी आणि आयटी कंपन्यांना कर्मचारी वर्गाला ‘वर्क फ्रॉम होम’ देण्याच आवाहन केले आहे. हवामान विभागाने गुरुवारी आणि शुक्रवारी पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने हे आवाहन करीत असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने सांगितले आहे.

पेंच नदी वाहतेय ओसंडून

पारशिवनी (जि. नागपूर) : पेंच धरणाच्या कमांड एरियात चांगला पाऊस होत असल्याने पेंच पाटबंधारे विभागाने पेंच धरणाचे सर्व १६ दरवाजे बुधवारी उघडले. सध्या पेंच नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बुधवारी सकाळी पेंच धरण १०० टक्के भरले. त्यामुळे पेंच धरणाचे १६ दरवाजे बुधवारी सकाळी ७ वाजतापासून उघडणे सुरू केले. सकाळी ७ ते ८.३० वाजेपर्यत संपूर्ण १६ दरवाजे ३० सेंमीने उघडण्यात आले. दुपारी हेच दरवाजे ५० सेंमीने उघडले. यामुळे पेंच नदी ओसंडून वाहत आहे.

अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि खाजगी आस्थापना व कार्यालये १६ जुलैपर्यंत बंद राहतील. मात्र, सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.

पावसामुळे किल्ले सिंहगड पुढील काही दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. कारण, सिंहगड तीन दिवस बंद ठेवण्याची मागणी वन विभागाकडून करण्यात आली आहे. पुण्यात सुरू असलेल्या पावसाचा अंदाज आणि पायथ्यापासून सिंहगडाकडे जाणाऱ्या ९ किमीच्या मार्गावर दरड कोसळण्याच्या शक्यतेमुळे पुणे वनविभागाने जिल्हा प्रशासनाला पत्र लिहून सिंहगड किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना १६ जुलैपर्यंत बंदी घालण्याची विनंती करण्यात आली आहे.

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सिंहगड किल्ल्याला भेट देण्यास तात्पुरती बंदी आवश्यक आहे, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पुढील तीन दिवस पुणे जिल्ह्यासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे. आता जिल्हाधिकारी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुणे जिल्ह्यात येत्या ४८ तासात अतिवृष्टीची शक्यता; दोन दिवस रेड अलर्ट जारी

पुणे जिल्ह्यात येत्या ४८ तासात अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शहरात देखील हवामान विभागाकडून पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात असणाऱ्या घाट परिसरात देखील पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाचे अधिकारी अनुपम कश्यपी यांनी दिली आहे. पुण्यासोबतच पश्चिम महााष्ट्रातील इतर जिल्ह्यात देखील अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे.

पुण्यातील शाळांना उद्या सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. पावसामुळे सुट्टी जाहीर करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे.

कोयना धरण

कोयना धरण पायथा विद्युत गृहातून सायंकाळी 5.00 वा. 1050 क्युसेक विसर्ग कोयना नदीमध्ये सोडण्यात येणार आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

मुसळधार पावसाचा इशारा

पुढील ४८ तासात महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा हवामानाचा खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई, कोकण, पुणे, नाशिकच्या काही भागात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे.

पिंपरी चिंचवड: तीन वाजण्याच्या सुमारास मोरया गोसावी मंदिरात चोहो बाजूने पाणी शिरून मंदिर पाण्यात गेले आहे.

नांदेड : जिल्‍ह्यात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. मुसळधार पावसामुळे किनवट तालुक्यातील पैनगंगा नदीला पूर आला आहे. पुरक्षेत्रातील 200 कुटूंबाचे स्थलांतर करण्यात आले आहे.

आतापर्यंत झालेला पाऊस आणि पुढील ४८ तासांचा पावसाचा अंदाज लक्षात घेता पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यांसाठी सतर्क हवामान सूचना तर्फे दरडींचा अलर्ट देण्यात येत आहे.

पुढील तीन दिवस शक्यतो घाट रस्त्यांवरून प्रवास टाळावा.

◆ दरड प्रवण टेकड्यांवर, दरड प्रवण क्षेत्रातील डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या नागरिकांनी तात्पुरता सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा.

◆ धोकादायक इमारती, कच्च्या घरांमध्ये राहत असलेल्या नागरिकांनी पाऊस ओसरेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा.

◆ आपल्या भागातील डोंगरांवरून झाडे पडली, दगड, माती घसरून आली, झऱ्यांमधून गढूळ पाणी येऊ लागले तर तात्काळ प्रशासनाला आणि सतर्क ला कळवावे. या घटना आगामी मोठ्या दरडींचे संकेत असू शकतात.

स्थानिक पातळीवरील सूचनांसाठी सतर्कचे इशारे वेळोवेळी अपडेट करण्यात येतील. सतर्कचे फेसबुक पेज आणि ट्विटर फॉलो करावे.

सोलापूर : जिल्ह्यात आतापर्यंत 173 मिलिमीटर पाऊस

सोलापूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सर्वदूर पाऊस दिसतोय. प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत 173 मिलिमीटर इतका पाऊस झालाय. सरासरी 142 मिलिमीटर इतकी असताना अधिकचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

महाबळेश्वरातील Wilson Point वरील ऐतिहासिक बुरुज ढासळला

महाराष्ट्राचे नंदनवन समजले जाणारे ठिकाण म्हणजे, महाबळेश्वर-पाचगणीचा निसर्गरम्य परिसर होय. महाबळेश्वर शहर व परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. येथील महत्वाच्या व उंच असलेल्या विल्सन पॉईंटवरील तीन बुरुजापैकी एक बुरुज ढासळला आहे.

गडचिरोली : धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग

गडचिरोली जिल्ह्यातील दोन धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरुय. मेड्डीगट्टा लक्ष्मी ८५ दरवाजे, तर चिचोराह धरणाचे ३८ दरवाजे पूर्णपणे उघडले आहेत. जिल्ह्यातील प्राणहिता व गोदावरी नदीत धोका पातळीच्या वर आहे.

पुण्यातील सर्व शाळा उद्या बंद राहणार

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहराला पावसानं चांगलंच झोडपलंय. त्यामुळं पुण्यातील सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय आज पुणे महापालिकेकडून घेण्यात आला. पुणे पाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये देखील सर्व शाळा उद्या बंद राहणार आहेत.

पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करणार; खासदार धानोरकरांची ग्वाही

चंद्रपूर शहरातील रहमतनगर भागात इरई नदीचे पाणी शिरल्याने गंभीर स्थिती निर्माण झालीय. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी खासदार बाळू धानोरकर यांनी पूरग्रस्त भागात भेट देऊन प्रशासनाला तातडीनं मदतीच्या सूचना केल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी झालेल्या भागाचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेत - देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी झालेल्या भागाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच एनडीआरएफलाही सूचना देण्यात आल्यात आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्र : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु असून गेल्या 24 तासांत 5 जणांचा मृत्यू झाला आहे, तर मृतांची संख्या 89 वर पोहोचली आहे.

Nagpur : नवेगाव खैरी धरणाचे 16 दरवाजे उघडले

नवेगाव खैरी धरणाचे 16 दरवाजे उघडण्यात आले आहेत. नवेगाव खैरी धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने धरण पूर्णपणे भरलं आहे. या धरणातून नागपूर शहराला पाणी पुरवठा करण्यात येतो.

सिंहगड बंद करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला पत्र

पावसाचा अंदाज आणि पायथ्यापासून सिंहगडाकडं जाणाऱ्या 9 किमीच्या मार्गाला खडक कोसळण्याच्या भीतीनं पुणे वनविभागानं जिल्हा प्रशासनाला पत्र लिहून सिंहगड किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना 16 जुलैपर्यंत बंदी घालण्याची विनंती केलीय.

पुण्यात पावसाचं पाणी थेट पोलीस स्टेशनमध्ये घुसलं

पुण्यात सकाळपासून पावसाचा जोर अधिक वाढला आहे. पुण्यातील चंदन नगर पोलीस स्टेशनमध्ये पावसाचं पाणी घुसलं असून शहरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे.

कात्रज जुना बोगद्याजवळ दरड कोसळली

कात्रज जुना बोगद्याजवळ दरड कोसळली असून रस्त्यावर दगडं पडली असून महापालिकेचे पथक रवाना झाले आहेत.

लोणावळ्यात पाचनंतर पर्यटनाला बंदी घातली

लोणावळ्यात सायंकाळी पाच नंतर प्रशासनानं पर्यटनाला बंदी घातली आहे. लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे, परिणामी, भुशी धरणाने रौद्र रूप धारण केलंय.

नेरळ-कळंब मार्ग : दहिवलीतील उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली, 30 गाव वाड्यांचा संपर्क तुटला

Raigad Rain : नेरळ-कळंब मार्गावरील दहिवली येथील उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली गेला असून 30 गावांचा संपर्क तुटला आहे. सध्या वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आलीय.

नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र, पूर परिस्थिती कायम आहे. गंगापूर धरणातून 10 हजार क्युसेक, दारणा धरणातून 8 हजार 846 क्युसेक तर पालखेड धरणातून 9 हजार 436 क्युसेक पर्यंत कमी करण्यात आला आहे.

Nashik Rain : गेल्या पाच दिवसांपासून त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) इगतपुरी (Igatpuri) आणि दिंडोरी तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने दारणा, गंगापूर (Gangapur) आणि पालखेड धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग करण्यात येत आहे आणि याचमुळे निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर (NandurMadhyameshwer) धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. या पार्श्वभूमीवर नांदूरमध्यमेश्वर धरणातून सुमारे 80 हजार क्युसेकने उच्चांकी विसर्ग करण्यात येत आहे.

देवळी : शेतकऱ्यांना पुराचा मोठा फटका

वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात गेल्या दहा वर्षात कधी नव्हे तेवढा पाऊस झाला असल्याचं नागरिक सांगत आहेत. या पावसामुळं यशोदा नदीला पूर आला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पुरात पिकांचंही मोठं नुकसान झालंय.

नांदेड : गोदावरी, पैनगंगा, मांजरा, मन्याड, सीता या नद्यांना पूर

Nanded Rain Updates : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं नांदेड जिल्ह्यातील गोदावरी, पैनगंगा, मांजरा, मन्याड, सीता या नद्यांना पूर आलाय. नांदेडसह मुदखेड, उमरी, हदगाव, हिमायतनगर अर्धापूर, मुखेड या गावांमध्ये पावसाचं पाणी नागरी वस्तीत घुसलं आहे.

कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ

Kolhapur Rain Updates : कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होतं आहे. पंचगंगेची पातळी सध्या 35 फूट 3 इंचावर पोहोचलीय. कोल्हापूर शहर आणि परिसरात पावसाची संततधार सुरु आहे. कोल्हापुरातील 54 बंधारे पाण्याखाली गेलेत.

चिंचोली नाला : पुराच्या पाण्यात अडकलेल्या 35 प्रवाशांची सुटका

चंद्रपूर : चिंचोली नाला येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या बसमधील 35 प्रवाशांची सुटका केली आहे. विरुर पोलीस ठाण्यातील पथकाची ही धाडसी कामगिरी आहे. ही बस राजुरा तालुक्यातील चिंचोली मार्गे हैदराबादला जात होती. खासगी ट्रॅव्हल्स बस चालकानं पुढं मार्ग बंद आहे हे सांगितल्यावरही बस पुढं नेली. सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास पुराच्या पाण्यात बस बंद पडली. माहिती मिळताच विरूर पोलीस ठाण्याच्या पथकानं सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वात अंधारातच हे बचाव अभियान केलं होतं.

गोसीखुर्द धरणाचे सगळे दरवाजे उघडले

आठव्या दिवशी गोसीखुर्द धरणाचे संपूर्ण 33 पैकी 33 दरवाजे उघडले गेले असून 28 दरवाजे अर्ध्या मीटर ने तर 5 दरवाजे 1 मीटर ने उघडले गेले आहेत. संपूर्ण 33 दरवाजातून 4286.7 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरुय.

मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं

मध्य रेल्वेची वाहतूक पंधरा ते वीस मिनिटं उशिराने सुरु आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईच्या मध्य उपनगरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबई लोकलचा वेग मंदावला आहे.

चंद्रपूर : रहमतनगर भागात इरई नदीचे पाणी शिरायला सुरुवात

चंद्रपूर शहरातल्या रहमत नगर भागात इरई नदीचे पाणी शिरायला सुरुवात झालीय. जवळपास 60 ते 70 घरात नदीचे पाणी शिरले असून लोकांनी सुरक्षित स्थळी आश्रय घेतलाय. इरई धरणाचे सर्व म्हणजे 7 दारे 1 मीटरने उघडल्याने इरई नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. नदीचे पाणी सातत्याने वाढत राहिल्यास चंद्रपूर शहरातल्या आणखी काही भागात पाणी शिरण्याची शक्यता आहे.

Rain Update

पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात

पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून सर्व तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसायला लागला आहे. तर अनेक ठिकाणचे रस्ते बंद होण्याची शक्यता निर्माण झालीय.

एकाच कुटुंबातील चौघे दरडीत फसले

Vasai Landslide : वसईमध्ये घरावर दरड कोसळली असून या मध्ये एकाच कुटुंबातील चौघेजण फसले. त्यातील दोघा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून दोन जण आत फसले असल्याची माहिती मिळालीय.

Satara Rain Live Update

मुसळधार पावसाने मुंबईचा वेग मंदावला!

Mumbai Rains Live Update : मुंबईत सकाळपासून सुरू असलेला मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झालीय. पश्चिम द्रुतगती महामार्गावर बोरीवली ते वांद्रे आणि अंधेरीते बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, विलेपार्ले,आणि सांताक्रुज दरम्यान मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. वाहतूक कोंडीमुळे वाहनं संथगतीने जाताना दिसत आहेत. मुंबईत मुसळधार पावसाने मुंबईचा वेग मंदावलाय.

पावसामुळे गुजरातची बिकटच परिस्थिती झाली आहे. गेल्या चोवीस तासात गुजरातमध्ये पुरामुळे ६ जणांचा मृत्यू झाला आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर राज्यात आतापर्यंत ६९ जण मृत्युमुखी पडले आहेत. नवसारी, डांग, अहमदाबाद, तापी, नर्मदा यासारख्या जिल्ह्यात पुराची (Flood Situation In Gujrat) स्थिती चिंताजनक बनली आहे. नवसारीहून सुरतला जोडणारा राज्य महामार्ग हा पुरामुळे बंद केला आहे. अहमदाबादच्या गल्लोगल्ली पाणी साचले आहे. प्रमुख मार्गालगत उभ्या असलेल्या मोटारी पाण्याखाली गेल्या आहेत. अनेक रुग्णालयात गुडघाभर पाणी साचले आहे तर अनेक सोसायटीतील पार्किंगला तळ्याचे स्वरूप आले आहे.

पुणे शहरासाठी पुढील दोन दिवस रेड अलर्ट

मागील तीन ते चार दिवसांपासून पुणे शहर आणि धरण क्षेत्राच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे खडकवासला धरणात क्षमतेच्या 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. आणखी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन मध्यरात्रीपासून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सुरुवातीला सुमारे 1000 क्युसेक पाणी सोडण्यात येत होते

पालघरमध्ये दोन दिवस अतिवृष्टी, रेड अलर्ट जारी

भारतीय हवामान विभाग (IMD) आणि प्रादेशिक हवामान विभाग, मुंबईकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार दिनांक 12 आणि 14 जुलै दरम्यान पालघर जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार (अतिवृष्टी ) पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

वसईच्या वागरोळ पाड्यात दरड कोसळली. एनडीआरएफ, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे. आतापर्यंत दोघांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं आहे. ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

कर्नाटकातील अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. अलमट्टी धरणातून 1 लाख क्युसेकनं विसर्ग सुरु करण्यात आला. त्यामुळे कोल्हापूर, सांगली पूरस्थिती नियंत्रण होण्यात मदत होणार आहे.

मुंबईला 'ऑरेंज अलर्ट'

मुंबईसह उपनगरांत पावसानं दमदार हजेरी लावली आहे. दक्षिण मुंबईत मुसधळार पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच, अनेक सखल भागांत पाणी साचण्यासही सुरुवात झाली आहे. पाणी साचत असलेल्या भागात वाहतूक संथ गतीनं सुरु आहे. माहीम, दादर, परळ, भायखळा भागांत जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईला पुढील दोन दिवस हवामान विभागाकडून पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

पालघर-मुंबई-अहमदाबाद हायवेवर दरड कोसळली. एकेरी वाहतूक सुरु

मुसळधार पावसामुळे मुंबईत पाणी साचले आहे. दादर पूर्वेकडील दृश्ये

उत्तराखंड: चमोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी दरड कोसळल्याने बद्रीनाथ महामार्ग बंद करण्यात आला आहे.

आज दुपारी 1 वाजेपर्यंत मुंबई, कल्याण, ठाणे आणि नवी मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) ने म्हटले आहे.

पुण्यात मुसळधार पाऊस सुरू, 14 जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT