सध्या भोंगा आणि हनुमान चालीसा पठणावरून राज्याचे राजकीय वातावरण तापलं आहे. यासाठी मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे पक्षबांधणीसाठी मनसेने कंबर कसली असल्याचे चित्र आहे. दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुकारलेल्या अयोध्या दौऱ्यासाठी पक्षाने आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. अयोध्या दौऱ्यादरम्यान शरयूकाठी राज ठाकरे यांच्या हस्ते महाआरती करण्यात येणार आहे. त्यावेळी शरयूकाठी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यासाठी मुंबईतील प्रत्येक विभाग अध्यक्षांना रेल्वेची एक बोगी भरण्याचे लक्ष्य देण्यात आल्याचे कळते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतेच पाच जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे जाहीर केले. त्यांनंतर दौऱ्यातील नियोजनासाठी पक्षातील नेते मंडळीची बैठक राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यानंतर बुधवारी या दौऱ्याच्या नियोजनासाठी पक्षाची विशेष बैठक पक्षाच्या मुख्यालयात राजगड येथे पार पडली. या बैठकीत विभाग अध्यक्षांना आदेश देण्यात आले आहेत. या बैठकीला मनसेचे अनेक बडे नेते उपस्थित असून मुंबईतील जवळपास ३६ विभाग अध्यक्ष या बैठकीला उपस्थित होते. या दौऱ्याच्या नियोजनासाठी आयोजित केलेल्या बैठकीत या दौऱ्याची सविस्तर माहिती देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, दोन, तीन जूनपासून कार्यकर्ते अयोध्याला रवाना होणार आहेत. त्यासाठी रेल्वेची व्यवस्था करण्यात आली असून, प्रत्येक विभाग अध्यक्षांना किमान एक बोगी भरण्याची सूचना करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी मनसेने १० ते १२ गाड्यांची मागणी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे. मुंबईप्रमाणे ठाणे, नाशिक आणि पुण्यासह इतर जिल्ह्यांतील विभाग अध्यक्षांना या स्वरूपाची जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यानुसार या जिल्ह्यातील विभाग अध्यक्षांची बैठक लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याचे कळते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.