Rajmata Jijau Jayanti : स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते असं म्हणतात. पण आजची स्त्री या पलिकडेही जाऊ पाहत आहे. असं असताना या आधुनिक जगात स्वतःचं एक खंबीर स्थान निर्माण करण्यासाठी तरुणींनी त्यांचा आदर्श ठेवत काही गोष्टी अंगीकारणं आवश्यक आहे.
अराजकतेत स्वराज्य उभारणाऱ्या शिवरायांची आई म्हणून जिजाऊंचा सर्वांनाच परिचय आहे. पण त्या आधी त्यांच्यातल्या स्त्री शक्तीला त्यांनी ओळखलं, घडवलं तेव्हाच त्या शिवबा घडवू शकल्या. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने स्वतःला घडवण्यासाठी त्यांच्याकडून काही गोष्टी शिकणं आवश्यक आहे.
राजमाता जिजाऊंचा परिचय
जिजाऊंचे व्यक्तिमत्व म्हणजे धैर्य,शौर्य,प्रचंड आत्मविश्वास,इच्छाशक्ती आणि गरीबांप्रति प्रचंड तळमळीने ओतप्रोत भरलेले आहे. राजमाता जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी सिंडखेडराजा (जि.बुलढाणा) इथे इतिहास प्रसिद्ध यादव घराण्यातील लखूजीराजे जाधव म्हाळसाराणी या राजघराण्यात झाला.
आजच्या तरुणींनीही शिकावं असं
स्वरक्षणासाठी युध्दकलेत नैपुण्य
लखुजीराजेंनी आपल्या मुलांबरोबरच मुलीला म्हणजेच जिजाऊला देखील राजनीती, युद्धकलेचे शिक्षण दिले. जिजाऊंनी राजघराण्याचा अभिमान न बाळगता युद्धकला राजनीती यामध्ये प्रावीण्य मिळवले.आज आपण जिजाऊ चरित्रातून प्रेरणा घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात प्राविण्य मिळवले पाहिजे. आजच्या मुलींमध्ये प्रचंड नैराश्य,न्युनगंड किंवा असुरक्षतेची भावना प्रामुख्याने जाणवते. जिजाऊंनी आत्मविश्वासाने युद्धकलेत नैपुण्य मिळवले याचा उपयोग पुढे शिवरायांना युद्धकला आणि राजनीतीचे शिक्षण देण्यासाठी झाला.
फक्त चुल आणि मुल यात अडकल्या नाहीत
जिजाऊंनी स्वराज्य घडवण्याचं स्वप्न बघितलं अन् ते सत्यात उतरवलंही. जिजाऊंनी विवाहानंतर स्वराज्य संकल्पनेला अखंड स्वरूप प्राप्त करून देण्याचे ऐतिहासिक कार्य केले आहे. केवळ आपली जहांगिरी किंवा वतन याचा विचार न करता प्रजेला न्याय मिळाला पाहिजे ही भुमिका शहाजीराजे-जिजाऊमातांची होती. जे स्वप्न बघितलं ते सत्यात उतरेपर्यंत शांत बसल्या नाहीत.
निर्भीडता
स्वराज्य उभारताना एक ना अनेक अडचणी आल्या. पण आपल्या ध्येयापासून ढळल्या नाहीत. शहाजीराजांच्या कार्यात जिजाऊमाता अत्यंत खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या होत्या. अदिलशहा, निजाम, मुघल असे बलाढ्य विरोधात असताना मोठ्या निर्भिडपणे जिजाऊमाता शहाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून पुढे आल्या. जिजाऊमातेनं स्वत:च्या जाधव-भोसले कुटूंबाच्या पलीकडे जाऊन रयतेचा विचार केला.
जाती-धर्माच्या चौकटी मोडल्या
स्वराज्याचं स्वप्न साकारताना जाती भेद, धर्म भेदाच्या पलिकडे माणूस त्यांनी पाहिला आणि जपला. म्हणूनच तानाजी, येसाजी, कान्होजी, शिवाजी, बाजी पालसकर, मुरारबाजी, बहिर्जी, कावजी, नेताजी इ. सर्व जाती धर्मातील सरदार व मावळे स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पणासाठी पुढे आले. म्हणजे जिजाऊमातेनं आपले मात्रुप्रेम शिवरायांप्रमाणेच सर्व मावळ्यांवर केले. त्यामुळे जिजाऊ ही स्वराज्यमाता आहेत.
संकटांशी दोन हात करण्याचं धैर्य आणि शौर्य
स्वराज्य उभारण्याच्या प्रक्रियेत अनेक संकट कोसळली. पण जिजाऊ मनाने एवढ्या खंबीर, धैर्यवान होत्या म्हणूनच स्वराज्याचं स्वप्न सत्यात उतरू शकलं. संकटांशी दोन हात कसे करावे याच्या शारीरिक बळाबरोबरच भावनिक, मानसिक आणि वैचारिक बळाचा वारसा जिजाऊंकडूनच शिवरायांना मिळाला. तो आजच्या तरुणींनीही घ्यायला हवा.
आत्मकेंद्रीत नाही तर समाज कल्याणाचा दृष्टीकोन
आज मुला-मुलींना शिकवलं जातं तू कोणाच्या भानगडीत पडू नकोस. त्याचं तो बघून घेईल, आपल्याला काय करायचं. असं शिकवलं जातं. त्यामुळे मुलं आत्मकेंद्रीत होत आहेत. जिजाऊंनी मात्र उपेक्षित, वंचित, शोषित जनतेचा प्राधान्याने विचार केला.आज देखील शिवरायांसारखे पराक्रमी,मानवतावादी नेते उदयाला येतील पण त्याअगोदर जिजाऊंसारखी माता घरोघरी निर्माण झाली पाहिजे.
दैववादी नव्हे तर प्रयत्नवादी
राजमाता जिजाऊ संकटसमयी डगमगल्या नाहीत, शिवरायांना यश मिळावे यासाठी यज्ञ, तप, शांती, उपवास करीत बसल्या नाहीत. यश मिळवण्यासाठी हाती तलवार घ्यावी लागते, चातुर्य पणाला लावावे लागते, प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते. यावर जिजाऊंचा द्रुढ विश्वास होता. जिजाऊ प्रयत्नवादी होत्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.