ratnagiri barsu refinery project row people must be taken into confidence says uddhav thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Barsu Refinery Project : जी स्थानिकांची तीच माझी भूमिका; रिफायनरी प्रकल्प लादू देणार नाही; उद्धव ठाकरे

बारसू ही ग्रीन रिफायनरी आहे तर गावकऱ्यांना मारझोड कशाला करता? डोकी का फोडता?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बारसूबाबत तिथल्या लोकांची भूमिका ही माझी भूमिका असल्याचे स्पष्ट करत असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी बारसूबाबत ग्रामस्थांसोबत उभे राहणार असल्याचे नमूद केले.

बारसूबाबतचे केंद्र सरकारला दिलेले पत्र हे ग्रामस्थांची रिफायनरीला परवानगी असेल तरच प्रकल्प व्हावा या अटीवरच दिले असल्याने आम्ही अडीच वर्षांत पोलिसांकरवी जबरदस्ती केली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बारसू ही ग्रीन रिफायनरी आहे तर गावकऱ्यांना मारझोड कशाला करता? डोकी का फोडता? जमीन आमची आणि इमले तुमचे हे अजिबात चालणार नाही. बारसूमध्ये सुपाऱ्या घेऊन स्थानिकांवर प्रकल्प लादू देणार नसल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

शिवसेनाप्रणीत भारतीय कामगार सेनेची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील बारसू रिफायनरी प्रकल्पावरून झालेल्या आरोपांना उत्तर दिले. जनतेच्या हिताचा प्रकल्प आहे तर पोलिसी बळाचा वापर कशासाठी करता? असे ते म्हणाले.

बारसू रिफायनरी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनीच पत्र दिले होते असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, होय, बारसूबाबतचे पत्र मी दिले होते. पर्यावरणाची हानी करणारे प्रकल्प नको अशी आपली ठाम भूमिका आहे, परंतु त्यावेळी केंद्र सरकारकडून वारंवार विचारणा होत होती म्हणूनच बारसूचा अहवाल मागवून मी पत्र दिले होते. जिथे स्वागत होत असेल तिथे प्रकल्प लावा असेही सांगितल्याचे त्यात होते. नाणार, बारसूबाबतची भूमिका आपली नाही तर तेथील भूमिपुत्रांची आहे असेही ते म्हणाले.

मुळावर येणारे प्रकल्प अडवणार

बारसूसाठी मी पत्र दिले होते तर अडीच वर्षात पोलिसांच्या बळावर मी तो प्रकल्प का राबवला नाही? उद्धव ठाकरेंचे एवढे ऐकता तर मग गद्दारी करून सरकार का पाडले? आरे कारशेडचा निर्णय का फिरवला? कांजूरचा निर्णय का फिरवला? मी कोरोना सेंटर उभे केले ते नाही पाहिले. पण सरकार पाडून ते बुलेट ट्रेनवाल्यांच्या घशात घातले.

रोज सकाळी उठून किती लोक बुलेट ट्रेनने अहमदाबादला जाऊन परत येणार आहेत? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. राज्याच्या मुळावर येणारे प्रकल्प अडवले म्हणून महाविकास आघाडीचे सरकार पाडले गेले, पण लक्षात ठेवा, असे विषय यापुढेही अडवत राहणार, असेही ठाकरे म्हणाले.

बारसूकरांना सत्य समजलेच पाहिजे

बारसूमध्ये पोलिसांची मदत घेऊन माता-भगिनींना फरफटत नेताय. हिंमत असेल तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी गावकऱ्यांसमोर जाऊन त्यांचे गैरसमज दूर करून पारदर्शकता आणावी, असा खोचक सल्लाही ठाकरे यांनी दिला.

मुख्यमंत्री स्वतःच्या शेतात फिरतात, स्ट्रॉबेरी किती लावली आहे ते पाहतात. मग बारसूतील गावकऱ्यांसमोरही प्रकल्पाचे सादरीकरण करा. प्रकल्पाबाबतचे सत्य त्यांना समजलेच पाहिजे आणि ज्यांची जमीन जातेय त्यांना कंत्राटी नव्हे तर कायमस्वरूपीच रोजगार मिळायला पाहिजे, असेही ते म्हणाले.

विनाशकारी रिफायनरी इकडे पाठवता

पर्यावरणाचा ऱ्हास आणि लोकांचे नुकसान करून प्रकल्प आणू नका असे म्हटले की विकासाच्या आड येतात असा आरोप होतो. मग वेदांत फॉक्सकॉन किंवा टाटा एअरबससारखे प्रकल्प इकडे का आणले नाहीत? जे चांगले प्रकल्प इकडे येऊ शकत होते, ते प्रकल्प तिकडे का पाठवले? असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला.

मोठा प्रकल्प देऊ असे मोदी म्हणत होते तो हाच का विनाशकारी रिफायनरी प्रकल्प! अशी टीकाही त्यांनी केली. राज्यातील सरकार हे दिल्लीचे असून दुर्दैवाने महाराष्ट्राचेदेखील आहे. काम‘गार’ करणारे हे सरकार आहे.

राज्याचे काय होणार? मुख्यमंत्री असताना मला जे करता आले ते मी केले. परंतु ज्या पद्धतीने पाठीत खंजीर खुपसून सरकार पाडले, त्याचा बदला मी घेणारच, जन्मभर लक्षात राहील अशी अद्दल घडवणार, असा इशारा ठाकरे यांनी गुरुवारी शिंदे गटाला गुरुवारी दिला.

जोडे पुसायची त्यांची लायकी

राज्यातील आणखी एक प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेल्याचे उदाहरणही ठाकरे यांनी यावेळी दिले. ते म्हणाले, ‘निरुद्योग’ मंत्री उदय सामंत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच एक २३०० कोटी रुपयांचा करार केला. चपलांचे जोडे बनवणाऱ्या कंपनीबरोबर. पण ती कंपनी महाराष्ट्राऐवजी तमिळनाडूत गेली आणि मिंधे सरकार मात्र जोडे पुसत बसले.

जोडे पुसायची लायकी असणारे सरकार चालवताहेत, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. महाविकास आघाडी सरकारने २५ हून अधिक उद्योग आणि अडीच लाख कोटींहून अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आणली. मात्र आता शेपट्या घालून बसणारे सरकार हे उद्योग बाहेर नेत आहेत अशी टीका ठाकरे यांनी केली.

बारसूला जाणार

बारसूतील रिफायनरीच्या प्रकल्पाला स्थानिक गावकऱ्यांनी विरोध केला असल्याने त्यांच्या बाजूने उभे राहण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारसूसह रिफायनरीग्रस्त सहा गावांना भेट देणार असल्याचे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी गुरुवारी मुंबईत जाहीर केले. रिफायनरीग्रस्त गावकऱ्यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी भेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT