GD Bapu Lad esakal
महाराष्ट्र बातम्या

Dr.GD Bapu Lad : पोलिसांनी घेरलेल्या गावात रक्ताचा टिळा लावून पार पडलं डॉ.जी.डी.बापू लाड यांच लग्न!

जी डी बापूंनी स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान उल्लेखनीय

Pooja Karande-Kadam

Dr.GD Bapu Lad Death anniversary : महाराष्ट्रातील प्रख्यात स्वातंत्र्यसेनानी व समाजवादी विचारसरणीचे कृतिशील पुरस्कर्ते क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सरकारला सळो की पळो करून सोडले होते. जी डी बापूंनी स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान हे उल्लेखनीय आहे. त्यामुळेच आजही देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याचा इतिहास लिहिताना क्रांतीअग्रणी म्हणून डॉ. जी. डी. बापू लाड यांचा उल्लेख केला जातो. आज त्यांची ११ वी पूण्यतिथी त्यानिमित्ताने बापूंच्या जीवनातील एका महत्त्वाच्या प्रसंगावर दृष्टीक्षेप टाकूयात.

बापूंचा विवाह सोहळा

बापूंचा जन्म ४ डिसेंबर १९२२ रोजी औंध संस्थानातील सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दादा आणि आईचे नाव सारजा होते. बापू यांना एक भाऊ व एक बहीण होती. वडिलांच्या अकाली निधनानंतर आई सारजा यांनीच बापूंसह तिघा मुलांचे संगोपन आणि शिक्षण केले.

कुंडलच्या प्राथमिक शाळेतच बापूंचे सातवी पर्यंत शिक्षण झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी ते बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथे महात्त्मा गांधींच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या सिक्का बोर्डिंगमध्ये विद्यार्थी म्हणून दाखल झाले. मात्र दहावीला ते औंधमधील विद्यालयात दाखल झाले. त्या विद्यालयातून ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या आयुर्वेद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. १९४२ साली त्यांनी चले जाव चळवळीत भाग घेण्यासाठी पुण्यातील शिक्षण अर्धवट सोडून दिले आणि गावी कुंडलला येऊन स्वातंत्र्य आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला.

बापू त्यावेळपासून स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले ते त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत सामान्य मानसाच्या हक्कासाठीच झटले. बापूंच्या जीवनप्रवासातील प्रत्येक घटनेवर क्रांतीकारी विचारसरणीचा पगडा आहे. त्यांचे लग्नही साध्या पद्धतीने झाले नव्हते. तर, त्यावेळीही त्यांना पोलिसांच्या वेढ्यातच लग्न करावे लागले. या लग्नाबद्दल बापूंनी ‘जी.डी.बापू लाड : आत्मकथन एक संघर्षकथा’ यामध्ये यावर सविस्तर लिहीले आहे.

रात्री बारा वाजता पार पडला क्रांतिकारी लग्न सोहळा

बापू त्यावेळी फरार होते. ब्रिटीश सरकारने त्यांच्यावर बक्षिसही ठेवले होते. जर ते कोणा अधिकाऱ्याच्या हाती लागले तर दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेशही ब्रिटीश सरकारने जारी केला होता. त्यामूळे अशा तरूणाशी लग्न करायला कोणी तयार होईल, असा विचार करून त्यांनी लग्नाची अपेक्षाच सोडली होती. तसे असूनही त्यांनी अनेक मुली पाहिल्या. परंतु ब्रिटीश सरकारच्या गोळीवर ज्याचे नाव छापले आहे अशा त्यांच्यासारख्या तरूणासोबत लग्न करायला कोणीही तयार नव्हते.

बापूंचे गुरूजी आप्पासाहेब लाड यांच्या भाची विजयाताई यांच्यासोबत लग्नाची बोलणी झाली. त्यांना त्या पसंतही पडल्या. पण, इतर मुलींसारखे विजयाताईही नकार देईल असे अपेक्षित असतानाच त्यांनी बापूंना होकार दिला. तिच्या निर्णयावर विश्वास न दाखवता पून्हा एकदा त्यांनी प्रत्यक्षच तिला विचारलं, 'मी अशा अवस्थेमध्ये आहे की कधीही माझे काही बरेवाईट होऊ शकते. तेव्हा माझ्याबरोबर लग्न करायची तुझी तयारी आहे का?'. या प्रश्नावर क्षणाचाही विलंब न करता विजयाताईंनी तयारी आहे म्हणून सांगितले.

त्या दिवशी बापूंनी त्या विजयाताई यांना पहिल्यांदाच पाहिले पण त्यांच्या चेहऱ्यावरील कठोरपणा आणि जिद्द त्यांना अधिक भावली. त्यामूळेच त्यांच्याशी लग्न करायचा निर्णय पक्का झाला. क्रांतीकारक विचार असणाऱ्या बापूंना लग्नही विधीवत करायचे नव्हते. त्यात वेळही जाणार होता आणि एकीकडे ब्रिटीश पोलिसांची गस्तही होती. त्यामूळे लग्नसुद्धा क्रांतीकारी लढ्याचा एक भाग झाला पाहिजे. लग्न मुहूर्तावर करायचं नाही, लग्न मध्यरात्री करायचं. लग्नामध्ये जे विधी असतात ते करायचे नाहीत. त्या वेळची बापूंची सशस्त्रदलं, तुफानदलंही हजर ठेवावी. कुंकू नाही तर रक्ताचे टिळे लावून लग्न करायचं. लग्नामध्ये अगदी साध्या पद्धतीचे कपडे घालायचे, असे विचार त्यांनी मित्र मंडळींसमोर मांडले.

संबंधित माहीती

असं लग्न पार पाडायचं ठरलं. आता हे लग्न त्यांच्या गावातच करायचं तर त्यावेळी कुंडलमध्ये पोलिसांबरोबर ब्रिटिश पोलिसांची ७० सशस्त्र पोलिसांची पार्टी चावडीजवळच्या जैन धर्मशाळेमध्ये आली होती. कुंडल हे जैनधर्मीयांचं तीर्थक्षेत्र असल्याकारणानं तिथे मोठी धर्मशाळा बांधली होती. त्या धर्मशाळेमध्ये ब्रिटिश पोलिसांनी कब्जा केला होता. त्यामूळे पोलिसांनी वेढा दिलेल्या गावात कसे लग्न करायचे याचा विचार बापूंनीही केला. पण, एकदा ठरवलेली गोष्ट सत्यात उतरल्याशिवाय गप्प बसतील ते बापू कसले. ब्रिटिशसरकारच्या नाकावर टीच्चून बापूंनी लग्न कुंडलमध्येच करायचे आणि ते यशस्वीरीत्या पार पडायचे ठरवले.

कुंडलपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ताकारीला ब्रिटिश पोलिसांचं ठाणं होतं. विट्याला सशस्त्र पोलीस दल होतं. सातारला, कोल्हापूर,सांगली, तासगावला पोलीस दलं होतं. ही सगळी पोलीस दलं मिळून हजार ते बाराशे सशस्त्र पोलिसांची दलं केवळ बापूंसारख्या क्रांतीकारांच्या पाळतीवर राहण्यासाठी बनवण्यात आली होती.

अखेर २५ मे १९४५ रोजी रूढी-परंपरेला फाटा देऊन पुरोगामी पद्धतीने मे महिन्यामध्ये एका रात्री लग्न उरकायचे निश्चित झाले. त्या लग्नामध्ये काही घातपात होऊ नये म्हणून गनिमी कावा करायचे ठरले. एका लग्नमंडपात जिथे त्याच दिवशी सायंकाळी बापूंचे मित्र शाहीर शंकरराव निकम यांचं लग्न उरकलं. त्याच लग्नाच्या मंडपात मध्यरात्री १२ मुहूर्त गाठत बापूही बोहल्यावर चढले. त्यांच्या लग्नाला जवळजवळ दोन हजार तुफान सैनिक हजर होते. त्यातील सत्तर-ऐंशी लोक सरकारच्या रडारवर असलेले होते. खास गोष्ट म्हणजे बापूंच्या लग्नाला लोकजागृतीची काव्यरचना करणारे ग. दि. माडगूळकर हेही उपस्थित होते.

बापूंचे लग्न गावातच पार पडणार अशी माहिती मिळाल्याने गावातील ७० पोलिस गावातून हाललेही नाहीत. ताकारीचा ब्रिटिश पोलिसांचा तळ कुठल्याही प्रकारची ऑर्डर घेऊन कुंडलच्या बाजूला शकले नाहीत. किर्लोस्करवाडीचे पोलिसांचे दल तिथेच राहिले.

क्रांतिकारांच्या जखमेवर हळद लागते लग्नात नाही, याप्रमाणे बापूंच्या लग्नातही अंगाला हळद लागली नव्हती. ना मंगलअष्टका होत्या, ना कोणते विधी पार पडले. वर आणि वधूने एकमेकांला कुंकू न लावता रक्ताचे टिळे लावले. बापूंच्या पत्नी विजयाताई यांनी त्यांचे बोट कापून रक्ताचा टिळा बापूंना लावला. त्यानंतर ‘पती म्हणून मी तुमचा स्वीकार केला' असे जाहीररीत्या सांगितले. त्यानंतर मी माझं बोट कापून तिच्या कपाळी रक्ताचा टिळा लावून कुंकू लावलं आणि 'तुझा पत्नी म्हणून स्वीकार केला' असं सांगितले. याच त्या मंगलाष्टका होत्या.

या विधीनंतर वामनराव चोरघडे आणि उत्तमराव पाटील याचं क्रांतिगीत गायन आणि भाऊसाहेब नेवाळकर याचं छोटसं भाषण आणि ग. दि. माडगूळकर याचं छोटसं भाषण होऊन मध्यरात्री एकच्या सुमारास बापूंचा विवाह समारंभ पार पडला.

भूमिगत लढा चालविण्यासाठी लागणारा पैसा मिळविण्यासाठी त्यांनी जिवावर उदार होऊन सहकाऱ्यांच्या मदतीने १९४३ साली कुंडल बँकेवर दरोडा घातला आणि पगारासाठी पैसा घेऊन जाणारी ब्रिटिशांची रेल्वे शेणोली स्थानकानजीक लुटली. १९४४ सालच्या एप्रिल महिन्यात बापू, नागनाथ नायकवडी, उत्तमराव पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने खानदेशात धुळे येथील साडेपाच लाख रुपये रकमेचा सरकारी खजिना लुटला. त्या लुटीतून मिळालेला पैसा बापूंनी सातारा प्रतिसरकारच्या तुफान सैनिक दल निर्मितीसाठी वापरला.

फरार अवस्थेत असतानाच ब्रिटिशांच्या कैदेत असणाऱ्या व उपचारासाठी पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या पत्नीची, नवसाबाई लाड यांची यशस्वीरीत्या सुटका केली. बापूंनी केवळ ब्रिटीशांविरोधात लढा दिला नाही. तर, देश स्वातंत्र्य झाल्यावरही त्यांनी राजकारणातून समाजसेवा केली.

जी. डी. लाड तासगाव मतदारसंघातून विधानसभा सदस्य आणि शे. का. पक्षाचे विधानपरिषद सदस्य होते १९८५ साली त्यांची अखिल भारतीय किसान सभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. पूढे अनेक वर्ष ते समाजकारण आणि राजकारणात सक्रीय होते. अखेर १४ नोव्हेंवर २०११ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत अनेक क्रांतिकारी होऊन गेले. मात्र बापूंचे कार्य थोर होते आणि ते कायम स्मरणात राहील.

(संबंधित माहिती डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या  "जी.डीबापू लाड आत्मकथन : एक संघर्ष यात्रा' या जीवनचरित्रातून घेण्यात आली आहे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

SCROLL FOR NEXT