पुणे : महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा हाहाकार पाहता विकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. इतर दिवशी सुद्धा कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संख्येवर राज्यात चिंतेचं वातावरण असून आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर ताण आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे कोविड परिस्थितीवर राज्याच्या टास्क फोर्ससमवेत ऑनलाईन बैठक घेत आहेत. यात ऑक्सिजनची उपलब्धता, रेमिडेसेवीरचा वापर, बेड्सची उपलब्धता, उपचार पद्धती, सुविधा वाढवणे, निर्बंध लावणे, कडक दंडात्मक कार्यवाही करणे या मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. ते संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेतील का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या एका फेसबुक पोस्टद्वारे लॉकडाऊनबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.
रोहित पवार यांनी म्हटलंय की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नाईलाजाने लॉकडाऊन करण्याची वेळ आलीय, पण लॉकडाऊन नाही केला तर ही साखळी अशीच वाढत जाऊन आपली आरोग्य व्यवस्था कोलमडू शकते आणि असं झालं तर होणारी हानी अपरिमित असेल. म्हणूनच ती टाळण्यासाठी आणि राज्यातील प्रत्येक नागरिकाचा महत्त्वाचा असलेला जीव वाचवण्यासाठी सरकारला हे पाऊल उचलावं लागतंय. लॉकडाऊन करताना मात्र सर्वसामन्यांना विशेषतः हातावर पोट असणाऱ्या वर्गाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये याचीही आपल्याला काळजी घ्यावी लागेल.
पुढे त्यांनी म्हटलंय की, घरकाम करणाऱ्या महिला, रिक्षाचालक, फेरीवाले, डबेवाले, माथाडी कामगार, हमाल, बांधकाम कामगार, ज्येष्ठ नागरिक, निराधार, दिव्यांग, विधवा महिला अशा अनेक वर्गांना लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका बसू शकतो. आपल्याला या प्रत्येक घटकाचा विचार करावा लागेल. राज्य शासनाने आर्थिक दुर्बल घटकांना तसेच लॉकडाऊनमुळे ज्या घटकांवर सर्वाधिक परिणाम होऊ शकतो, अशा इतर सर्व घटकांसाठी प्रत्यक्ष आर्थिक मदत देणे तसेच मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देणे यावर भर द्यायला हवा. सध्याची परिस्थिती पाहून आपल्या गावी माघारी जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर कामगारांची गर्दी होत असल्याचं दिसतंय. मात्र कामगारांनी घाई करू नये आणि सरकार, संबंधित कंपनी आणि नागरिक म्हणून आपण सर्वांनीच त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. ग्रामीण भागात शेतीसाठी तसेच शहरांमध्ये उद्योगांसाठी काही निकषांसह लॉकडाऊन मध्ये काही प्रमाणात सूट देता येईल का, याचाही विचार करायला हवा आणि जनतेप्रती संवेदनशील असलेलं महाविकास आघाडी सरकार याचा निश्चित विचार करेल, असा विश्वास आहे. सरतेशेवटी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करत म्हटलंय की, तूर्तास सरकार घेईल त्या निर्णयाला पूर्णपणे सहकार्य करुयात आणि कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करुयात!
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी किमान १५ दिवसांचा लोकडाऊन गरजेचा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री व कॅबिनेट लॉकडाऊन संदर्भातील निर्णय घेतला. जर मुख्यमंत्र्यांनी मान्य केले, तर १५ दिवसांचा राज्यात लॉकडाउन लागू शकले, असे संकेत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रविवारी (ता.११) जालना येथे पत्रकारांशी बोलताना दिले आहेत. काल शनिवारी महाराष्ट्रात ५५ हजार ४११ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात दररोज ५० हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची संख्या आढळत आहे. शनिवारी थोडीसी दिलासादायक बातमी आली आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात ५३ हजार ५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबई, मुंबई उपनगर, पुणे आणि नागपूरसारख्या शहरात दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.