सोलापूर : दहावी- बारावीच्या निकालानंतर आता पुढील व्यावसायिक शिक्षणाच्या प्रवेशासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्र (जात वैधता प्रमाणपत्र) आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास १०० ते १५० विद्यार्थ्यांचे अर्ज जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्राप्त होत आहेत. मुदतीची वाट न पाहता विद्यार्थ्यांची गरज पाहून त्या अर्जांवर समितीकडून दोन ते तीन आठवड्यात निर्णय घेतला जात आहे.
बारावीनंतर विद्यार्थी अभियांत्रिकी, फार्मसी, नर्सिंग, मेडिकलसह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. दहावीनंतर काही विद्यार्थी पॉलिटेक्निकला जातात. अशावेळी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांच्याकडील जात प्रमाणपत्राची पडताळणी प्रमाणपत्र (जात वैधता प्रमाणपत्र तथा व्हॅलिडीटी) द्यावे लागते.
ऐनवेळी ते प्रमाणपत्र न मिळाल्याने विद्यार्थ्याला त्याच्या आवडीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळत नाही. पण, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेत जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून विद्यार्थ्यांना वेळेत दाखले दिले जात आहेत. मात्र, विद्यार्थ्यांनी परिपूर्ण प्रस्ताव समितीकडे वेळेत सादर करणे आवश्यक असल्याचे समितीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अर्जातील त्रुटींची पूर्तता काही दिवसांत करावी, असेही त्यांचे आवाहन आहे.
दरम्यान, संशयित प्रकरणात समितीचे अधिकारी संबंधित शासकीय विभागांकडून मूळ कागदपत्रांची मागणी करतात तर काही प्रकरणात दक्षता पथकाकडून गृहचौकशी देखील केली जाते, असेही समितीच्या अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
असे द्यावे लागतील पुरावे
एससी : १९५० पूर्वीचा जातीची नोंद असलेला पुरावा
व्हीजेएनटी (अ, ब, क, ड) : १९६१ पूर्वीचे जातीचा पुरावा
ओबीसी, एसबीसी, एसईबीसी : १९६७ पूर्वीचे पुरावे
विद्यार्थ्यांनी तातडीने परिपूर्ण कागदपत्रांसह करावेत अर्ज
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीच अर्ज करावेत. प्रमाणपत्र देण्याचा कालावधी जरी ४५ ते ६० दिवसांचा असला, तरीदेखील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कोणतीही अडचण येणार नाही, यादृष्टीने त्यांच्या अर्जांवर दररोज कार्यवाही केली जात आहे. विद्यार्थ्यांनी योग्य पुराव्यानिशी ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज करावेत, त्रुटी असल्यास त्याची तातडीने पूर्तता करावी.
- सचिन कवले, सदस्य सचिव, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सोलापूर
विद्यार्थ्यांनी हे आवर्जून लक्षात ठेवावे...
विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी सुरवातीला ‘बार्टी’च्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करावा.
ऑनलाइन अर्ज भरल्याची प्रिंट व आवश्यक कागदपत्रांसह तो प्रस्ताव ऑफलाइन पद्धतीने सात रस्ता येथील समितीच्या कार्यालयात द्यावा.
विद्यार्थ्यांनी स्वतःचा अचूक मोबाईल क्रमांक व ई-मेल ॲड्रेस अर्जासोबत द्यावा, जेणेकरून अर्जाच्या त्रुटींची माहिती त्यावर समजू शकेल.
परिपूर्ण प्रस्ताव सादर केलेल्या विद्यार्थ्यांची ‘व्हॅलिडिटी’ त्याच्या ई-मेलवर ऑनलाइन पद्धतीने देखील पाठविली जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.