देशातील चोवीस प्रादेशिक भाषांतील साहित्यासाठी पुरस्कार जाहीर झाले असून, मराठी भाषेसाठीचा बहुमान ‘रिंगाण’ला मिळाला आहे.
कोल्हापूर : येथील प्रसिद्ध लेखक व कादंबरीकार प्रा. कृष्णात खोत (Prof. Krishnat Khot) यांना ‘रिंगाण’ कादंबरीसाठी (Ringan Novel) साहित्य अकादमीचा पुरस्कार (Sahitya Akademi Award) जाहीर झाला. देशातील चोवीस प्रादेशिक भाषांतील साहित्यासाठी पुरस्कार जाहीर झाले असून, मराठी भाषेसाठीचा बहुमान ‘रिंगाण’ला मिळाला आहे.
अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत अकादमीचे सचिव के. श्रीनिवासराव यांनी नवी दिल्ली येथे पुरस्कारांची घोषणा केली. दरम्यान, रोख एक लाख रुपये आणि ताम्रपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून बारा मार्चला पुरस्कार वितरण होणार आहे.
तसेच प्रकाश पर्येकर यांच्या कोकणी भाषेतील ‘वर्सल’ या कथासंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय विविध भाषांतील साहित्यिक, कवी, कादंबरीकारांनाही या सन्मानाने गौरविण्यात येईल. विविध २४ भारतीय भाषांतील ९ कविता संग्रह, ६ कथा, ५ कथासंग्रह, तीन निबंध आणि एका टीकात्मक पुस्तकालाही पुरस्कार जाहीर झाला आहे.
हिंदी भाषेत हा पुरस्कार लेखक संजीव यांना त्यांच्या ‘मुझे पाहानो’ या कादंबरीसाठी तर इंग्रजीसाठी नीलमशरण कौर आणि उर्दूसाठी सादिक नवाब सहार यांना हा सन्मान जाहीर झाला आहे. साहित्य अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवासराव यांनी पत्रकार परिषदेत पुरस्कारांची घोषणा केली.
अन्य पुरस्कार विजेत्यांमध्ये स्वर्णजीत सवी (पंजाबी), विजय वर्मा (डोगरी), विनोद जोशी (गुजराती), मन्शूर बनिहाली (काश्मिरी), सोरोख्खैबम गंभिनी (मणिपुरी), आशुतोष परिडा (उडिया), गजेसिंह राजपुरोहित (राजस्थानी), अरुणरंजन मिश्र (संस्कृत), विनोद आसुदानी (सिंधी), स्वपनमय चक्रवर्ती (बांगला), राजशेखरन (तमीळ), प्रणवज्योती डेका (आसामी), नंदेश्वर दैमारी (बोडो), तारासीन बासकी (संथाळी), टी. पतंजली शास्त्री (तेलुगू), लक्ष्मीशा तोल्पडी (कन्नड), बासुकीनाथ झा (मैथिली), युद्धवीर राणा (नेपाळी) आणि ई. व्ही. रामकृष्णन (मल्याळी) यांचा समावेश आहे. या पुरस्कारांचे पुढील वर्षी १२ मार्च रोजी वितरण करण्यात येईल.
मराठी कादंबरी लेखनात प्रा. खोत यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. ‘गावठाण’ (२००५), ‘रौंदाळा’ (२००८), ‘झड-झिंबड’ (२०१२), ‘धूळमाती’ (२०१४), ‘रिंगाण’ (२०१८) या त्यांच्या प्रकाशित कादंबऱ्या आहेत. त्यातून बदलत्या ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण त्यांनी केले आहे. ‘नांगरल्याविन भुई’ हे ललित व्यक्तिचित्रणही वाचकप्रिय आहे. कथा आणि कविता या साहित्यप्रकारातही त्यांनी विपुल लेखन केले आहे. गावगाडा, गावगाड्यातील बदलती स्थित्यंतरे आणि जगण्याचा संघर्ष हा त्यांच्या लिखानाचा मुख्य विषय राहिला आहे. त्यांच्या साहित्यकृतींना राज्य शासनासह अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.
प्रकल्पासाठी घरादारावर पाणी सोडून उठवलेल्या माणसांची परवड हा ‘रिंगाण’ कादंबरीचा एक धागा आहे. तो धागा पुढे नेत ही कादंबरी माणसांचे जग ओलांडून मुक्या जनावरांच्या भावविश्वात घेऊन जाते. गाव सोडताना वांझ म्हणून मागे सोडून दिलेल्या म्हशींचे काय होते? माणसांच्या सहवासात वाढलेल्या जनावरांवर एकाएकी जंगलात राहण्याची वेळ येते; तेव्हा आलेल्या प्रसंगाशी त्या कशा जुळवून घेतात? जनावरांशी नातं तोडून नव्या गावाची वाट धरणाऱ्या देवाप्पाला पुन्हा त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी कशी झुंज द्यावी लागते, ती देता देता आतून तुटून तो कसा उद्ध्वस्त होत जातो, हे सारे विस्थापितांचे जगणे आणि माणूस, निसर्ग व पाळीव प्राण्यांतील अनोखा अनुबंध ‘रिंगाण’मधून अनुभवण्यास मिळतो.
एखाद्या साहित्यकृतीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळणे, हा साहित्यिकांसाठी आनंदाचा क्षण असतो. यानिमित्ताने वाचकांचेही साहित्यकृतीतील विषयाकडे लक्ष वेधले जाते. निसर्गाला गृहीत धरून आपली वाटचाल सुरू आहे; मात्र, निसर्ग, पशुपक्षी आणि माणसाचे एक वेगळेच नाते आहे आणि ते जपलेच पाहिजे, अशा सर्वच गोष्टींकडे वाचकांचे नक्कीच लक्ष वेधले जाईल.
-प्रा. कृष्णात खोत
श्री. खोत मूळचे पन्हाळा तालुक्यातील निकमवाडीचे. या गावात १९८७ मध्ये वीज आली. गावात शिक्षणाची सोय नव्हती. ग्रामीण वातावरणात वाढलेल्या प्रा. खोत यांनी आपल्या लेखनातून गावगाड्याचा सर्वांगाने वेध घेतला. सध्या ते, कळे ज्युनिअर कॉलेजमध्ये आहेत. पुरस्कार जाहीर झाला त्यावेळी ते कॉलेजमधीलच एका कार्यक्रमात व्यस्त होते. ‘रिंगाण’ या कादंबरीला यापूर्वी महाराष्ट्र फाउंडेशनसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.