पुणे : ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी ‘सकाळ रिलीफ फंडा’ला चार कोटी व ‘स्वरूपवर्धिनी’ संस्थेला ५० लाख, अशी एकूण चार कोटी पन्नास लाख रुपयांची वैयक्तिक देणगी दिली. बुधवार पेठेतील ‘सकाळ’च्या मुख्य कार्यालयात देणगीचे धनादेश संस्थांच्या प्रतिनिधींकडे पवार यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आले.
याप्रसंगी पवार म्हणाले, ‘‘सन १९६८मध्ये पुणे अंध शाळेच्या स्थापनेपासून माझ्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली. सुमारे ४० वर्षांपासून ‘सकाळ रिलीफ फंडा’चा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. याचबरोबर ४० वर्षांपासून ‘स्वरूपवर्धिनी’ संस्थेशी निगडित आहे. याशिवाय बालकल्याण संस्था, विद्यार्थी साहाय्यक समिती व बालग्राम अशा अनेक सामाजिक संस्थांमध्ये जवळपास ३५ ते ४० वर्षांपासून आजतागायत सक्रिय आहे. समाजासाठी चांगले व विधायक कार्य करणाऱ्या संस्थांचे काम अधिक जोमाने पुढे सुरू राहण्यासाठी माझे वैयक्तिक योगदान म्हणून ही देणगी दोन संस्थांना देत आहे.’’
यावेळी स्वरूपवर्धिनी संस्थेचे उपाध्यक्ष शिरीष पटवर्धन, प्रशासकीय अधिकारी अरविंद केळकर, ‘सकाळ रिलीफ फंडा’चे समिती सदस्य डॉ. सतीश देसाई, राज्यसभेच्या माजी खासदार वंदना चव्हाण, राजेश शहा, वालचंद संचेती, पोपटलाल ओस्तवाल, अॅड. शिवराज कदम-जहागीरदार, सूर्यकांत पाठक व विश्वस्त महेंद्र पिसाळ उपस्थित होते.
जलसंवर्धन प्रकल्पाचे कौतुक
प्रतापराव पवार यांनी ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘‘देशात कोणत्याही भागात नैसर्गिक आपत्ती आल्यास संस्थेने समाजाच्या सहकार्याने अतिशय उत्तम कामगिरी केले आहे. गेली काही वर्षे महाराष्ट्रातील खेड्यांमध्ये गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि संस्थेच्या निधीद्वारे ‘ओढा खोलीकरण’ प्रकल्पाच्या माध्यमातून शेकडो गावांचा पाणी प्रश्न सोडवलेला आहे.’’
‘महाराष्ट्र अंनिस’ला एक कोटी रुपयांची देणगी
‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला (अंनिस) एक कोटी रुपयांची वैयक्तिक देणगी दिली आहे. बुधवार पेठेतील ‘सकाळ’च्या मुख्य कार्यालयात ‘महाराष्ट्र अंनिस’चे राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. हमीद दाभोलकर यांनी मदतीचा धनादेश पवार यांच्या हस्ते स्वीकारला. यावेळी ‘महाराष्ट्र अंनिस’चे मिलिंद देशमुख व राज्यसभेच्या माजी खासदार वंदना चव्हाण उपस्थित होते.
डॉ. दाभोलकर म्हणाले, ‘‘संस्थेचे आम्ही सर्व कार्यकर्ते विश्वासपूर्वक नमूद करतो, की दिलेल्या देणगीचा वापर संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक जनजागृती उपक्रमांसाठीच केला जाईल.’’ पवार म्हणाले, ‘‘देणगीची रक्कम कॉर्पस फंडात ठेवून, त्यातून मिळणाऱ्या व्याजातील ८५ टक्के रक्कम संस्थेच्या उद्दिष्टांसाठी प्राधान्याने खर्च करावी व १५ टक्के रक्कम संस्थेने प्रशासकीय खर्चासाठी वापरावी.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.