सोलापूर : नोकरीला लागताना गैरकृत्य न करण्याची घेतलेली शपथ, आई-वडिलांचे संस्कार व त्यांचे स्वप्न, समाजात ताठ मानेने वावरणारी पत्नी किंवा पती, शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणारी मुले, या सर्वांचा विचार न करता सरकारी बाबू लाच घेताना पकडतात, हे विशेष. अर्ध्या लाखांहून अधिक रुपयांची दरमहा पगार असतानाही मागील दहा वर्षांत नऊ हजार ३१६ प्रकरणात तब्बल १० हजारांहून अधिकजण लाच प्रकरणात अडकल्याची वस्तुस्थिती आहे. चिंतेची बाब म्हणजे यामध्ये सर्वसामान्यांना न्याय देणारे महसूल व पोलिस विभाग अव्वल आहे.
पोलिस, महसूल, शिक्षण, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, महावितरण, जलसंपदा, सामाजिक न्याय, समाजकल्याण, कृषी अशा विभागांमध्ये सर्वसामान्य गरजूंची मोठी गर्दी असते. योजनांचा लाभ मिळावा, वर्षानुवर्षे प्रलंबित पडलेले काम मार्गी लागावे म्हणून मोठ्या आशेने त्याठिकाणी जातात. पण, अनेक कार्यालयांमध्ये ‘साहेबांना- मॅडमला पण द्यावे लागते’ असे सांगून लिपिकांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत अनेकजण लाचेची अपेक्षा करतात ही वस्तुस्थिती आहे.
लाचेची रक्कम स्वीकारताना त्या गरजू व्यक्तीचा तळतळाट लागेल, हा लाचेचा पैसा अंगी लागणार नाही, अशी कोणतीही भावना त्या अधिकारी तथा कर्मचाऱ्याकडे नसते. लाखो रुपयांची पगार, फिरायला सरकारी गाडी, शासकीय बंगला, वातानुकूलित कार्यालय, अशा सगळ्या सुविधा आणि दुसरीकडे स्वत:चा टोलेजंग बंगला, पत्नी, मुलांना प्रत्येकाला स्वतंत्र गाडी, कोट्यवधींची खासगी मालमत्ता असतानाही अनेकजण लाचेची अपेक्षा करतात हे दुर्दैवीच. जानेवारी २०२१ ते ११ डिसेंबर २०२३ या काळात महापालिकांमध्ये १३६, जिल्हा परिषदांमध्ये १२५ व पंचायत समित्यांमध्ये १९६ लाच प्रकरणाच्या कारवाया केल्या आहेत. दुसरीकडे महसूल विभागात ५४२ तर पोलिस खात्यात ४६८ कारवाया देखील झाल्या आहेत.
संत तुकाराम महाराज म्हणतात...
धन मेळवुनी कोटी । सवें न ये रे लंगोटी ॥१॥ पाने खाशील उदंड । अंती जाशील सुकल्या तोंड ॥२॥ पलंग न्याहाल्या सुपाती । शेवटी गोवऱ्या सांगती ॥३॥ तुका म्हणे राम । एक विसरता श्रम ॥४॥. म्हणजेच आयुष्यात तुम्ही करोडो रुपये धन मिळवले, तरी शेवटी एक लंगोटीसुद्धा तुझ्यासोबत येणार नाही. उदंड पाने खाशील पण शेवटी जातांना तोंड सुकलेलंच असेल. सुपती म्हणजे झोपायला पलंग, न्याहाल्या म्हणजे गाद्यगिरद्या असतील, पण शेवटी गोवऱ्याच सांगाती असतील.
जनाची नाही, कुटुंबाची तर वाटू द्या...
आपला मुलगा किंवा मुलगी मोठी होऊन नावलौकिक करेल, लालदिव्याच्या गाडीतून फिरेल, सर्वसामान्यांचे दु:ख दूर करण्यासाठी प्रयत्न करेल असे स्वप्न पाहत पोटाला चिमटा घेऊन आई-वडील त्यांना शिकवतात. पण, स्वप्न पूर्ण झाल्यानंतर त्याच आई- वडिलांची अपेक्षाभंग करून जेव्हा लाच प्रकरणात आपला मुलगा किंवा मुलगी सापडते, त्यावेळी त्या वयस्क आई-वडिलांना काय वाटत असेल, याचा विचार करणे जरुरी आहे. शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या त्या मुलांना मित्रांसोबत फिरताना काय वाटत असेल, याचाही लाच घेणाऱ्यांना विसर पडलेला असतो. त्यामुळे आता जनतेनेच ‘मी लाच देणार नाही’ असा संकल्प करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
लाच प्रकरणाची १० वर्षातील स्थिती
एकूण गुन्हे
९,३१६
लाच प्रकरणातील आरोपी
१०,१०९
‘अपसंपदा’चे गुन्हे
२०७
सर्वाधिक गुन्ह्यांचे विभाग
महसूल व पोलिस
गप्प बसू नका, इथे करा थेट तक्रार
शासकीय काम करताना सेवा हमी कायद्यानुसार प्रत्येक कामाचा कालवधी निश्चित झाला आहे. तरीपण, कोणी जाणिवपूर्वक तुमची अडवणूक करीत असल्यास १०६४ या टोल फ्री क्रमांकावर किंवा ९९३०९९७७०० व्हाट्सॲप नंबरवर थेट तक्रार करता येते. तक्रारदाराचे नाव गोपनिय ठेवले जाते. एखादा व्यक्ती तक्रारीसाठी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयातही जावून तक्रार देऊ शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.