सोलापूर : ग्रामीण भागातील महिला शासकीय सेवेत आल्यावर काय करू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे पोलिस शिपाई मधू शिंदे या आहेत. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या मुख्यालयातील ‘भरोसा सेल’मध्ये त्या काम करीत आहेत. पाच महिन्यात त्यांनी तब्बल ७० पेक्षा जास्त महिलांच्या संसारातील वितुष्ट मिटवून त्यांचा तुटण्याच्या उंबरठ्यावरील संसार पुन्हा जोडण्याचे कौतुकास्पद काम केले आहे.
कोरोनानंतर पती-पत्नींच्या संसारात वितुष्ट तथा भांडण- तंटे वाढले आहेत. अनेकांचे संसार तुटण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत. माहेरची लुडबुड, सासू-सासरच्यांचा मुलाच्या संसारात हस्तक्षेप, मोबाईलचा अतिवापर, चारित्र्यावरील संशय, विवाहात मानपान केला नाही, माहेरून पैसे आण अशा वेगवेगळ्या कारणांसाठी अनेक महिलांना सासूरवास सोसावा लागतो. अनेक महिने अन्याय सोसल्यानंतर तिला पोलिस ठाण्याची पायरी चढावी लागत आहे.
अशा महिलांच्या संसारातील दुरावा दूर करून त्यांच्या संसारात पुन्हा हास्य फुलविण्यासाठी पोलिस शिपाई मधू शिंदे यांनी मेहनत घेतली. त्यांच्या समुपदेशनाला प्रतिसाद देत ७०हून अधिक महिला पुन्हा सासरी नांदायला गेल्या आहेत. तुटणारे संसार जोडण्याचे काम त्या आजही करीत आहेत. पोलिस शिपाई मधू शिंदे यांचे पतीही पोलिस दलातच कार्यरत आहेत.
‘कुटुंबाला माहिती होवू न देता सराव अन् भरती झालेच’
वडील एसटी चालक होते, आई घरकाम करायची. दोन भाऊ आणि मी, असे आमचे बाणेगाव (ता. उत्तर सोलापूर) येथील कुटुंब. दहावीनंतर अकरावी उत्तीर्ण झाले आणि बारावी शिकत असताना २०११ मध्ये पोलिस भरती निघाली. त्यावेळी पोलिस भरतीसाठी गुपचूप अर्ज भरला होता. काही दिवस गुपचूप पोलिस भरतीचा सराव करायची. काही दिवसांनी मी घरी त्याची माहिती सांगितली आणि वडिलांनी परवानगी दिली. मोठ्या उत्साहाने सरावाला सुरवात केली आणि अखेर पोलिस भरतीला गवसणी घातलीच. गोरगरिबांची सेवा करण्याची ओढ होती, पोलिस भरतीची पॅशन होती. आता ‘भरोसा सेल’च्या माध्यमातून महिलांचे कौटुंबिक समस्या सोडविण्याचे काम करीत असल्याचे मधू शिंदे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.