सांगली : राज्य सरकारने (MVA Government) मार्केटमध्ये वाईन (Wine)विक्रीबाबत घेतलेला निर्णय म्हणजे सर्वनाशाच्या दिशेने टाकलेले पाऊल म्हणावे लागेल. लोकशाहीच्या पवित्र मंदिरात हा निर्णय घेऊन मंत्रीमंडळाने मोठा गुन्हा केला आहे. या निर्णयाविरोधात आम्ही उभे राहणार आहोत. राष्ट्राला मातीत घालणारी ही वाटचाल थांबवली पाहिजे. त्यासाठी राज्यपालांकडे असे मंत्रीमंडळ बरखास्त करण्याची मागणी केली जाईल अशी माहिती शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे (Sambhaji Bhide)यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Cabinet approves sale of wine in supermarkets)
ते म्हणाले, ''राज्याला महसूल मिळवून देण्यासाठी संतापजनक, राष्ट्रघातक,धर्मविरोधी, समाज हानिकारक तसेच भारतमातेची पवित्रता नाश करणारा हा निर्णय म्हणावा लागेल. महाभारतात जुगार खेळणाऱ्या धर्मराजाला भीमाने विरोध केला. तसेच द्रौपदीला डावावर लावल्यानंतर ज्याप्रमाणे संताप व्यक्त केला तसा भीम आज जीवंत नसल्याचे दुर्दैव आहे. मंत्रीमंडळाला हा निर्णय घेऊन नेमके काय साधायचे आहे, तेच कळत नाही. अनेक संघटना, राजकीय पक्ष्यांना या निर्णयाचा राग येत नाही. जाती संस्थांच्या प्रमुखांनी देखील या निर्णयाविरूद्ध उठले पाहिजे. दारूसाठी इतर राज्यांचे उदाहरण देऊ म्हणजे एका चुकीला दहा चुकांचे उदाहरण देऊन समर्थन करता येत नाही.’’
ते पुढे म्हणाले, ''महाराष्ट्राने देशाला देशपण, इतिहास आणि भवितव्य दिले. इथली एक मराठा-लाख मराठा ही घोषणा अभिमानास्पद आहे. त्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. त्याचबरोबर मराठा क्रांती मोर्चाने तसेच हिंदुत्ववादी विचारांच्या संघटनांनी दारूच्या निर्णयाविरूद्ध रस्त्यावर आले पाहिजे.लोकशाहीच्या पवित्र मंदिरात असा निर्णय घेऊन गुन्हा करणाऱ्यांना शिक्षा देणारा समाज उत्पन्न होणे आवश्यक आहे. परंतू आज महाभारतातील द्यूताच्या राज्यसभेप्रमाणे राज्याची स्थिती झाली आहे. एकही मंत्री, आमदार यानिर्णयाला विरोध करून बाहेर पडला नाही हे दुर्दैव आहे. राज्यमंत्रीमंडळाचा निर्णय म्हणजे सर्वनाशाच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे.याविरोधात आम्ही उभे राहणार आहोत. मंत्रीमंडळाशी बोलणार आहे.राज्यपालांना भेटून मंत्रीमंडळ बरखास्त करा अशी मागणी करणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील दारूला तिलांजली देणारा ठराव करून घटनेत दुरूस्ती करावी अशीही आमची मागणी आहे.’’
आबा असते तर....
आजच्या मंत्रीमंडळात पांडवांच्या बाजूने उभे राहणाऱ्या सुयोधनाप्रमाणे कोणी नसल्याचे सांगताना भिडे म्हणाले, ‘‘आज आबांची आठवण येते.अनेकांचा विरोध असताना सुद्धा त्यांनी डान्सबार बंदी केली. आज ते असते तर असा घातकी, नीच निर्णय झालाच नसता.’’
न्यायाधीशांचा निर्णय चुकीचा
भिडे म्हणाले, ''लिकर इज फूड म्हणजेच धान्य पिकवून त्यापासून दारू तयार करा सांगणारी मंडळी अनेकांना पूज्य वाटतात. त्यांचा राग येत नाही.त्याबरोबर लिव्ह इनरिलेशनशीप हा प्रकारही बेशरमपणाचा आहे. परंतू ते योग्य असे सांगणाऱ्या न्यायाधीशांचा निर्णय चुकीचा आहे. माझ्या या वक्तव्याचा चटका बसेल, गुन्हा दाखल केला जाईल. परंतू गुन्हा दाखल करूदेत. कारण न्यायमूर्ती रामभशास्त्री प्रभुणे प्रमाणे ठणकाऊन सांगण्याची आज गरज आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.