BHaktaraj Garje Sakal
महाराष्ट्र बातम्या

दुष्काळमुक्त गाव, माझी भाकरी उपक्रम राबवत अख्ख्या गावाचं रूपडं बदलणाऱ्या सरांसाठी हळहळला गाव | Teacher Bhaktaraj Garje

विद्यार्थ्यांना भाकरी बनवायला शिकवली, दुष्काळी गावाला पाणीदार बनवलं... कुलाळवाडी आता गर्जे सरांच्या "कुलाळवाडी पॅटर्न"मुळे ओळखू जाऊ लागली. पण त्यांची बदली झाल्यावर अख्खा गाव धाय मोकलून रडला...

दत्ता लवांडे

एखाद्या दुष्काळी भागातील उसतोड मजुरांच्या खेडेगावात गावात एक शिक्षक म्हणून येतात. गावची दुष्काळी स्थिती पाहून या शिक्षकाची फक्त शैक्षणिकच नाही तर समाजाप्रती असलेली तळमळ शांत बसू देत नाही. शाळेतील विद्यार्थ्यांचा, गावकऱ्यांचा, परिसराचा, गावचा आणि एकंदरीत अख्ख्या गावाचा विकास करण्याचा ध्यास बाळगत पत्र्याच्या शाळेचं डिजीटलायझेशन करून दुष्काळी गावाचा अनोखा पॅटर्न राज्याच्या पटलावर नेण्याची किमया हे शिक्षक करतात.

पण ज्यावेळी या शिक्षकाची परत बदली होते त्यावेळी गावकऱ्यांना आपल्या अश्रूंचा बांध आवरता येत नाही. निरोप देताना लहान लेकरांपासून महिला अन् जेष्ठांच्या डोळ्यात फक्त पाणी पाहायला मिळतं... ही गोष्ट आहे सांगलीतील जत तालुक्यातील कुलाळवाडीतल्या आणि आता बदली झालेल्या भक्तराज गर्जे या शिक्षकाची.

गर्जे मास्तर... मुळचे पैठणचे असलेले भक्तराज गर्जे यांची तब्बल १२ वर्षापूर्वी जत या दुष्काळी तालुक्यातल्या कुलाळवाडी येथे बदली झाली. ते प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून रूजू झाले होते. पण शाळेत मुलांना शिक्षण देता देता गावच्या लोकांच्या रोजच्या व्यवहाराचे शिक्षक कधी झाले हे गावालाही कळलं नाही.

गाव दुष्काळी असल्याने शेतीवरून होणारं उत्पन्न हे तोकडं होतं. दिवाळीच्या दरम्यान गावातले अनेक कुटुंब उसतोडीसाठी बाहेरगावी जायचे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आणि पोटापाण्याची आबाळ व्हायची. हे सगळं गर्जे सरांना बघवत नव्हतं. त्यामुळे त्यांनी अख्ख्या गावाचं रूपडं बदलण्याचा निर्णय घेतला अन् प्रवास सुरू केला.

गावातील मोकळ्या जागेवर वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, गावातील रस्त्यावर आलेले काट्याचे झाडे बाजूला करून रस्ते बनवणे, पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून गावात श्रमदानाचं महत्त्व पटवून देऊन जलसंधारणाची काम करून घेणे अशी अनेक समाजोपयोगी कामं त्यांनी 'कुलाळवाडी पॅटर्न' विकसीत केला. त्याचबरोबर आईवडील उसतोडीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केला.

"माझी भाकरी" हा उपक्रम शाळेतच राबवायला सुरूवात केली आणि प्रत्येक विद्यार्थ्याला भाकरी बनवायला शिकवलं. त्यांच्या या उपक्रमामुळे उसतोडणीच्या काळात विद्यार्थ्यांचं होणारं स्थलांतर थांबलं. विद्यार्थी आपल्या पायावर उभी राहिली. त्यांच्या उपक्रमाची दखल राज्य शासनाला आणि बालभारती सारख्या मंडळाला घेणे क्रमप्राप्त झाले. अख्ख्या गावाचं रूपडं बदलण्यासाठी त्यांनी राबवलेला 'कुलाळवाडी पॅटर्न' देशभर गाजला.

हळवे झालेले विद्यार्थी आणि गावकरी

माझी भाकरी या कार्यक्रमामुळे कुलाळवाडी राज्याच्या पटलावर गेलं. या उपक्रमाची किमया चांगलीच गाजली. त्यामुळे कुलाळवाडीत असलेल्या पत्र्याच्या शाळेला देश-परदेशातूनही मदत मिळाली. शाळेचं डिजीटलायझेशन झालं. पत्र्याच्या शाळेत शिकणारी पोरं संगणकांवर बोट चाळू लागली. दुष्काली गावं पाणीदार झालं.

जिथं दिवाळीनंतर काही दिवसांतच भकास होत होतं ते गाव भर उन्हाळ्यातही हिरवं झालं होतं. रस्त्याच्या कडेने लावलेल्या झाडांनी गावाची शान वाढली होती. गर्जे यांनी आपला संपूर्ण वेळ विद्यार्थ्यांना आणि गावाला दिला. एखादा व्यक्ती फक्त 'सरकारी शिक्षक' म्हणून भूमिका बजावू शकला असती पण भक्तराज गावाच्या भक्तीत एवढे गढून गेले होते की, प्रसंगी दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यासुद्धा त्यांनी या गावासाठी अर्पण केल्या होत्या.

शेती, शिक्षण, जोडधंदा, पाणी, माती, वृक्ष, जल अशा विविध विषयांत पारंगत असणारा हा शिक्षक. दुष्काळी कुलाळवाडीला 'पाणीदार कुलाळवाडी' बनवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे पाणी फाऊंडेशनचा 'वॉटर कप' हा पुरस्कार मिळाला. त्यांच्या योगदानामुळे कुलाळवाडीचं अख्खं रूपडं बदललं.

एकेकाळी दुष्काळी समजली जाणारी कुलाळवाडी आता गर्जे सरांच्या "कुलाळवाडी पॅटर्न"मुळे ओळखू जाऊ लागलीये. शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांच्या पालकांना शेतीविषयक मार्गदर्शन, नवे उपक्रम अशी कामं त्यांनी केली. अनेक शेतकऱ्यांच्या आणि मजुरांच्या हाताला त्यांच्यामुळं काम मिळालंय.

निरोप समारंभावेळी भावूक झालेले विद्यार्थी आणि महिला

एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांचा हा त्याग आणि समर्पण वाखाणण्याजोगे आहे. उसतोडीसाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबियांच्या लेकरांना त्यांनी आईवडिलांप्रमाणे जपलं अन् शिकवलं. प्रत्येक विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती असणारा हा शिक्षक. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत अडचणी जाणून घेत त्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी स्वत:ला झिजवलं. येवढंच नाही तर त्यांना झेप घेण्यासाठी पंख बळकट करून दिलीत हे विशेष.

भक्तराज गर्जे पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाचे काम करताना (सोबत शाळेतील विद्यार्थी)

आता त्यांची बदली जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वालठाण या गावी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून झाली. त्यांच्या निरोप समारंभाला अख्खं कुलाळवाडी गाव जमा झालं होतं. आपल्या गावाला आगळीवेगळी ओळख निर्माण करून देणाऱ्या कर्मयोगी शिक्षकाच्या बदलीने प्रत्येक गावकऱ्यांचं मन तुटत होतं. लहान लेकरं घट्ट मिठ्या मारत धाय मोकलून रडत होते. बायाबापड्यांनाही रडू आवरलं नाही. महिला औक्षण करत असताना गर्जे सरांनी सुद्धा आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. हे चित्र पाहून काळीज अक्षरश: पिळवटून निघतं.

त्यांच्या निरोप समारंभाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एका शिक्षकाला एवढं प्रेम, माया, जिव्हाळा आणि प्रत्येकाला वाटणारा आपलेपणा एका दिवसात मिळत नाही. हेच प्रेम त्यांनी कमावलंय. त्यांचं समर्पण, त्याग हा शब्दात सांगता न येणारा आहे. गर्जे मास्तर म्हणजे कुळालवाडी आणि परिसराला लाभलेलं असामान्य अन् आदर्श व्यक्तिमत्त्व आहे असं गावकरी मानतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT