पाटण (जि. सातारा) ः सलग दोन महिने दडी मारलेल्या पावसाने ऑगस्टमध्ये 20 दिवसांत कोयना प्रकल्पाबरोबर खरिपाची शेती, बारमाही सिंचन व वीजनिर्मितीची काळजी संपवली आहे. जून महिन्यात धरण पाणलोट क्षेत्रात सरासरी 788 मिलिमीटर, जुलैमध्ये 1849 आणि 20 ऑगस्टपर्यंत 2138 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जलवर्षात धरणात आजपर्यंत 92.84 टीएमसी पाण्याची आवक झाली असून पाणीसाठा नियंत्रणासाठी सहा वक्र दरवाजांतून 15.19 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
जलवर्षाच्या प्रारंभी जलाशयात 34.13 टीएमसी पाणीसाठा होता. महिन्याच्या सुरवातीस चक्रीवादळामुळे दोन दिवस पडलेला पाऊस सोडला तर मॉन्सूनचा पाऊस कमी प्रमाणातच पडला. संपूर्ण जून महिन्यात कोयनानगरला 787 मिलिमीटर, नवजाला 839 आणि महाबळेश्वरला 788 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. एक जुलैला जलाशयात सिंचन आणि वीजनिर्मितीला पाणीवापर झाल्याने फक्त 32.08 टीएमसी पाणीसाठा होता. जुलै महिन्यात काही दिवस विश्रांती, तर काही दिवस मुसळधार पाऊस पडल्याने पाणलोट क्षेत्रात या महिन्यात कोयनानगरला 968 मिलिमीटर, नवजाला 1095 आणि महाबळेश्वरला 1190 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 31 जुलैपर्यंत जलाशयाने 52 टीएमसीकडे वाटचाल केली होती. परंतु, जून व जुलै महिन्यांत अपेक्षित असणारा पाऊस न पडल्याने धरण पूर्णक्षमतेने भरेल, याबाबत शंका निर्माण झाली होती.
दरम्यान, चार ऑगस्टला मुसळधार पावसास सुरुवात झाली आणि 11 दिवसांत धरणातील पाणीसाठा नियंत्रणासाठी स्वातंत्र्यदिनी सकाळी 11 वाजता धरणाच्या सहा वक्रदरवाजांतून पाणी सोडण्यास सुरुवात झाली. पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने 16 ऑगस्टला चार वाजता धरणाचे दरवाजे 10 फुटांपर्यंत उचलण्यात आले. तेव्हा महापुराची परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती निर्माण झाली. 19 ऑगस्टला सकाळी 11 वाजता दरवाजे पाच फुटांवर आणल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आहे.
जलवर्षात आजपर्यंत 92.84 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. पायथा वीजगृहातून सिंचन व पूरपरिस्थितीत 7.48 टीएमसी, तर सहा वक्र दरवाजांतून सहा दिवसांत 15.19 टीएमसी पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात आला आहे. पश्चिमेकडे वीजनिर्मितीसाठी 11.06 टीएमसी पाण्याचा वापर झाला असून सध्या धरणात 91.63 टीएमसी पाणीसाठा असून आज सकाळी सव्वाआठ वाजता सहा वक्र दरवाजांतून सोडण्यात येणारे पाणी बंद केले आहे. कोयना धरणावर अवलंबून असणाऱ्या खरीप, बारमाही पूर्वेकडील सिंचन, वीजनिर्मिती या बाबी मुसळधार पावसाने पूर्ण केल्याने सगळीकडे समाधानाचे वातावरण आहे.
(संपादन ः संजय साळुंखे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.