सातारा : राज्यातील इयत्ता दहावीचा निकाल लावण्यासाठी सरकार प्रयत्नशिल असून इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यासाठीचे नियोजन युद्धपातळीवर सुरु आहे. यंदा अकरावीच्या प्रवेशातील सामाजिक, शैक्षणिक, मागास प्रवर्गाकरिता (एसईबीसी) यांचे 16 टक्क्यांवरील आरक्षण 12 टक्के करण्यात आले आहे. या एसईबीसी आरक्षणात मराठा जातीचा समावेश आहे. मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ व्हावा यासाठी मोठा संघर्ष झाला. या आरक्षणाचा लाभ विद्यार्थी वर्गास होत असल्याचे नुकत्याच लागलेल्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या निकालावरुन स्पष्ट झाले आहे.
मराठा समाजातील विद्यार्थी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी पुढाकार घेऊ लागले आहेत. मात्र अद्यापही अनेकांना मराठा जात प्रमाणपत्र कसे काढायचे, त्यासाठी कोणती कागदपत्र आवश्यक आहेत. त्याची प्रक्रिया कशी असते याची माहिती नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे मराठा जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे आणि त्याची प्रक्रिया समजून घेऊया.
ही संपूर्ण पद्धत ऑनलाइन असून प्रत्येक जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्रामध्ये यासाठी नागरीकांना अर्ज करता येणार आहे.
अर्ज केल्यापासून हे प्रमाणपत्र आठ ते दहा दिवसांत देण्यात येते.
यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. त्याबाबतची माहिती प्रत्येक सेतू कार्यालय, तहसिल कार्यालय येथे उपलब्ध आहे.
मराठा जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे
जात प्रमाणपत्र हवे असलेल्या व्यक्तीचा स्वत:चा शाळा सोडल्याचा दाखला (हिंदू मराठा उल्लेख आवश्यक)
शाळा सोडल्याचा दाखला नसल्यास बोनाफाईड सर्टीफीकेट (जन्मतारीख व जातीचा उल्लेख आवश्यक)
वडिलांचा जन्म 13 ऑक्टोबर 1967 रोजी किंवा त्यापूर्वी झाला असल्यास त्यांचा जातीचा पुरावा. यासाठी खालीलपैकी एक कागदपत्र लागेल.
शाळेचा दाखला (हिंदू मराठा उल्लेख आवश्यक).
जन्म-मृत्यूची नोंद असलेला महसूल अभिलेखातील पुरावा.
शासकीय किंवा निमशासकीय नोकरीचा जातीची नोंद साक्षांकित केलेला उतारा.
समाज कल्याण खात्याकडील जात पडताळणी समितीने वैध ठरविलेले जातीबाबत प्रमाणपत्र.
वडिलांचा जातीचा दाखला नसल्यास तसे शपथपत्र देणे आवश्यक आहे.
वडीलांचा जातीचा पुरावा उपलब्ध नसल्यामुळे इतर रक्त नाते संबंधितांचे पुरावे द्यावे लागत असल्यास तुमचे आणि त्या संबंधित व्यक्तीचे नाते स्पष्ट होण्यासाठी संबंधित व्यक्तीचे आणि तुमचे नाते दर्शवणारी वंशावळ प्रतिज्ञापत्रावर लिहुन द्यावी आणि त्याबद्दल काही कागदोपत्री पुरावे असल्यास ते ही द्यावेत.
उदाहरण - बहिण-भावांचा शाळा सोडल्याचा दाखला (हिंदू मराठा उल्लेख आवश्यक)
वंशावळ, महसूल पत्र , रहिवासी प्रमाणपत्र , रेशनकार्ड , आधारकार्ड , एक छायाचित्र
त्यानंतर तुम्ही करीत असलेल्या अर्जावरील सर्व माहिती अचूक भरली आहे का ते पाहून घ्या. माहिती तपासल्यानंतर तुमच्या प्रतिज्ञापत्राची नोंदणी केली जाईल आणि तुम्हाला अर्जावर व प्रतिज्ञापत्रावर शिक्के देऊन सक्षम प्राधिकाऱ्याची सही आणण्यासाठी पाठवले जाईल. साधारणतः अर्ज जमा केल्यानंतर त्याची पोचपावती अथवा घ्यावी. सदर पाेचपावती वर तुमचा जातीचा प्रमाणपत्राचा दाखला मिळण्याची तारीख दिली जाते. संबंधित पाेचपावती जपून ठेवावी. ज्या दिवशी दाखला मिळणार त्या दिवशी पुन्हा सेतू कार्यालयात जा.
दरम्यान मराठा समाजातील विवाहीत स्त्रियांसाठी प्रमाणपत्र हवे असल्यास पुढील पुरावे जोडावे
अ) विवाहापुर्वीची जात सिध्द करणारा कोणताही एक पुरावा
ब) विवाहाचा पुरावा म्हणून विवाह नोंदणी दाखला
क) राजपत्रात प्रसिध्द झालेला नावातील बदल व लग्नपत्रिका किंवा पोलीस यांचा दाखला.
राज्यात तालुकास्तरापासून जिल्हास्तरापर्यंत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आहेत. कोणत्याही मराठा समाजातील विद्यार्थी घटकास मराठा जात प्रमाणपत्र काढण्यासाठी मदत हवी असल्यास त्या त्या जिल्ह्यातील समन्वयक मार्गदर्शन, मदत करतील. मराठा जात प्रमाणपत्र काढण्याची खूप सोपी प्रक्रिया आहे. जातीचा दाखला मिळाल्यावर त्याच्या दहा सत्यप्रत (True Copy) तयार करुन ठेवा.
- शरद काटकर, मराठा क्रांती मोर्चा, समन्वयक, सातारा जिल्हा.
Video : एमपीएससी परीक्षेत यशस्वी हाेण्यासाठीचा प्रसाद चाैगुलेंचा कानमंत्र
पुढच्या बुधवारपासून तूरडाळ 55, तर चणाडाळ 45 रुपये किलो दराने मिळणार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.